डोंगर-दऱ्या, नद्या, प्राणी-पक्षी, माणूस आणि माधव गाडगीळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 04:40 IST2026-01-09T04:39:33+5:302026-01-09T04:40:16+5:30
माधव गाडगीळ यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लढणाऱ्या व्यक्ती, छोट्या संस्थांना बळ दिले. त्यांच्या मांडणीत तळागाळातील ‘माणूस’ नेहमीच केंद्रस्थानी असे.

डोंगर-दऱ्या, नद्या, प्राणी-पक्षी, माणूस आणि माधव गाडगीळ!
अभिजित घोरपडे, संस्थापक, भवताल पर्यावरण अभ्यासक
साधारण पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. हिवरे-बाजार गावचा कायापालट करणारे सरपंच पोपटराव पवार यांचा फोन आला. मी, माधव गाडगीळांना त्यांच्या गावाला घेऊन यावं, अशी विनंती होती. एके दिवशी सकाळी गाडगीळ, मी आणि पोपटरावांचा एक कार्यकर्ता असे हिवरे-बाजारकडे निघालो. वाटेत नास्ता करताना पिण्यासाठी त्यांच्यासाठी बाटलीबंद पाणी मागवले; पण बाटलीतले पाणी नाकारून गाडगीळ स्थानिक पाणीच प्यायले. ते म्हणाले, इथले स्थानिक लोक हे पाणी पितातच ना, मग आपणही ते प्यायला काय हरकत आहे? अगदी त्रास झालाच तर एखादा दिवस होईल; पण त्याच्यामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढेल हे निश्चित... त्यानंतर हिवरे-बाजार गावाच्या भेटीत तिथे पुनरुज्जीवित झालेल्या झऱ्यांचे पाणी आम्ही सर्वजण तोंड लावून प्यायलो. अशा वेगवेगळ्या भेटींमधून, प्रसंगांमधून आणि गप्पांमधून गाडगीळांची ओळख होत गेली.
एकदा त्यांच्याशी गप्पांमध्ये विषय निघाला रंगाचा आणि सौंदर्याचा. आपल्याकडे त्वचेच्या गोऱ्या रंगाला सौंदर्याशी अगदी अलीकडच्या काळात जोडले गेले असे त्यांचे मत होते. रंगावरून सुंदर असणे किंवा नसणे ही मांडणी त्यांना अगदीच नापसंत होती. त्यासाठीचे दाखले देताना ते द्रौपदीचे उदाहरण देत. त्याबाबतचे संदर्भ, दाखले वाचले तर ती त्या काळातील सौंदर्यवती असल्याचे समजते; पण त्याच वेळी तिचा रंग काळा होता हेही तिच्या वर्णनावरून समजते. त्यामुळे सुंदर असण्याचा आणि गोऱ्या रंगाचा मुळीच संबंध नव्हता. उलट आपल्याकडे काळा हा सौंदर्याचा रंग होता, असे ते म्हणत. इंग्रजांच्या प्रभावामुळे अलीकडच्या काळात त्वचेच्या गोऱ्या रंगाला अनाठायी महत्त्व प्राप्त झाल्याचे ते सांगत.
गाडगीळांच्या बोलण्यात सरकारी कारभारावर, विशेषत: वनविभागावर रोष जाणवत असे. वनांचे संरक्षण हे लोकांच्या सहभागातूनच होऊ शकते. वनविभागाच्या बंधनांमुळे वनांमध्ये राहत असलेल्या लोकांना, मुख्यत: आदिवासींना नाहक त्रास होत असल्याचे त्यांचे ठाम मत होते. त्यांना त्रास होत असतानाच वनांचे रक्षणही होत नसल्याची मांडणी ते करत. वनजमिनी मोठमोठ्या भांडवलदारांना देऊन खाणींसाठी जंगले तोडली जातात आणि आदिवासींनी त्यांच्या गरजांसाठी चार फांद्या तोडल्या तर तो मोठा गुन्हा ठरवला जातो... संवर्धनाच्या नावाखाली अशा विसंगतींवर गाडगीळ अचूक बोट ठेवत. हीच बाब नद्या आणि इतरही नैसर्गिक स्त्रोतांनाही लागू असल्याचे ते वेळोवेळी मांडत आणि सरकारी कारभारावर कोणतीही भीडभाड न बाळगता थेट टीका करत.
पर्यावरण संवर्धनासाठी गाडगीळांच्या मांडणीत तळागाळातील माणूस केंद्रस्थानी असे. त्यातूनच ते वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असल्यामुळे नियंत्रित पद्धतीने शिकारीला परवानगी देण्याची पाठराखण करत. या मुद्द्यामुळे त्यांच्यावर बरीच टीकाही झाली; पण वानरे, मोर, बिबटे, गवे-हत्ती यांच्यामुळे होणारे नुकसान पाहता ‘त्यांचा बंदोबस्त करणार की केवळ हाताची घडी घालून गप्प राहणार?’ असा त्यांचा सवाल असे. कितीही टीका झाली तरी ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते.
मुंबईत भटक्या पारव्यांचा मुद्दा पेटलेला असताना माझ्या एका लेखाबाबत चर्चा सुरू असताना गाडगीळांशी ‘आहारातील विविधता’ यावर सविस्तर चर्चा झाली. शाकाहार करावा की मांसाहार? हा मुद्दा नेहमी चर्चेत असतो; पण ‘कोणी काय खावे यात इतरांनी का पडावे?’ हे गाडगीळ यांचे मत. पारव्यांना आपल्यापासून दूर राखण्यासाठी बरेच उपाय केले जातात; पण त्यावरची सोपी मात्रा म्हणजे- ही समस्या फासेपारधी समाजावर सोपवावी. त्यांच्यासाठी प्रोटिनचा उत्तम स्त्रोत निर्माण होईल आणि पारव्यांची समस्याही सुटेल. आहारातील विविधता महत्त्वाची आहे. पारवे हे काही जणांचे अन्न असते, तर काहींचा प्रोटिनचा स्त्रोत मुंग्या असतात... त्यात इतरांची ढवळाढवळ कशाला?... इति माधव गाडगीळ !
गेले आठवडाभर केरळच्या दौऱ्यावर होतो. तिथे पश्चिम घाट आणि पर्यावरणासंदर्भात काम करणारे अनेक कार्यकर्ते भेटले. त्यांनी गाडगीळ यांची आठवण काढली. कारण त्यांच्या छोट्या-छोट्या गटांशी आणि त्यांच्या लहान-मोठ्या कामांशी गाडगीळ यांचा थेट संपर्क होता. तो जसा पश्चिम घाटासंदर्भातील संस्थांशी होता, तसाच तो मेळघाट, विदर्भ, कोकण आणि अनेक राज्यांमधील संस्थांशीही होता. कोणत्याही मोठ्या संस्थांपेक्षा लहान संस्था, गट यांच्याशी जोडलेले राहणे आणि त्यांना बळ देणे हे त्यामागचे कारण. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लढणाऱ्या व्यक्ती, संस्थांना बळ दिले आणि या विषयाला वेगळा आयामही दिला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
abhighorpade@gmail.com