नवहिंदुत्व आणि अमेरिकेत भारतीयांबद्दल नफरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:53 IST2026-01-15T08:52:36+5:302026-01-15T08:53:00+5:30
नवहिंदुत्व आक्रमक होत गेले आणि अमेरिकेत भारतविरोध वाढला. ऐहिक जीवनशैली आणि श्रद्धेचे आक्रमक राजकारण याची ही परिणती! - उत्तरार्ध

नवहिंदुत्व आणि अमेरिकेत भारतीयांबद्दल नफरत
कुमार केतकर
ज्येष्ठ पत्रकार-संपादक राज्यसभेचे माजी सदस्य
२००० सालापर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये आदर, कुतूहल आणि आश्चर्य असे. आता मात्र स्थानिक अमेरिकनांच्या नजरेत संशय, राग आणि असूया दिसू लागली आहे. असे का झाले?
भारतीय अमेरिकेत स्थलांतरित होण्याची खरी प्रक्रिया सुरू झाली १९६५ पासून. १९८०-९०च्या दशकात या प्रक्रियेला वेग आला. विसाव्या शतकाच्या अखेरीस तंत्रज्ञान क्षेत्रात एक भीती आणि अफवा पसरली की जगातील सर्व 'कॉम्प्युटर-सायबर सॅटेलाइट सिस्टीम्स' महासंकटात सापडणार आहेत. साहजिकच त्या सिस्टीम्सचे नूतनीकरण आणि नवीन प्रज्ञावली तयार करण्याच्या गरजांमुळे 'ट्रेन्ड' इंजिनिअर्सची गरज अमेरिकेत वाढली. इतर कोणत्याही देशांपेक्षा भारतातून उच्चशिक्षण घेतलेल्यांची संख्या कितीतरी पटींनी जास्त होती. त्यामुळे भारतातून अमेरिकेत येणाऱ्या तरुण, मध्यमवयीन व व्यावसायिकांची संख्या वाढू लागली. नंतर फक्त तरुण (विवाहित व विवाहेच्छुक) मंडळीच नव्हे तर हळूहळू त्यांचे आई-वडील, भाऊ-बहिणीही येऊ लागले. कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या गमजा नुसत्या मागे पडल्या नाहीत तर कॅलिफोर्नियाचा कोकण व्हायला लागला. यातील अतिशयोक्ती बाजूला ठेवली तरी सॅन होजेच्या सिलिकॉन व्हॅलीतील रस्त्यांवर भारतीय जोडपी दिसू लागली. त्यांचे वयस्कर आई-वडीलही सर्वत्र दिसू लागले. मराठी भाषिक होतेच, पण तेलुगू, तामिळ, बंगाली कुटुंबेसुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ लागली. सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये भारतीय-हिंदुस्थानी गाण्यांचे, नृत्यांचे, भाषांचे, भाषिक साहित्य संमेलनाचे कार्यक्रम आणि हिंदू संस्कृतीचे-भाषांचे वर्ग भरवले जाऊ लागले. अयोध्येला जेव्हा राम मंदिर बांधण्याची योजना सुरू झाली, तेव्हा याच हिंदू कुटुंबांकडून प्रचंड प्रमाणावर हजारो डॉलर्स जमा केले जाऊ लागले. श्रद्धेपेक्षाही हा आक्रमक नवहिंदुत्वाचा आविष्कार होता.
अमेरिका हे बहुसंख्य मध्यमवर्गीयांचे नवे भौतिक-ऐहिक तीर्थक्षेत्र बनले असल्यामुळे अमेरिकेत पसरलेल्या या नवहिंदुत्ववादाचे प्रतिध्वनी भारतात उमटू लागले. तिकडेच स्थायिक झालेल्यांचा उन्माद रस्त्यावर येऊ लागला. शक्यतो कुणाच्या श्रद्धा व संस्कृती यांची अवहेलना होऊ नये असा एक अमेरिकन जीवनशैलीचा गुण होता. याचा अर्थ तिकडे आक्रमक गौरवर्णीयांची 'क्रू-क्लक्स क्लॅन' सारखी संस्था सहिष्णू होती असे नाही; पण अमेरिकेत
सेक्युलर सुसंस्कृत वर्गाचे वर्चस्व होते. विद्यापीठांमध्ये, माध्यमांमध्ये, लेखक-विचारवंतांमध्ये या वर्गाच्या प्रभावामुळे भारतीयांना अमेरिकेत जाणे, राहणे, शिकणे, पैसे मिळवणे, करिअर करणे शक्य होत होते.
आक्रमक नवहिंदुत्वाचा प्रभाव भारतीयांवर जसजसा वाढू लागला, तसतसा अमेरिकेत भारतविरोध वाढू लागला. गेल्या २५-३० वर्षात अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये जेवढी मंदिरे उभी राहिली आहेत, तेवढी भारतातीलही कोणत्याही राज्यात बांधली गेली नसतील. मंदिर झाले, की भक्तांच्या मोठ्या जत्रा, जंगी पूजा समारंभ, मिरवणुका आणि आरत्या वगैरेही आलेच. माझ्या एका मित्राने अलीकडे मला सांगितले की, त्यांच्या गावात एक ५०-६० फुटी हनुमान पुतळा उभा केला (असे अनेक राम, शंकर, हनुमान, कृष्ण, अगदी दत्तसुद्धा). काही स्थानिक अमेरिकनांनी या पुतळ्यांमुळे त्या परिसराचे सौंदर्य आणि शहराचे, वाहतुकीचे नियोजन विस्कटून जात आहे, अशा तक्रारी (वा खटले) करायला सुरुवात केली.
अमेरिकेत साठीच्या, सत्तरीच्या आणि अगदी ऐंशीच्या दशकात गेलेले भारतीय हे भारतातील सुसंस्कृत सहिष्णू मध्यमवर्गातले होते. ते श्रद्धाळू असले तरी हिंदुत्ववादी राजकीय संस्कारातले नव्हते. परंतु, नव्वदीच्या दशकात आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस जे भारतीय अमेरिकेत गेले ते भारतातल्या नवहिंदुत्ववादाचे संस्कार घेऊन तिकडे गेले. याच पिढीनंतरच्या भारतीयांचे उत्पन्न कित्येक हजार डॉलरने वाढू लागले होते. भारतीय लक्षाधीश, कोट्यधीश, अब्जाधीश झाले. जे त्या श्रीमंत क्लबमध्ये नव्हते त्यांचीही जीवनशैली सर्वसाधारण अमेरिकन मध्यमवर्गीय कुटुंबापेक्षा खूपच वरच्या दर्जाची होती. अनेक भारतीय कुटुंबांचे आलिशान बंगले, तीन-चार मोटारी, पार्टी कल्चर, उच्च शिक्षणाची संधी हा सर्वसाधारण अमेरिकन मध्यवर्गीयांच्या हेव्याचा आणि असूयेचा मुद्दा होत गेला. भारतीय सुशिक्षित मध्यमवर्गातली मुले-मुली विद्यापीठांमध्येही चमकू लागली.. अमेरिकन अर्थव्यवस्था अरिष्टात येऊ लागल्यावर तेथील स्थानिक मध्यमवर्गीय 'यशस्वी' भारतीयांची नफरत करू लागला. आता त्या नफरतीच्या साथीने जगभर पसरलेल्या सुमारे तीन कोटी भारतीयांना वेढले आहे. ऐहिक जीवनशैली आणि श्रद्धेचे आक्रमक राजकारण याची ही परिणती आहे!
ketkarkumar@gmail.com