बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
By विजय दर्डा | Updated: May 18, 2026 06:47 IST2026-05-18T06:47:14+5:302026-05-18T06:47:31+5:30
NEET Paper Leak Scam: पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून परिश्रम घेतलेले असतात, त्याचे काय? या मानसिक आघाताची भरपाई कोण करणार?

बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
- डाॅ. विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह
नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटणे ही केवळ लाजिरवाणी बातमी नसून, लाखो विद्यार्थ्यांवर हा मानसिक बलात्कार आहे. यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांचे आईवडील आणि कुटुंबीय यांनाही धक्का बसला आहे. कठोर शब्द वापरला त्याबद्दल खेद, पण संताप व्यक्त करण्याला काय पर्याय आहे? आपण तांत्रिकसंदर्भात सक्षम झालो आहोत. कोणताही हस्तक्षेप न करता देशाच्या प्रत्येक भागात निष्पक्ष निवडणूक घेऊ शकत असू तर आपल्याला इमानदारीने एक महत्त्वाची परीक्षा का नाही घेता येत? देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा असा घृणास्पद, अपमानजनक आणि असंवेदनशील व्यवहार आपण त्यांच्याशी कसा करू शकतो? या तरुण मुलांची स्वप्ने पायदळी तुडवून आपण पुढे कसे जाऊ शकू?
या घटनेने परीक्षेला बसलेल्या केवळ त्या २२ लाख ५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनाच मानसिक वेदना दिली नसून भविष्यात या परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यावरही मानसिक आघात झाला आहे; त्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे. आपण कष्ट करणार, पण ज्यांच्या हाती फुटलेला पेपर आधीच पडेल तेच यशस्वी झाले तर? - अशी शंका त्यांच्या मनाला कुरतडणारच! विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असतात. आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतात. नीट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल; आपण चांगले डॉक्टर होऊ असे स्वप्न ते पाहतात. परंतु देशाच्या गुन्हेगारांनी त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केला आहे. हे विद्यार्थी आता पुन्हा परीक्षा देतील; परंतु पहिल्यावेळी जो उत्साह असतो, जे कष्ट घेतलेले असतात त्याची गोष्टच वेगळी असते. पहिल्या वेळची लय तुटली, त्याचे काय? परीक्षार्थींचे आईवडील, बहीण, भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य यांना जो मानसिक त्रास झाला त्याचे काय?
प्रश्नपत्रिका फुटण्याच्या या ताज्या घटनेवर व्यापक चर्चा झाली म्हणून ती परीक्षा रद्द केली गेली. परंतु, अशा प्रकारे परीक्षेमध्ये गडबड घोटाळा होण्याची ही पहिली वेळ अर्थातच नाही. इतिहासात डझनवारी उदाहरणे सापडतील. पूर्वीच्या प्रकरणांत किती गुन्हेगारांना शिक्षा मिळाली? मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळा आठवतो? शेकड्यांनी संशयितांना अटक झाली; फार थोड्या लोकांना शिक्षा मिळाली. या घोटाळ्याची चौकशी चालू असताना किमान ४८ अशा लोकांचा मृत्यू झाला की जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे या प्रकरणात गुंतलेले होते. अनेक मोठ्या लोकांचीही नावे समोर आली; परंतु या कटाचा खरा सूत्रधार कोण होता? हे कळलेच नाही. सरकारने मनात आणले तर माहिती मिळणार नाही, हे शक्य आहे का? - नाही. कुठे ना कुठे मुद्दाम कानाडोळा केला गेला, आणि ‘मोठे मासे’ सुटले.
चौकशी करणाऱ्या संस्थांच्या हाती काही छोटे मासे लागतात. मोठे मासे तर काहीही घडलेले नाही अशा आविर्भावात मुक्त संचार करतात. आणि मगरींचे तर काय सांगावे? त्यांचे तर सगळेच छान छान चाललेले असते.
ताज्या प्रकरणाचा खोलवर जाऊन शोध घेण्याचे काम सीबीआयला दिले आहे. ‘नीट’ची प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणात राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील खंडेला तालुक्यातील समर्थपुरा गावातल्या ज्या राकेश कुमार मंडावरिया याचे नाव समोर आले आहे, तो दहावीनंतर गाव सोडून सिकरला गेलेला होता. पंधरा वर्षांपासून तो तेथेच राहतो. तो काय करतो? - तर गेल्या काही वर्षांपासून तो सिकरच्या पिपराली रोडवरील एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या समोर सल्ला देण्याचे कार्यालय थाटून बसला आहे. तो कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करत नाही. त्या इन्स्टिट्यूटच्या अगदी समोर त्याचे हे कार्यालय आहे; आणि तो कसला सल्ला देतो हे गुलदस्त्यात आहे. त्याच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही; परंतु तो काय करत असेल याचा अंदाज सहज लावता येईल. राकेश जर गुन्हेगार असेल तर तो एकटा असणार नाही. तो एक केवळ मुखवटा आहे. त्याच्या मागे पूर्ण साखळी काम करत असणार. एरवी राजस्थानपासून हरयाणा, बिहार, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणापर्यंत प्रश्नपत्रिका कशा पोहोचतील? शिक्षणतज्ज्ञ खान सर म्हणतात, आपण एक डायपर विकत घेतो तर त्यात कधी गळती होत नाही. परंतु, इतक्या मोठ्या यंत्रणेत गळती कशी होते?- नऊ वर्षांपूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना याचसाठी झाली होती की परीक्षेचे काम पावित्र्य सांभाळूनच व्हावे. परंतु, एजन्सी काम करू लागल्यानंतरसुद्धा परिस्थिती कुठे सुधारली?
प्रश्नपत्रिका फुटणे हा काही सामान्य गुन्हा नव्हे. शिक्षणमाफियांची साखळी त्यात गुंतलेली असते. समाजासाठी ते अमली पदार्थांच्या माफियांपेक्षाही जास्त नुकसानकारक आहेत. कोणी अपात्र व्यक्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाला तर रुग्णांच्या जीविताशी तो कसा खेळ मांडेल याचा आपण केवळ अंदाज करू शकतो. प्रश्नपत्रिका फुटण्यासारखा गुन्हा खरे तर देशद्रोहाच्या श्रेणीत ठेवला पाहिजे. इतकी कठोर शिक्षा दिली पाहिजे की त्या सिंडिकेटमध्ये सहभागी व्हायची हिंमत कोणी
करणार नाही. प्रश्नपत्रिका फोडणे हा एक प्रकारे दहशतवादच आहे.