चिदम्बरमजी, आता का कुरकुर करताय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:39 AM2021-10-21T05:39:40+5:302021-10-21T05:41:31+5:30

निर्गुंतवणूक या संकल्पनेचे पितृत्व मोदींचे नाही. ते नरसिंह रावांचे! आता मोदी तेच करत आहेत, तर चिदम्बरम यांनी नक्राश्रू का ढाळावे?

p Chidambaram now questioning disinvestment once he has done the same thing | चिदम्बरमजी, आता का कुरकुर करताय?

चिदम्बरमजी, आता का कुरकुर करताय?

googlenewsNext

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

भारतातून कोविड जवळपास गेला असताना मोदी सरकार चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग विकून १.७५ लाख कोटी जमविण्याच्या घाईत आहे. गेल्या महसुली वर्षात सरकारला केवळ ३२,८४५ कोटी उभे करता आले. पण सरकारने एअर इंडिया टाटांना लगबगीने विकली, त्यावरून झालेला उशीर भरून काढण्याचा मोदी यांचा निर्धार दिसतो.

देशाचे माजी अर्थमंत्री पी. सी. चिदम्बरम यांना मात्र या निर्गुंतवणूक प्रक्रियेत कारस्थान दिसते आहे. या सगळ्या व्यवहारांमध्ये कारस्थानाचा संशय घ्यायला जागा आहे, कारण सरकारची व्यवहारांची शैलीच संशयास्पद आहे, असे त्यांचे म्हणणे. मात्र, नफ्यातली एअर इंडिया युपीएच्या काळात तोट्यात कशी गेली, याचे स्पष्टीकरण काही चिदम्बरम यांना देता आलेले नाही. दुसरे म्हणजे निर्गुंतवणूक या संकल्पनेचे पितृत्व मोदी यांच्याकडे नाही. त्याचे श्रेय पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे जाते. डॉ मनमोहन सिंग अर्थमंत्री आणि चिदम्बरम वाणिज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) असताना ही संकल्पना साकार झाली. १९९१ ते ९६ या काळात तब्बल ३१ सार्वजनिक उद्योग विकून सरकारने जेमतेम ३,०३८ कोटी रुपये कमावले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी, राजीव गांधी यांच्या काळात बाजारातील शक्तींपासून लोकांना वाचविण्यासाठी स्वातंत्र्याच्या पहिल्या ४४ वर्षांत ही रत्ने तयार झाली होती. परंतु, १९९१पासून आलेल्या सर्व सरकारांनी हे धोरण केवळ उलट फिरवले नाही तर त्याच बाजाराच्या हातात सगळे देऊन टाकले.



डिसेंबर १९९९मध्ये स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय निर्माण करून वाजपेयी यांनी एक पाऊल पुढे टाकले. अरुण जेटली यांनी दिल्ली दूध योजनेचा समावेश असलेली मॉडर्न फूड्स ही कंपनी हिंदुस्तान लिवरला विकून टाकली. आयओसी, बीपीसीएल, गेल, व्हीएसएनएल यासारख्या मोठ्या चलतीतल्या कंपन्यांचे समभाग विकण्यापुरती निर्गुंतवणूक प्रक्रिया प्रारंभी मर्यादित होती. पुढे हिंदुस्तान झिंक, बाल्को, सीएमसी, सेंटॉर हॉटेल, आयटीडीसी, आयपीसीएल, मारुती सुझुकी इंडिया अशा कंपन्या नंतर पूर्णत: विकल्या गेल्या. 



नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा काळ आला. चिदम्बरम अर्थमंत्री झाले. दोघांनी एकामागून एक सार्वजनिक उद्योग विकण्याचा सपाटाच लावला. विविध ठिकाणांहून लेखकाने मिळवलेल्या माहितीनुसार, या काळात नफ्यात चालणाऱ्या कंपन्या विकून १,०७,८७९ कोटी रुपये मिळविण्यात आले. या सर्व मोहिमेत आपण एकेकाळी अग्रभागी असूनही आता मोदी काही उद्योग विकत आहेत तर त्यात कारस्थान कसले, हे चिदम्बरम यांनी नेमक्या तपशीलासह सांगायला हवे. नक्राश्रू ढाळण्यात अर्थ नाही.

