आतले व बाहेरचे

By Admin | Updated: December 22, 2015 02:18 IST2015-12-22T02:18:53+5:302015-12-22T02:18:53+5:30

पूर्वीचा जनसंघ आणि आताचा त्याचा भाजपावतार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती असून संघाचा राजकारणाशी संबंध नसून ती केवळ एक सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगणे ही शुद्ध थाप आहे.

Inside and outside | आतले व बाहेरचे

आतले व बाहेरचे

पूर्वीचा जनसंघ आणि आताचा त्याचा भाजपावतार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती असून संघाचा राजकारणाशी संबंध नसून ती केवळ एक सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगणे ही शुद्ध थाप आहे. भाजपाने संघाच्या नियंत्रणात राहून काम करणे हे संघाच्या परिवाराने गृहीतच धरले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या काळात भाजपाच्या आमदारांनी संघ स्थानावर जाऊन तेथील वडिलधाऱ्यांचे राजकारण कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन घेणे व त्याबरहुकूम ते करणे हेही त्या परिवाराला त्याचमुळे अपेक्षित आहे. मात्र जे कार्यकर्ते संघाबाहेरून भाजपात आले आहेत त्यांना हे समजणे अजून बाकी आहे. वाजपेयींच्या कार्यकाळात याविषयीचा आग्रह धरला गेला नव्हता. नरेंद्र मोदींच्या काळात मात्र संघाने त्याविषयीचा आपला आग्रह आणि दबाव वाढविला आहे. मागल्या वर्षी झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनच्या वेळी भाजपाच्या आमदारांना संघस्थानावर बोलवून संघाच्या नेतृत्वाने त्यांचा अभ्यास घेतला होता. तोच प्रकार याहीवेळी झाला तेव्हा भाजपाचे २२ आमदार त्या बौद्धिक वर्गाकडे फिरकले नाहीत. हा प्रकार तपशीलाने सांगण्याचे कारण संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे, या संघाच्या घोषवाक्याचे खोटेपण स्पष्ट करणे हे आहे. काही काळापूर्वी दूरचित्रवाहिनीवर झालेल्या एका चर्चेत ‘संघ ही सांस्कृतिक संघटना असून तिचा भाजपाच्या राजकारणाशी वा तिच्या राजकीय कार्यक्रमाशी काहीएक संबंध नसल्याचे’ त्या पक्षाचे एक जुने आमदार व प्रवक्ते ठासून सांगताना दिसले. १९७७ मध्ये मधु लिमयांनी तेव्हाच्या जनता पक्षात सामील झालेल्या जनसंघातील लोकांच्या दुहेरी सदस्यत्वाचा (जनता पक्ष आणि संघ यांच्या) वाद पुढे आणला तेव्हा त्यांनाच ‘पक्ष फोडण्याच्या कारवायांसाठी’ अनेकांनी दोष दिला होता. वास्तव हे की जनसंघावरच्या संघाच्या वर्चस्वाचे वास्तव लिमयांना तेव्हा व त्या अगोदरही ठाऊक होते. भाजपात संघातून आलेले व संघाबाहेरून आलेले असे दोन तट आरंभापासूनच आहेत. संघाचा आताचा प्रयत्न, पक्षातून निवडून आलेले आमचे व आमचे नसलेले असे सारेच आमचे असावे असा आहे. त्यामुळे संघाच्या ताब्यात जाऊ न इच्छिणाऱ्यांनी अशा संघटनातील प्रवेशाबाबत आरंभीच सावध होणे गरजेचे आहे. भाजपा किंवा विद्यार्थी परिषद यातील प्रवेश हा त्या संघटनांपुरताच मर्यादित राहत नाही. तो त्यांना थेट संघस्थानावर पोहचवित असतो. आरंभीच्या प्रवेशद्वारी तसे सांगण्याची व्यवस्था त्यात नाही. मात्र ती नसणे हा सोयीएवढाच राजकारणाचाही भाग आहे. पुढच्या प्रवासाची पूर्वकल्पना नसलेले कारणे दर्शवा नोटीसा मिळालेल्यातील अनेकजण त्यामुळे संभ्रमात आहेत. मात्र त्यांना मिळालेल्या नोटिशीमुळे यापुढले लोकही आवश्यक तो धडा घेतील आणि शिस्तीत वागतील हे अपेक्षित आहे.

Web Title: Inside and outside