सह्याद्रीचा सखा गेला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 04:29 IST2026-01-09T04:28:27+5:302026-01-09T04:29:10+5:30
डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटावर संशोधन केले. महत्त्वाचा अहवाल तयार केला.

सह्याद्रीचा सखा गेला !
माणसांच्या दुःखांचा शोध घेण्यासाठी हिमालयात अथवा सह्याद्रीच्या गुहेत जाणारे ऋषी आपल्याला ठाऊक आहेत. मात्र, या डोंगररांगांचेही अश्रू पुसणारा असा एक वात्सल्यसिंधू ऋषी महाराष्ट्राने पाहिला. माधव गाडगीळ हे त्यांचे नाव. ‘भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा…’ ही ओळ ज्याच्या कानांवर पडली नाही, असा मराठी माणूस नाही ! सह्याद्री हा आपल्या अस्मितेचा मुद्दा आहेच, पण सह्यकड्यांच्या अस्तित्वाचे काय, हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित केला तो डॉ. माधव गाडगीळांनी. त्यांनी दिलेला इशारा वेळीच ऐकला असता, तर माळीण नावाचं टुमदार गाव होत्याचं नव्हतं झालं नसतं. इर्शाळवाडीची दुर्घटनाही मग टाळता आली असती.
डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटावर संशोधन केले. महत्त्वाचा अहवाल तयार केला. निसर्ग आणि पर्यावरणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत सजग असणारे डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत, मात्र त्यांनी उभे केलेले सह्याद्रीएवढे काम आजही आपल्यासोबत आहे. भारताच्या पर्यावरण चळवळीचे जे काही इतिहासलेखन होणार आहे, त्यातून माधव गाडगीळ हे नाव टाळणे म्हणजे सह्याद्रीच्या रांगेतून पश्चिम घाट काढून टाकणे. भारतात पर्यावरण हा बराच काळ भोंगळ रोमँटिकवादाचा विषय होता. निसर्गाच्या सौंदर्याची गाणी गायची; पण पर्यावरण, विकास आणि आदिवासी यांच्यातील गुंतागुंत कोण समजून घेणार? त्यावर धोरण कोण सुचविणार? तो इशारा देण्याचे धैर्य कोण दाखविणार? ती कमतरता गाडगीळांनी भरून काढली. आपला वारसा किती समृद्ध आहे आणि तो कसा जपला पाहिजे, हे गाडगीळ अखेरच्या क्षणापर्यंत सांगत राहिले. खुद्द गाडगीळांचाही वारसा फार मोठा. त्यांचे वडील डॉ. धनंजय गाडगीळ. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ.
महाराष्ट्रातल्या एका जलविद्युत प्रकल्पाला त्यांच्या वडिलांनी भेट दिली, तेव्हा पोरवयातले माधव त्यांच्यासोबत होते. त्या परिसरात प्रचंड जंगलतोड सुरू होती. ते बघून वडील छोट्या माधवला म्हणाले, ‘आपल्याला वीज हवी आहे. औद्योगिक प्रगती करायची आहे. पण त्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करायचा का?’ विकास करताना ‘ॲट विच कॉस्ट?’ हा प्रश्न विचारायला हवा. पर्यावरणाची भयंकर किंमत मोजून हा कथित विकास होता कामा नये, याबद्दल गाडगीळ अखेरच्या क्षणापर्यंत सजग होते.
संशोधक आणि अकॅडमिशियन म्हणून डॉ. गाडगीळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे होतेच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे, ही त्यांची आंतरिक तळमळ होती. त्यामुळेच अनेक अवघड विषय त्यांनी मराठीमध्ये आणले. त्यांनी केलेले संशोधन अत्यंत मूलगामी होते. त्यांच्या संशोधनाला आंतरशाखीय अधिष्ठान होते. पश्चिम घाट हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. स्थानिक लोकांना बरोबर घेत त्यांनी जैवविविधता अभ्यासली. ईशान्य भारतात जाऊन तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळेच जैवविविधता आणि जंगल या संदर्भातील महत्त्वाचे कायदे प्रत्यक्षात आले.
साठ वर्षांपूर्वी जीवशास्त्र, संगणकशास्त्र यांचे प्रगत शिक्षण अमेरिकेत घेतल्यानंतर तिथे त्यांना अनेक संधी होत्या. मात्र, ठरवून ते भारतात परतले. महाराष्ट्रातील देवराई असो की हत्तींची मोजदाद, व्याघ्र प्रकल्प असो अथवा जैवविविधतेची सूची हे सगळे त्यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकले नसते. गाडगीळांचे आणखी मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पर्यावरणाचा हक्क हा केवळ वैज्ञानिक किंवा प्रशासकीय विषय नसून, तो लोकशाहीचा मुद्दा आहे, सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे, हे त्यांनी वारंवार मांडले. ‘बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ ही कल्पना तर आदिवासी आणि स्थानिक ज्ञानाला शोधनिबंधांइतकेच महत्त्वाचे स्थान देणारी. निसर्गाची आणि जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा हा शास्त्रज्ञ फक्त प्रयोगशाळेत रमणारा नव्हता. मुळात हा संशोधक कवी मनाचा. त्यांच्या एका पुस्तकाचे नावही, ‘सह्याचला आणि मी : एक प्रेम कहाणी’ असे आहे !
महाविद्यालयीन जीवनात लांब उडीमध्ये अजिंक्य असलेल्या माधव यांची बौद्धिक झेप तेवढीच विलक्षण होती. त्यांच्या अनेक इशाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष केले हे खरे, मात्र त्यांनी सांगितलेले जे ऐकले, त्यामुळेच रत्नागिरी अथवा सिंधुदुर्गमधले पर्यावरण उद्ध्वस्त होण्यापासून वाचले तरी ! एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे त्यांनी पर्यावरणावर प्रेम केले. बिबट्या आणि मानव असा जो संघर्ष उभा राहिला, त्यावर त्यांनी घेतलेली भूमिका प्रचलित धारणांना धक्का देणारी होती. माळीण, इर्शाळवाडीसारखी गावे गमावल्यानंतर, वायनाडमधील आपत्तीनंतरही अरवलीच्या पर्वतरांगांचे अश्रू आपल्याला सहजी दिसू नयेत, अशी स्थिती आज आहे. अशावेळी डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाचे दुःख डोंगराएवढे आहे !