खरे चालक मोदीच 
मोदी वेगळेच आहेत. कारण ते महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करतात. वेळेत ते  गाठण्याचा प्रयत्न करतात आणि महत्त्वाचे म्हणजे हे कार्य सिद्धीस गेले की, सगळे श्रेय स्वत:कडे घ्यायला विसरत नाहीत. आगामी काळात हे पूर्ण बहुमतातले सरकार विक्रमी निर्गुंतवणूक करेल, अशी काळजी चिदम्बरम यांना असावी. १९९१ ते २०१४ या काळातल्या २३ वर्षांतल्या सर्व पंतप्रधानांनी मिळून  सार्वजनिक उद्योग विकून १,५२,७८१ कोटी रुपये मिळवले. मोदी यांनी गेल्या ७ वर्षांतच ३.६१ लाख कोटी मिळवले आहेत. 



२३ वर्षांत जे जमवले गेले त्याच्या दुपटीहून ही रक्कम अधिक होते. येत्या दोन वर्षांत आणखी कमाई केली जाणार असल्याचे मोदी सरकारमधील अंतस्थ सूत्रे सांगतात. साधारणत: ५ लाख कोटी जमवले जातील, असा अंदाज आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या समभागांचे भाव वाढले आहेत. एकूण ३३६पैकी १०० आजारी सार्वजनिक उद्योग विकण्याचा प्रयत्न मोदी करतील, त्यात ३६ मोक्याचे उद्योग आहेत. सुमारे १ लाख कोटी रुपये घालून मोदी बीएसएनएल, एमटीएनएलसारख्या कंपन्या पुनरुज्जीवित करत आहेत.

विरोधाभासाची गोष्ट म्हणजे देश ‘५ जी’कडे वळला असताना बीएसएनएल ‘४ जी’ सेवा सुरु करत आहे. कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर स्वेच्छा आणि सक्तीची निवृत्ती दिल्यानंतर या दूरसंचार कंपन्या आता सडपातळ झाल्या आहेत. ४१ ऑर्डनन्स कारखान्यांची मंडळे व्यवहार्य होण्यासाठी बरखास्त केल्यानंतर मोदी यांनी ७ नवे सार्वजनिक उद्योग निर्माण केले आहेत. इस्रो, डीआरडीओ यांच्याप्रमाणे जागतिक स्पर्धेत उभे राहायला या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. संशोधनाच्या नावाखाली अनुदाने मिळवून हे होणार नाही, असेही त्यांना बजावण्यात आले आहे.

अदानी, अंबानी आपापल्या रस्त्याने
एक काळ होता जेव्हा अंबानी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकत घ्यायला सर्वात पुढे असत. त्या काळात अदानी कोठेही नव्हते. आता अंबानी अंतर्धान पावले आहेत. अदानी मात्र समोर येईल ते विकत घेत सुटले आहेत. ऊर्जा प्रकल्प, बंदरे, विमानतळ, सौर आणि वात प्रकल्प घेऊन झाले; आता त्यांना दूरसंचार क्षेत्रातही उतरायचे आहे. किमान ३५ उद्योगांवर त्यांची नजर आहे म्हणतात! आणखीही खिशात टाकले जाऊ शकतात. वाहत्या वाऱ्याची दिशा समजून घेऊन त्याला वेळेत सन्मुख होणे अदानीना जमते खरे आणि हेही खरे की, सध्याचा काळही अदानी यांनाच धार्जिणा आहे!

Web Title: p Chidambaram now questioning disinvestment once he has done the same thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.