डेटवर जा, लग्न करा आणि ₹ २५ लाख मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 04:56 IST2026-01-10T04:56:43+5:302026-01-10T04:56:43+5:30
जगात एक असा देश आहे, जिथे सरकार तरुण आणि तरुणींना डेटवर जाण्यासाठी पैसे देतं. ही डेट जर लग्नापर्यंत पोहोचली तर तुम्ही लखपतीही बनू शकता.

डेटवर जा, लग्न करा आणि ₹ २५ लाख मिळवा!
जगात एक असा देश आहे, जिथे सरकार तरुण आणि तरुणींना डेटवर जाण्यासाठी पैसे देतं. ही डेट जर लग्नापर्यंत पोहोचली तर तुम्ही लखपतीही बनू शकता.
डेटवर जाण्यासाठी सरकार पैसे देतं आणि लग्न पक्कं होताच तब्बल २५ लाख मिळतात!
सध्या दक्षिण कोरिया हा देश एका विचित्र परिस्थितीतून जातोय. देशाचा विकास तर होतोय; पण लोक कामात इतके व्यस्त झालेत की व्यक्तिगत आयुष्य आणि पर्सनल रिलेशनशिपसाठी त्यांना वेळच उरलेला नाही. सकाळी उठल्यावर लोक थेट ऑफिसकडे वळतात. दिवसभर काम, काम, काम आणि मग संध्याकाळी आराम. ना कुणाचं डेटिंग लाइफ आहे, ना कुणाला या झमेल्यात पडायचंय. त्यांना ना प्रेमात पडायचंय, ना लग्न करायचंय, ना मुलं जन्माला घालायचीत... यामुळे दक्षिण कोरियात जन्मदर खूप कमी झालाय.
यामुळे सरकार फारच चिंतेत पडलं आहे. ही समस्या कशी सोडवायची या प्रश्नानं चिंताक्रांत झालेल्या सरकारनं चीनप्रमाणेच विविध उपाय योजून पाहायला सुरुवात केली आहे. तरुणाईनं मुलं जन्माला घालावीत यासाठी त्यांना कधी प्रेमानं, कधी चुचकारून, तर कधी धाकदपटशा दाखवून त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय.
यासाठी सरकारनं काय काय करावं? अगदी ब्लाइंड डेटवर जाण्यासाठीही तरुणाईला पैसे मिळतात, शिवाय त्यांच्या लग्नाचा खर्चही सरकार उचलतं. त्यांना जर मुलं झाली (ती व्हावीत अशीच त्यांची अपेक्षा आहे), तर त्यांची जबाबदारी घ्यायलाही सरकार तयार आहे. एवढंच नाही, तरुण-तरुणी प्रेमात पडावेत, त्यांच्यात जवळीक व्हावी, लग्न करून किंवा लग्न न करताही त्यांनी मुलं जन्माला घालावीत, देशाची लोकसंख्या वाढवावी आणि भविष्यात देशाची उज्ज्वल प्रगती घडवावी यासाठी काहीही करायला सरकार तयार आहे. त्यासाठी या तरुणांच्या बँक अकाउंटमध्ये भलमोठी रक्कमही जमा करायला सरकार तयार आहे.
देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार किती घायकुतीला आलं आहे बघा... तरुणाईनं डेटवर जावं यासाठी त्यांच्यापेक्षा सरकारच जास्त उत्सुक आहे. त्यामुळे इथे तरुणाईनं पार्टनरसह डेटवर जायचं ठरवलं तर त्याचाही सगळा खर्च पूर्णपणे फ्री असेल. कोरियन सरकार डेटसाठी ३५० डॉलर म्हणजेच सुमारे ३१ हजार रुपये देतं. या पैशांत तुम्ही रेस्टॉरन्टमध्ये जेवू शकता, फिल्म पाहू शकता किंवा एकत्र कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकता. डेटदरम्यान त्यांचे पालक भेटणार असतील तर त्यासाठीही वेगळा खर्च दिला जातो.
भारतासह काही देशांमध्ये अधूनमधून सरकार, सामाजिक संस्थांतर्फे सामूहिक विवाह आयोजित केले जातात. लग्नात त्यांना आहेर म्हणून सरकार, सामाजिक संस्थांतर्फे घरगुती गरजेचं सामान दिलं जातं. दक्षिण कोरियात मात्र जोडप्यांनी लग्न केल्यावर त्या दाम्पत्याला थेट २५ लाख रुपये दिले जातात. मुलं झाल्यावर आणखी अतिरिक्त रक्कम दिली जाते. दक्षिण कोरियात राहणीमानाचा खर्च सध्या खूप वाढलाय. महागाई सतत वाढतेच आहे. त्यामुळे तरुणाई लग्न आणि मुलं जन्माला घालण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा स्वतःचा विकास कसा होईल, याकडेच अधिक लक्ष देतात. त्यामुळेच त्यांना प्रेमात पाडण्यासाठी, रिलेशनमध्ये एंगेज करण्यासाठी सरकार आटापिटा करतं आहे.