जयशंकर, गुहा, लिफ्टन, ट्रम्प आणि बुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 07:41 PM2020-02-22T19:41:45+5:302020-02-22T19:43:05+5:30

सरदार हे ‘भारतीय लोकशाहीचे स्तंभ’ असल्याचे नेहरूंनीच नमूद केले असून हे माउंटबॅटन यांच्या सल्ल्यावरून असू शकत नाही, हे स्पष्टच आहे.

Jaishankar, ramchandra guha, Lyfton, Trump and Buddha! | जयशंकर, गुहा, लिफ्टन, ट्रम्प आणि बुद्ध!

जयशंकर, गुहा, लिफ्टन, ट्रम्प आणि बुद्ध!

Next

- डॉ. मुकुल पै रायतुरकर 

नारायणी बसू यांनी माजी सनदी अधिकारी, संविधानविषयक सल्लागार व भारताच्या फाळणीच्या वेळी प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारे राजकीय सुधारणा आयुक्त व्ही. पी. मेनन यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच देशाचे परराष्ट्रमंत्री  एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकातील कही संदर्भ वापरून जयशंकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अशी प्रतिक्रिया दिली की पंडित जवाहरलाल नेहरूंना आपल्या पहिल्या मत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेलांचा समावेश करण्याची इच्छा नव्हती; लॉर्ड माउंटबॅटन यांनी आग्रह केल्यामुळेच पटेलांचा समावेश नेहरूंनी मंत्रिमंडळात केला.

या ट्विटची दखल तात्काळ घेतली ती इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी. परराष्ट्र मंत्र्यांनी खोटय़ा बातम्यांचा प्रसार करू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. माजी मंत्री जयराम रमेश आणि शशी थरूर यांनीही सक्षम ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि तारीखवार पत्रव्यवहाराचे पुरावे देत नेहरूंनी स्वेच्छेनेच सरदारांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते, हे सिद्ध करून दाखवले. सरदार हे ‘भारतीय लोकशाहीचे स्तंभ’ असल्याचे नेहरूंनीच नमूद केले असून हे माउंटबॅटन यांच्या सल्ल्यावरून असू शकत नाही, हे स्पष्टच आहे. मात्र, फ्रँक मोराईश यांनी लिहिलेल्या ‘विटनेस टू एन इरा’ या पुस्तकातील मजकूर जयशंकर यांचे प्रतिपादन खरे असल्याचे सांगतो.

इथे सत्य काहीही असले तरी सगळे प्रयत्न चालले आहेत ते भूतकाळावर नियंत्रण मिळवण्यासाठी भूतकाळावर स्वामित्व मिळवत वस्तुस्थितीलाही आपल्या कलाने करून घ्यायचे आणि अशा प्रकारे भविष्यालाही आपल्याला अनुकूल करायचे, यासाठीच. वस्तुस्थितीवर कब्जा करायची अशा प्रकारची धडपड तेव्हाच सुरू होते जेव्हा वैचारिक एकाधिकारशाहीच्या सन्मुख आपण येत असतो. बहुतेक वेळा वैचारिक एकाधिकारशाहीचे समर्थक आपणच केवळ सत्याचे प्रवर्तक असल्याच्या थाटात एखादे स्वत:भोवती फिरणारे सत्य ‘पिकवतात’ आणि जनतेला सादर करतात. वैचारिक वा राजकीय एकाधिकारवाद ही मानसिक शिकार साधण्यासाठीची पूर्वतयारी असते, असे डॉ. रॉबर्ट जेय लिफ्टन सांगतात.

अमेरिकी वायुदलासाठी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाण-या लिफ्टन यांनी चिनी विचार प्रक्रियेचा सूक्ष्म अभ्यास केला होता. मनोनियंत्रणावरल्या संशोधकाचे पितृत्व त्यांच्याकडे जाते. ‘लुजिंग रियालिटी’ या आपल्या पुस्तकात डॉ. लिफ्टन म्हणतात, ‘मानसिक शिकार करू पाहाणारे केवळ व्यक्तींच्या मनांना जमेस धरत नसतात तर वास्तवावरही कब्जा करण्याची त्यांची धडपड असते.’
आपल्याला हवी तशी सत्यनिर्मिती करणा-यांचे उदाहरण म्हणून डॉ. लिफ्टन यांनी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण दिलेले आहे.

Image result for robert jay lifton

डॉ. लिफ्टन असेही म्हणतात की ‘वैचारिक एकाधिकारवाद आणि पंथांशी साधर्म्य असलेले वर्तन केवळ एकमेकांत बेमालूम मिसळणारेच नव्हे तर दोन्ही एकाच अस्तित्वाचे भाग आहेत.’ आजचे जग जलदगतीने धावत सुटले आहे. अशा परिस्थितीत आपल्या समाजात वावरणा-या व मानसिक शिकार करण्यास टपलेल्या घटकांनी निर्मिलेल्या पर्यायी सत्याला आपण बळी पडू नये आणि वास्तवाचे आपले भान सुटू नये, यासाठी एखाद्याने कशी ज्ञानप्राप्ती करावी? कसे काय सतर्क राहावे?

शेवटी, गौतम बुद्धानेच तर सांगितले आहे की सत्याला मिथ्यापासून वेगळे करण्याची क्षमता लाभणे म्हणजेच आत्मज्ञानाची प्राप्ती होणे. जे कल्पित आहे त्याचा कल्पित म्हणूनच स्वीकार करणे आणि जे सत्य आहे ते तसेच स्वीकारणे, हाच तर एखाद्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्याचा संकेत. सजग राहणे, भवतालाचे भान ठेवणे, शास्त्रीय चिकित्सेला अभिप्रेत असलेली चौकस बुद्धी वापरून संशोधनाच्या, तपासाच्या साधनाचा समग्र वापर करणे, हाच मला तरी यावरला उतारा वाटतो. तसे केले तरच आपण भोवतालच्या शिकारी वृत्तीपासून आपल्या जाणिवांचा बचाव समर्थपणे करू शकू. 

Web Title: Jaishankar, ramchandra guha, Lyfton, Trump and Buddha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Twitterट्विटर