न जन्मलेल्या मुलांचे खिसे आपण कापतो आहोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 07:55 AM2023-08-15T07:55:24+5:302023-08-15T07:57:38+5:30

सगळेच आपण खाऊन संपवले तर आपलीच मुले, नातवंडे उद्या या देशात जगायला येतील तेव्हा त्यांना काय मिळेल?

maharashtra development and roadmap and impact consequence | न जन्मलेल्या मुलांचे खिसे आपण कापतो आहोत!

न जन्मलेल्या मुलांचे खिसे आपण कापतो आहोत!

googlenewsNext

- डॉ. अजित रानडे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुल, प्रख्यात अर्थतज्ज्ञ.

मुलाखत : संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणे

मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे तुम्ही सदस्य आहात. त्याबद्दल काय सांगाल?

पहिला टप्पा आहे तो 'वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'. तिथवर पोहोचायला किती काळ लागेल, हे आताच सांगणे कठीण पण वेगाने जायचे आहे, हे नक्की. महत्त्वाचे मुद्दे तीन वेगवान विकास, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक विकास कोणीच मागे राहून चालणार नाही, असा विकास आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेले देशातले शंभर जिल्हे नीती आयोगाने शोधले आहेत. पंतप्रधानांच्या या 'अॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स'मधले १२ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. गडचिरोली असो अथवा वाशिम किंवा नंदुरबार, विकास सर्वदूर पोहोचायला हवा. एखादाच जिल्हा अथवा एखादे शहर विकसित झाल्यामुळे विकासापेक्षाही विषमता अधिक वाढते.

अर्थकारणामध्ये एक सिद्धांत आहे. 'ट्रिकल डाऊन', म्हणजे ज्या क्षेत्रांचा विकास होतो, ती समृद्धी खालच्या स्तरांपर्यंत झिरपत जाते. सॉफ्टवेअर उद्योगातून अनेक नवे रोजगार निर्माण झाले. एखादे शहर 'आयटी हब' होते, तेव्हा 'डे केयर सेंटर'पासून ते अगदी चहाच्या टपरीपर्यंत अर्थार्जनाच्या अनेक संधी निर्माण होतात; पण हा सिद्धांतही तपासावा लागतो. अनेक वेळा एकाच क्षेत्रात प्रचंड विकास झाल्यानंतर विषमता वाढते. विषमता कमी झाली तर विकासाला खरा अर्थ आहे

पण हे होणार कसे?

'केंद्रीकरण' ही आपल्यासमोरची सगळ्यात मोठी अडचण आहे. महाराष्ट्राचे अर्थकारण मोजक्या शहर- जिल्ह्यांमध्ये एकवटलेले आहे. मुंबई-पुण्यामध्येच उद्योग एकवटतात, कारण या जिल्ह्यांमध्ये तशी 'इकोसिस्टीम' तयार झाली आहे. समजा, मला गडचिरोलीमध्ये कंपनी सुरू करायची आहे, तर तिथे मला कुशल कामगार मिळायला हवेत, त्या कामगारांच्या मुलांसाठी चांगल्या शाळा असायला हव्यात. तसे दळणवळण हवे. तसे नसल्याने या सोयी जिथे आहेत, तिथे केंद्रीकरण वाढत जाते. यावर मात करायची तर 'कनेक्टिव्हिटी वाढायला हवी. तशा 'इकोसिस्टीम' उभ्या राहायला हव्यात.

आपल्या देशाच्या अर्थकारणाची प्रकृती नेमकी कशी आहे?

जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलो, तरी दरडोई उत्पन्नाचा विचार करता आपण जगात १४४व्या क्रमांकावर आहोत. म्हणजे अर्थकारणाचा आकार या निकषावर आपण अगदी ब्रिटनच्याही पुढे गेलो, तरी दरडोई उत्पन्नाचा विचार करता आपली अवस्था बांगलादेशपेक्षाही वाईट आहे. मानवी विकास निर्देशांकात बांगलादेश आपल्या पुढे आहे. १९७१ मध्ये बांगलादेश जन्माला आला, तेव्हा त्याला 'बास्केट केस' म्हटले गेले. तोच नवखा देश आज कपड्यांच्या निर्यातीमध्ये खूप पुढे गेला आहे. आपण कुठे आहोत? मानवी विकास निर्देशांकात पुढला पल्ला गाठायचा, तर केंद्रीकरण आणि विषमता यापासून स्वातंत्र्य मिळणे अपरिहार्य !

