Interpretation - What do movie stars do on the ground? | अन्वयार्थ - सिनेमातल्या तारे-तारकांचे जमिनीवर काय काम?

अन्वयार्थ - सिनेमातल्या तारे-तारकांचे जमिनीवर काय काम?

वसंत भोसले

निवडणुका जाहीर झाल्या की, अनेक हौसे गवसे राजकीय व्यासपीठावर मिरवायला पुढे येतात. यामध्ये चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांचा भरणा मोठा असतो. त्यापैकी बहुतांश जण कसलीही राजकीय पार्श्वभूमी, वैचारिक धारणा नसताना केवळ सिनेसृष्टीतील प्रसिद्धीचे वलय घेऊन गर्दीत सामील होतात. काही जण निवडणुकाही लढवितात तसेच सत्ताधारी राजकीय पक्षांचा वरदहस्त  घेऊन राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करतात.  आपल्या लोकप्रियतेचा वापर करीत सार्वजनिक सभा, मेळावे , रॅलीमध्ये गर्दी खेचण्याचा प्रयत्न करतात. ती गर्दी केवळ तात्कालिक आणि भावनिक असते. राजकीय पक्षदेखील त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करून घेतात. काही सिनेतारका किंवा अभिनेते चक्क त्याला पैसा कमावण्याचे साधन बनवून टाकतात. एका मतदारसंघात एका राजकीय पक्षाचा प्रचार करतात आणि दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्याच पक्षाचा!  - हे तर फारच हास्यास्पद!                                       

आता पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. त्यापैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या  राज्यात स्थानिक भाषेचा, संस्कृतीचा मोठा बोलबाला. तेथील नाट्य आणि सिनेसृष्टी समृद्ध आहे. परिणामी या क्षेत्रातील कलावंतांची  राजकीय लुडबुड सुरू होणे तसे स्वाभाविकच! मूळ बंगाली असलेले आणि  हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावलेले मिथुन चक्रवर्ती यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.  राजकीय व्यासपीठावर जाणे त्यांच्यासाठी नवीन नाही. पश्चिम बंगालमध्ये ज्या पक्षाचे वारे वाहत राहिले तसे ते फिरत राहिले आहेत. त्यांनी नक्षलवादी चळवळीचेही समर्थन केले होते. दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या  तृणमूल काँग्रेसची हवा असताना मिथुन यांनी त्या पक्षात प्रवेश केला. तृणमूलकडून राज्यसभेवरही गेले. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. काही अपवाद वगळता सिने अभिनेत्यांच्या  राजकीय कामात सातत्य राहत नाही, असा अनुभव आहे. चित्रपट सृष्टीतील लोकप्रियतेवर मतदार मते देतात आणि नंतर हे तारे गायब झाले, की मतदारांवर पश्चात्ताप करून घेण्याची वेळ येते. रामायण मालिकेतील दीपिका चिखलिया बडोद्यातून निवडून आल्या आणि मुंबईत राहू लागल्या. धर्मेंद्र राजस्थानातील बिकानेरमधून निवडून आले आणि परत तिकडे फिरकल्याचेही ऐकिवात नाही. वायव्य मुंबई मतदारसंघातून गोविंदा याने ज्येष्ठ संसदपटू राम नाईक यांच्या विरूद्ध निवडणूक लढवून मोठे मताधिक्य घेतले  आणि काहीच काम केले नाही. मतदार एका चांगल्या संसदपटूला कायमचे मुकले. शहेनशहा अमिताभ बच्चन यांची कहाणीही तशीच आहे.  राजीव गांधी यांचे मित्र म्हणून काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने अलाहाबाद (आताचे प्रयागराज) मधून बच्चन निवडून आले. त्यांनी काय काम केले, ते लोकांनाही आठवत नाही. जयाप्रदा एकदा उत्तर प्रदेशातील रामपूरच्या खासदार होत्या. मूळच्या तेलंगणातील गोदावरी तीरावरील राजमुंद्रीच्या. मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आल्या आणि  एकदम रामपूरच्या खासदार झाल्या. 
 

चित्रपटसृष्टीतील लोकप्रियता वेगळी आणि राजकीय कारकीर्द वेगळी असते. हा फरक मतदारही करायला विसरतो. लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे सोपे नसते, हे या कलावंतांच्याही लक्षात येत नाही. काही मोजके चित्रपट कलावंत अपवाद आहेत पण ते केवळ आपल्या लोकप्रियतेवर अवलंबून राहीले नाहीत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी निभावली, लोकांच्या आकांक्षांशी स्वतःला जोडून कसे घ्यावे याचे पाठ गिरवले आणि अंमलात आणले म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द घडली. एम.जी. रामचंद्रन, जयललिता, करूणानिधी, एन,टी. रामाराव आदींनी ठाम राजकीय भूमिका घेत पक्षाची स्थापना करण्यापासून राज्यांचे नेतृत्व करण्यापर्यंत सातत्य राखले. सुनील दत्त, हेमामालिनी, विनोद खन्ना, स्मृती इराणी आदी ज्येष्ठ कलावंतांनी आपल्या राजकीय भूमिकेत जाऊन प्रत्यक्ष काम केले. जावेद अख्तर, शबाना आझमी आदींच्या राजकीय भूमिका पक्क्या आहेत. 

-एरवी तिकडले तारे राजकारणात येतात आणि क्षणकाळ चमकून विझून जातात, हेच वास्तव आहे !अभिनेता त्या क्षणापुरता आपल्या भूमिकेत जाऊन बाहेर येतो; नेत्याची भूमिका ही रोज वठवावी लागते, अंगीभूत व्हावी लागते... शिवाय नवा चित्रपट साइन केला की नवी भूमिका हे तिकडे चालते. मिथुन चक्रवर्ती आता तेच ‘इकडे’ही करु पाहाताहेत...नवा चित्रपट नवी भूमिका तसे आता नवी लाट, नवा राजकीय पक्ष !

(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: Interpretation - What do movie stars do on the ground?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.