‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 09:06 AM2024-05-08T09:06:42+5:302024-05-08T09:07:03+5:30

मुंबई किती जणांना पोटात घेणार हे ठरवण्यात अपयश आले आहे आणि विकासालाही अंत असतो, असला पाहिजे, हे आपण विसरलो आहोत!

‘Forgive, friends; No more people are welcome in Mumbai' | ‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’

‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’

-अभिलाष खांडेकर, ‘रोविंग एडिटर’, ‘लोकमत’

मुंबई एक मायावी आणि बहुरंगी नगरी असून, या शहराची भव्यताही वेगळीच आहे. इथे सातत्याने होणाऱ्या बांधकामात राजकीय नेत्यांना असणारा रस कधीही संपणार नाही. हे दररोज बातम्या देणारे शहर आहे. क्रिकेट, बॉलीवूड, सेन्सेक्स, करोडपतींच्या नित्य नव्या याद्या आणि वाढती लोकसंख्या... विषय संपत नाहीत!

माझ्या या जन्मनगरीत मी अलीकडेच गेलो, तेव्हा दिसले ते सर्व शहराला व्यापून असनेले बांधकाम! कुठेही जा, काही ना काही हटवले जाते आहे आणि तिथे नवे इमले उभे राहात आहेत. लोंढ्याने लोक येत असल्याने या शहरात पर्यावरण खुंटीला टांगून काँक्रीटच्या इमारती वाढत चालल्या आहेत. विसाव्या शतकातले हे आधुनिक महानगर आता अनेक गोष्टींचे एक मोठे मिश्रण झाले आहे. चांगले, वाईट, कुरूप असे सगळेच इथे आसपास नांदते. शहराचा वैभवी वारसा सांगणाऱ्या वास्तू दिसतात. उत्कृष्ट संस्था आणि अद्भुत लोक आहेत. पैसा खूप आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आणि घोर गरिबी पदोपदी दिसते. जे लोक नोकरी व्यवसायासाठी मुंबईत येतात ते क्वचितच परत जातात, असे म्हणतात ते खरेच आहे. वाहतुकीची समस्या आहे, लोकलमध्ये खच्चून गर्दी असते, पाणीटंचाई नेहमीचीच. हिरवळ कमीच दिसते. तरीही लोक परत जाऊ इच्छित नाहीत. रहिवासाला योग्य अशा विभिन्न सूचकांकात न्यूयॉर्क, केप टाऊन, लंडन, बर्लिन, माद्रीद, तसेच बीजिंग या शहरांशी मुंबईलाही स्पर्धा करावी लागते.. मुंबईतल्या अब्जाधीशांची संख्या सध्या ९२ आहे.  ही नवी महागडी ओळख मुंबईला प्रकाशझोतात ठेवते.  मुंबई सगळ्यांनाच आपल्यात सामावून घेते. हे महानगर धारावीच्या झोपडवासीयांवर आणि २७ मजल्यांच्या विशाल ‘अँटेलिया’च्या मालकांवर सारखेच प्रेम करते.

- हीच मुंबादेवीची महानता आहे. १३१८ किंवा त्याच्या आसपास या नगराला देवीचे नाव मिळाले. या ‘मॅक्झिमम सिटी’चा अधिकतम विस्तार आता पूर्ण झाला आहे का? की या शहराला एक ‘उष्णतेचे बेट’ करण्यासाठी अजून ‘विकास’ बाकी आहे? माणसाच्या हावरटपणाला मर्यादा नसते हे खरे; परंतु धोरणे आखणाऱ्यांकडे मात्र समकालीन वास्तवाची जाण आणि समतोल दृष्टिकोन असावा लागतो. ‘बस! आता खूप झाले’ असे ते म्हणू शकत नाहीत का? 
१९८० च्या दशकाच्या मध्यावर बिमारू म्हटल्या जाणाऱ्या बिहार, मध्यप्रदेश किंवा राजस्थानसारख्या मागासलेल्या राज्यातून येणारे लोंढे पोटात सामावून घेणारे हे शहर आता चारही दिशांना आणखी पाय पसरू शकत नाही. ‘मित्रांनो, क्षमा करा आता आपले येथे स्वागत नाही’ असे राजकीय नेते म्हणू शकणार नाहीत, हे तर खरेच! बाळासाहेब ठाकरे स्पष्ट मतांसाठी ओळखले जाणारे एक दुर्मीळ राजकीय नेते होते. त्यांच्या काळात शिवसेनेने असा प्रयत्न केला होता; परंतु पुढे बिगर मराठी लोकांची संख्या वाढत गेली आणि मराठी माणसाचा आवाज दडपला गेला.

नव्याने तयार झालेला महागडा कोस्टल रोड मरीन ड्राइव्हला दहिसरपर्यंत जोडतो. त्यावरून जात असताना मनात अनेक प्रश्न आले. उड्डाणपुलांच्या विपुल संख्येने या महानगराचे ‘क्षितिज’ जणू पुसून टाकले आहे.  समुद्राच्या बाजूने जाणारा हा विशाल रस्ता हे ‘निसर्गावर विजय मिळवण्याच्या मानवी प्रयत्नांचे दृश्य रूप’ आहे. बॅकबेच्या रूपाने अरबी समुद्राची जागा मुंबईने हडपलीच, आता समुद्रकिनाऱ्यावरून रस्ता झाल्याबरोबर पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतले असतानाही १४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीतून समुद्राच्या खाली बोगदे करायला सुरुवात होणार आहे. 

या सुंदर शहरात असे प्रयोग होतच राहणार. अधिक लोकसंख्या अधिक सुविधा, पुन्हा अधिक लोकसंख्या हे दुष्टचक्र कदाचित कधीच संपणार नाही; पण दुर्दैवाची गोष्ट ही, की कोणतेही जागतिक शहर हे अशा पद्धतीने ‘चालवले’ जात नाही. त्या शहरांची  विशेषता इतक्या सहजपणे पुन्हा पुन्हा नष्ट केली जात नाही. हे केवळ शहराच्या सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत नाही. ही गोष्ट निसर्गाला सतत आव्हान देण्याच्या बाबतीतही आहे. मुंबई किती जणांना पोटात घेणार हे ठरवण्यातल्या अपयशाच्या बाबतीतही हे तितकेच खरे आहे.
नागरिकांना इकडून तिकडे जाण्याचा घटनादत्त अधिकार आहे हे मला माहिती आहे; तरीही विकासाला काही एक मर्यादा असली पाहिजे... असलीच पाहिजे!

Web Title: ‘Forgive, friends; No more people are welcome in Mumbai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई