शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णुतेकडून असभ्यतेकडे

By admin | Updated: December 22, 2015 23:35 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि जेटली यांच्याच पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांच्या दरम्यान गेल्या सप्ताहापासून जो जाहीर संवाद सुरु आहे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि जेटली यांच्याच पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांच्या दरम्यान गेल्या सप्ताहापासून जो जाहीर संवाद सुरु आहे व जो देशातील जनतेच्या कानी पडत आहे, तो संवाद पाहाता इतके दिवस देशात जाणवत असलेले असहिष्णुतेचे वातावरण तसेच कायम राहून आता त्यात असभ्यतेचीही भर पडत चालल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. राजकारण सत्तेसाठीच करावयाचे असते आणि ती प्राप्त करण्यासाठी स्वकर्तृत्व गाजविण्यापेक्षा प्रतिपक्षावर हल्ले करत राहून त्याच्या तुलनेत आपण कसे उजवे आहोत हे जनतेच्या मनावर बिंबवित राहाणे हाच खरा राजमार्ग होय हे आता देशातील समस्त राजकीय पक्षांनी जवळजवळ गृहीतच धरले आहे. एकदा हल्लाच करायचा म्हटले की मग त्यात विधिनिषेधाला आणि सच्चेपणाला जागाच नसते. त्यातूनच मग दिल्लीसारख्या राजधानीच्या शहराचा मुख्यमंत्री पंतप्रधानास मनोरुग्ण ठरवितो, केन्द्रीय अर्थमंत्र्याला आव्हान देतो, अर्थमंत्रीही मग प्रतिआव्हान देतो आणि अर्थमंत्र्याचाच एक सहोदर त्याला नपुंसक हे विशेषण बहाल करतो व त्याचा गवगवा झाल्यानंतर आपले ट्विटर खाते कुणीतरी हॅक केले व त्यानेच हा उद्योग केला असावा असा खुलासा करुन मोकळा होतो. हे सारे सूडसत्राच्याही पलीकडे जाणारे आहे. देशाचे राजकारण असभ्यतेच्या इतक्या गंभीर वळणावर आजतागायत कधी गेले नव्हते. सार्वजनिक जीवनात आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्यांची शहानिशा करण्याची विशिष्ट पद्धतही निर्धारित असते. पण आता तिच्यावरही कोणाचा विश्वास राहिलेला नाही असे दिसते. देशाचे वातावरण बिघडण्यास सुरुवात झाली ती सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांकरवीच केल्या गेलेल्या धार्मिक विद्वेषाच्या काही अत्यंत आक्षेपार्ह कृती आणि उच्चारलेल्या उक्तींपायी. त्यातूनच देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण होत असल्याचे स्पष्टपणाने प्रतीत होऊ लागले. पण त्याचा अटकाव करण्यास कोणीही समोर येत नसल्याचे पाहून समाजातला जो वर्ग अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो, त्या साहित्यिक, कलाकार आणि विचारवंत यांनी त्यांच्या प्रकृतीला मानवेल अशा पद्धतीने अत्यंत सौम्यपणे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यासाठी काहींनी मग त्यांना भूतकाळात प्राप्त झालेले पुरस्कार परत करण्याचा मार्ग स्वीकारला. खरे तर सरकारही तितकेच संवेदनशील असते तर याची तत्काळ दखल घेतली गेली असती. पण तसे झाले नाही. सरकारची याबाबतची प्रतिक्रिया काय आणि कशी होती याचे दर्शन अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नागपुरात घडविले. एका संस्थेने त्यांचा सन्मान केला असता, आपण हा सन्मान कधीही परत करणार नाही, असे उद्गार काढून त्यांनी कदाचित उपस्थित श्रोत्यांची पळभर करमणूक केलीही असेल पण या करमणुकीमागील भाव मात्र टवाळीचा आणि टिंगलीचा होता हे निर्विवाद. वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधातील निषेधाचा संबंध राज्यकर्त्या पक्षाने बिहारातील विधानसभेच्या निवडणुकीशी लावला आणि ती निवडणूक पार पडताच निषेध होणे बंद झाले असे सांगून एकप्रकारे असहिष्णुता नाही आणि कधी नव्हतीच असेच सूचित केले. जर असहिष्णुतेचा संबंध बिहारच्या निवडणुकीशी होता तर मग आजच्या असभ्यतेचा संबंध कशाशी आहे आणि असभ्यतेच्या या खेळात सत्ताधारी पक्षातील अनेक बडी प्रस्थे सामील झाली आहेत ती कशासाठी याचेही उत्तर मिळायला हवे. पण ते देणार कोण? ते दिले पाहिजे सत्ताधारी पक्षाचे कुटुंब प्रमुख आणि आजचे देशाचे नेते पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी. अर्थमंत्री जेटली यांच्या प्रेरणेने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयावर सीबीआयने धाड टाकली आणि प्रत्युत्तर म्हणून केजरीवाल यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जेटलींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले तेव्हांच त्यात भाजपाचे एक खासदार आणि माजी क्रिकेट खेळाडू कीर्ती आझाद सहभागी होऊ इच्छित होते. परंतु त्यांना म्हणे त्यांच्या पक्षातील काही ज्येष्ठांनी सबुरीचा सल्ला दिला. हा सल्ला जेमतेम चोवीस तास टिकला. रविवारी त्यांनी पत्रकार परिषद बोलावून दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा पाढा नव्हे तर पाढे वाचले. परंतु खुबीने त्यांनी त्यात अरुण जेटली यांचे नाव घेतले नाही. सोमवारी संसदेत या विषयावर चर्चा सुरु असताना मात्र त्यांचा जेटलींशी सामना झाला. केवळ तितकेच नव्हे तर आपल्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा असे आव्हानही त्यांनी जेटलींना दिले. याचा अर्थ इतके दिवस असहिष्णुतेपायी जी आग लागली होती ती भाजपाच्या घराबाहेर होती पण आता ती थेट घरातच लागली आहे. परंतु तसे असतानाही मोदी स्थितप्र्रज्ञाच्याच भूमिकेत वावरावेत हे आश्चर्यकारक आहे. वास्तविक पाहाता मोदी यांची प्रतिमा वाजपेयी यांच्या प्रतिमेसमान नेमस्थ अशी नाही. ते जहालपंथी म्हणून ओळखले जातात. त्यांचा केवळ पक्ष आणि सरकारच नव्हे तर पक्षाची मातृसंस्था असलेल्या संघावरदेखील धाक असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ त्यांनी मनात आणले तर किमान त्यांच्या पक्षातील लोकांच्या असभ्यतेला सभ्यतेच्या वळणावर आणू शकतात. पण ‘मला काय त्याचे’ ही त्यांची भूमिका कायम राहिली तर या असभ्येतनंतर पुढे काय असेल?