‘डार्क स्काय’- शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 06:51 IST2026-05-07T06:48:43+5:302026-05-07T06:51:15+5:30

उंच इमारती आणि कृत्रिम प्रकाशाच्या अतिरेकात आकाश-तारे दुर्मीळ झाले असताना राज्य सरकारने एका नव्या पर्यटनाला चालना देण्याचे ठरवले आहे.

Editorial Special Articles Dark Sky' - Away from the city noise, in the lap of the sky... | ‘डार्क स्काय’- शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत...

‘डार्क स्काय’- शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत...

नारायण जाधव, उप वृत्तसंपादक,

लोकमत, मुंबई

‘भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभूनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या..’ असे सांगून संत तुकडोजी महाराजांनी खुल्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहत देवाचे नामस्मरण करणे, यातच खऱ्या आनंदाची आणि शांतीची अनुभूती असल्याचा संदेश दिला आहे. मात्र, शहरांच्या चकचकीत उजेडात, उंच इमारतींच्या सावल्यांत आणि कृत्रिम प्रकाशाच्या अतिरेकात ताऱ्यांचा निखळ, निरागस उजेड कुठेतरी हरवून गेला आहे. अशावेळी राज्य सरकारने आता महाराष्ट्रातील गडद आकाश अर्थात ‘डार्क स्काय’ असलेल्या ११ ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पर्यटन सर्किट्स’ उभारण्याचे ठरवले आहे.

शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार

महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४ अंतर्गत खगोल-पर्यटन व डार्क स्काय संवर्धनासाठी उप-धोरण तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने गती देऊन ११ संभाव्य स्थळांची निवड करत प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा निर्णय केवळ पर्यटनवाढीचा कार्यक्रम नाही; तो निसर्गाशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. हे धोरण ‘विकसित महाराष्ट्र २०४७ मधील पर्यटन विकास आराखड्या’शी सुसंगत असून, २०४७ पर्यंत राज्याला ३.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पर्यटन क्षेत्रात लाखो रोजगार निर्माण करण्याची आणि राज्याच्या जीडीपीमध्ये भरीव योगदान देण्याची क्षमता लक्षात घेऊन डार्क स्काय पर्यटनाचा विचार पुढे आला आहे.

यामुळे महाराष्ट्र आता केवळ ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनापुरता मर्यादित न राहता ताऱ्यांच्या मोहक दुनियेत घेऊन जाणाऱ्या पर्यटनासाठीही सज्ज होणार आहे. यामुळे खगोलप्रेमी आणि ॲस्ट्रोफोटोग्राफर्ससाठी महाराष्ट्र नवा हॉटस्पॉट ठरणार आहे. या उपक्रमामुळे ‘अनुभवाधारित पर्यटनाला’ मोठी चालना मिळणार असून, पर्यटकांना शहरांच्या गोंगाटापासून दूर जाऊन निर्मळ, तारकांनी भरलेले आकाश अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

‘डार्क स्काय टुरिझम’ ही फक्त नवलाई नसून, प्रकाशाच्या अतिरेकातून बाहेर पडून अंधाराच्या सौंदर्याला स्वीकारण्याची एक नवी अनुभूती ठरणार आहे. महाराष्ट्रातील ताडोबा, मेळघाट, भीमाशंकर, लोणार यांसारखी ठिकाणे आधीच जैवविविधतेसाठी ओळखली जातात. तेथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ, प्रदूषणमुक्त आकाश आता पर्यटनाच्या केंद्रस्थानी येऊ पाहतो आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ११ ठिकाणांची निवड केली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (चंद्रपूर), लोणार सरोवर (बुलढाणा), पेंच व्याघ्र प्रकल्प (नागपूर), उदमाळ (नाशिक), भंडारदरा धरण (अहिल्यानगर), हरिहरेश्वर (रायगड), तोरणमाळ (नंदुरबार), यावल पूर्व रांग (जळगाव), मेळघाट (अमरावती), भीमाशंकर (पुणे), आसनगावचा माहुली गड (ठाणे) यांचा यात समावेश आहे. या उपक्रमातून स्थानिकांना रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आणि पर्यटकांना वेगळ्या निसर्गाची अनुभूती हे सर्व लाभ अपेक्षित आहेत.

या दृष्टीने पाहिले, तर ही संकल्पना खरोखरच संधींचे नवे आकाश उघडणारी आहे. परंतु, या चमकदार कल्पनेच्या पाठीमागे काही प्रश्नही तितकेच ठळकपणे उभे राहतात. ‘डार्क स्काय’ जपण्यासाठी आवश्यक असलेले कठोर नियम आपण कितपत पाळू शकू? प्रकाशप्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील दिव्यांची रचना बदलावी लागेल, अनावश्यक उजेडावर नियंत्रण ठेवावे लागेल. हे करताना स्थानिकांच्या सुरक्षेचा आणि जीवनशैलीचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे. याहून मोठा प्रश्न म्हणजे, पर्यटनाचा वाढता ताण. आजवर अनेक पर्यटनस्थळांनी अनुभवले आहे की, पर्यटकांच्या ओघातच निसर्गाचा ऱ्हास होतो. जंगलतोड, विकासकामांसाठी डोंगर पोखरणे, कचऱ्याचे ढीग, ध्वनिप्रदूषण, अनियंत्रित बांधकामे, पर्यटकांत होणारे भांडणे-तंटे ही वास्तवता ‘डार्क स्काय’च्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासू शकते. त्यामुळे ‘शाश्वत पर्यटन’ हा शब्द केवळ घोषणेत न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरला पाहिजे.

या उपक्रमाचा एक सकारात्मक पैलू म्हणजे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार. खगोलशास्त्राबद्दलची आवड, आकाश निरीक्षणाची संधी आणि विश्वाच्या गूढतेकडे पाहण्याची संधी. अंधश्रद्धेपलीकडे जाऊन विज्ञानाशी नाते दृढ करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. कारण ‘डार्क स्काय’ ही केवळ पर्यटनाची कल्पना नाही; ती एक मूल्यव्यवस्था आहे. महाराष्ट्राने ही संकल्पना संवेदनशीलतेने राबविली, तर केवळ पर्यटनच नव्हे, विवेकपूर्ण विकासाचा तो आदर्श ठरू शकतो. ताऱ्यांकडे पाहण्याची नव्याने मिळालेली ही संधी महत्त्वाची आहे, पण या ताऱ्यांचा उजेड विकासाच्या विवेकाला झाकोळणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

Web Title : महाराष्ट्र में 'डार्क स्काई' पर्यटन सर्किट विकसित होंगे, खगोल-पर्यटन को बढ़ावा।

Web Summary : महाराष्ट्र 11 स्थानों पर 'डार्क स्काई' पर्यटन सर्किट विकसित करने की योजना बना रहा है, जिससे खगोल-पर्यटन को बढ़ावा मिलेगा। यह पहल ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा देती है, अद्वितीय प्राकृतिक अनुभव प्रदान करती है, और वैज्ञानिक रुचि को बढ़ावा देती है, पर्यटन को जिम्मेदार विकास के लिए पर्यावरणीय स्थिरता के साथ संतुलित करती है।

Web Title : Maharashtra to develop 'Dark Sky' tourism circuits, boosting astro-tourism.

Web Summary : Maharashtra plans 'Dark Sky' tourism circuits at 11 locations, promoting astro-tourism. This initiative boosts rural economies, offers unique nature experiences, and fosters scientific interest, balancing tourism with environmental sustainability for responsible development.