खरा विकास कशाला म्हणायचे?

तुम्ही फ्रान्सला कधी गेलात तर ज्या हॉटेलात राहाल, तिथे पाण्याची बाटली दिसणार नाही मग तुम्ही रिसेप्शनला फोन कराल तर उत्तर मिळेल, पाण्याची बाटली कशाला हवीय? बेसीनला नळाचे जे पाणी येतेय तेच पिण्याचे स्वच्छ पाणी!' सार्वजनिक वापरासाठी पुरवलेले जे पाणी नळाला येते, ते डोळे झाकून पिता येणे म्हणजे विकास. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून श्रीमंतांनीही स्वेच्छेने प्रवास करणे म्हणजे विकास सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलांना श्रीमंतांनीही स्वेच्छेने प्रवेश देणे म्हणजे विकास. सार्वजनिक रुग्णालयात श्रीमंतांनीही स्वेच्छेने उपचार घेणे म्हणजे विकास!

वाढत्या शहरीकरणाबद्दल आपल्याला काय वाटते?

गांधीजी म्हणाले होते, 'प्रत्येकाची गरज भागू शकेल एवढे पृथ्वीकडे नक्कीच आहे; पण तुमच्या हावरटपणावर तिच्याकडेही उपाय नाही त्या महात्म्याचे ते वाक्य आज कधी नव्हे इतके महत्त्वाचे झाले आहे. आजच्या विकासाची किंमत येणाऱ्या पिढ्यांना चुकवावी लागते. जी मुले अद्याप जन्मालाच आलेली नाहीत, त्यांचा खिसा आज आपण कापतो आहोत. आपण झाडे तोडतो, नद्या संपवून टाकतो, ही केवळ पर्यावरणाची हानी नाही तर उद्याच्या पिढ्यांची संपत्ती आपण चोरतो आहोत, याचे भान आपल्याला असले पाहिजे. जी मुले उद्या या देशात जगणार आहेत, त्यांना 'आज' मतदानाचा हक्क नाही, तो असता, तर त्यांनी आपल्याला दरोडेखोर ठरवले असते. अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये 'नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन' असा मुख्य मुद्दा होता. आम्हाला प्रतिनिधित्व नसेल तर तुमचा कर आम्ही भरणार नाही, असे थेट ऐलान ! त्यातून पुढे फ्रेंच राज्यक्रांती झाली. या मुद्द्याने इतिहास घडवला. आपण तर आपल्या हावरटपणामुळे पुढच्या पिढीवर कर लावून बसलो आहोत.

आपल्याला विकासाचे समकालीन प्रारूप ठरवावे लागेल. शहरीकरण थांबवा, असे मी म्हणत नाही; पण दरडोई उत्पन्नाकडे लक्ष द्या. नैसर्गिक संपत्तीकडे बघा. पूर्वी मी सिंहगडावर जायचो, तेव्हा बिस्किटाच्या पुढयाचा कागद खाली पडला तर लोक सांगायचे, “तो उचलून खिशात ठेव. नंतर कचरापेटीत टाक. तुमच्यानंतर जो कोणी येईल, त्याला इथे आल्यानंतर प्रसन्न वाटायला हवे.' - आपण आज एकूणच कचरा करून ठेवलाय. नद्या, समुद्र, हवा सगळे आपण प्रदूषित करतो आहोत. आपलीच मुले नातवंडे उद्या या देशात जगायला येतील, तेव्हा त्यांना काय मिळेल?

उद्याच्या पिढ्यांचे भविष्य हिरावून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही.. हे टाळता येऊ शकते. अजूनही वेळ गेलेली नाही..


 

Web Title: maharashtra development and roadmap and impact consequence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.