बारा वर्षांखालील मुलांसाठी ‘नो स्मार्टफोन कोड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 04:53 IST2026-03-28T04:53:11+5:302026-03-28T04:53:11+5:30

जगभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्नही केले जात आहेत. 

no smartphone code for children under twelve | बारा वर्षांखालील मुलांसाठी ‘नो स्मार्टफोन कोड’!

बारा वर्षांखालील मुलांसाठी ‘नो स्मार्टफोन कोड’!

देशोदेशीच्या लहान मुलांचं (आणि मोठ्यांचंही) बालपण स्मार्टफोननं कसं व्यापलं गेलं आहे, वास्तवातून ते आभासी जगात कसे गेले आहेत आणि प्रत्यक्ष जगात वावरण्यापेक्षा कल्पनेच्या जगात ते कसे रममाण झाले आहेत आणि त्यामुळे त्यांचं बालपण कसं वाया जात आहे, हे आता सर्वश्रुत आहे. त्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्नही केले जात आहेत. 

त्यातलाच एक वेगळा प्रयोग आयर्लंड येथील ‘ग्रस्टोन्स’ या शहरानं केला आहे आणि त्यामुळे हे शहर सध्या संपूर्ण जगभरात चर्चेत आहे. युरोपीय देश आयर्लंडमधील ‘ग्रेस्टोन्स’ प्रांतानं जगाला तो मार्ग दाखवला आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येक चिंताक्रांत पालक आहे. या शहरातील सर्व नागरिकांनी मिळून निर्णय घेतला, आपल्या मुलांचं बालपण ते स्मार्टफोनला बळी जाऊ देणार नाहीत. त्यामुळे बारा वर्षांच्या आतील या शहरातील कोणत्याही मुलाला स्मार्टफोन मिळणार नाही, दिला जाणार नाही, असा निर्णय येथील पालक आणि शिक्षकांनी घेतला आहे. 

‘इट टेक्स अ व्हिलेज’ नावाचं आंदोलन तिथे उभं राहिलं आणि या आंदोलनानं तंत्रज्ञानाविरुद्ध एक सामूहिक भिंत उभी केली. फोनऐवजी मुलांसाठी तिथे ‘युथ कॅफे’ आणि ‘फोन-फ्री बीच पार्टी..’ यासारखे नवनवीन उपक्रम सुरू झाले आहेत. मुलं मैदानांवर खेळायला लागली आहेत. ‘ग्रेस्टोन्स’च्या या उपक्रमानं प्रेरित होऊन आता आयर्लंडमधील इतर शहरं कॉर्क आणि डब्लिन यांनीही ‘नो स्मार्टफोन कोड’ स्वीकारला आहे. एवढंच नाही, ब्रिटन आणि स्पेनमधील बार्सिलोना येथेही पालकांच्या गटांनी असाच पुढाकार घेतला आहे. 

स्मार्टफोनच्या डिजिटल चक्रव्यूहापासून मुलांचं बालपण वाचवण्यासाठी संपूर्ण शहरानं जणू काही एक ढाल तयार केली आहे. सेंट पॅट्रिक स्कूलच्या प्रिन्सिपल रॅचल हार्पर यांच्या लक्षात आलं, कितीही प्रयोग करून पाहा, मुलांच्या कलानं घेऊन पाहा, बऱ्याचदा मुलांचं वर्गात लक्षच लागत नाही. त्यांच्या शारीरिक हालचालीही मंद झाल्या आहेत. ते पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्या डोळ्यांवर झोपेची झापड आहे. त्यांनी शाळेतल्या, वर्गातल्या बऱ्याच मुलांशी चर्चा केली, रात्री उशिरापर्यंत मुलं मोबाइलमध्ये मग्न असल्यामुळे, त्यातले मेसेज, रील्स पाहत असल्यामुळे त्यांची झोप अपुरी राहत होती, काहींना लवकर झोप न येण्याचा प्रॉब्लेमही सुरू झाला होता. काही मुलं तर ‘कॅलरी काउंटिंग ॲप्स’मुळे ‘ईटिंग डिसऑर्डर’ची शिकार झाली होती.

 १२ वर्षांचा बॉडी मँगन गिसलर हा मुलगा या बदलाचा ‘पोस्टर बॉय’ आहे. तो म्हणतो, ‘मला भीती वाटतेय, की माझी स्मार्टफोनची सवय अशीच कायम राहिली, मी त्यातून बाहेर पडलो नाही, तर मी प्रत्यक्ष मैदानावर कधीच खेळू शकणार नाही. निरोगी राहणार नाही, पण मला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगायचं आहे. 

अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे जागतिक टेक कंपन्यांची मुख्यालयं आहेत, त्या आयर्लंडमधीलच अनेक शहरांमध्ये ‘नो स्मार्टफोन’ मोहीम सुरू झाली आहे. आयर्लंडमध्ये गुगल, मेटा आणि ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांची युरोपीय मुख्यालयं आहेत, जिथे सरासरी नऊ वर्षांच्या वयातच मुलांना स्मार्टफोन मिळतो. देशाचे उपपंतप्रधान सायमन हॅरिस, जे स्वतः या प्रांताचे रहिवासी आहेत, तेही या मोहिमेचे मोठे समर्थक बनले आहेत..

 

Web Title : आयरलैंड के शहर में 12 साल से कम उम्र के बच्चों के लिए स्मार्टफोन पर प्रतिबंध

Web Summary : आयरलैंड के ग्रेस्टोन्स शहर में 12 साल से कम उम्र के बच्चों के लिए स्मार्टफोन पर प्रतिबंध लगा दिया गया है, जिससे एक वैश्विक आंदोलन शुरू हो गया है। माता-पिता और शिक्षक वास्तविक दुनिया की गतिविधियों को प्राथमिकता दे रहे हैं, जिससे बच्चों की भलाई में सुधार हो रहा है। अन्य शहर भी इसका अनुसरण कर रहे हैं।

Web Title : Ireland's Town Bans Smartphones for Children Under 12: A New Movement

Web Summary : An Irish town, Greystones, bans smartphones for children under 12, sparking a global movement. Parents and educators prioritize real-world activities, leading to improved child well-being. Other cities are following suit.