शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

संपादकीय: मराठ्यांचा आक्राेश, 150 एकर शेतात सभा आणि नवी मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 07:15 IST

जरांगे - पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हे मराठा समाजातील प्रस्थापित नेतृत्त्वालाही मोठे आव्हान आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या निमित्ताने मराठा समाज रस्त्यावर आल्यानंतरच्या गेल्या सहा वर्षांतील आंदोलनाची आताच्या या उसळीला पृष्ठभूमी आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे आणि ओबीसींमधून किंवा त्याबाहेरच्या स्वतंत्र प्रवर्गात असे जिथे शक्य होईल तिथून आरक्षण, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे अतिविराट जाहीर सभा झाली. सभेसाठी दीडशे - दोनशे एकर शेतजमीन खास तयार करण्यात आली होती. गेल्या महिन्यात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसून राज्य सरकारला झुकायला लावणारे मनोज जरांगे - पाटील हे या सभेचे आकर्षण होते. तेच निमंत्रक म्हणजे यजमानही होते. त्यांनीच ही सभा गाजवली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो समाजबांधव शिस्तीने सभेसाठी आले. आदल्या रात्रीच मैदान पूर्ण भरले होते. ही ऐतिहासिक सभा, तिच्या तयारीसाठी त्यांनी मराठा आंदोलनाची धग अधिक असलेल्या भागात केलेला दौरा, त्या दौऱ्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, पहाटे तीन - चार वाजता झालेल्या सभा हे सारे राज्य सरकारसाठी आव्हान आहे. कारण, आम्हाला एक महिना द्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले होते. एक महिनाच काय, दहा दिवस जास्तीचे देतो, असे सांगून जरांगे यांनी त्यांची कोंडी केली. आता शनिवारच्या सभेनंतर दहा दिवसांत निर्णय घ्या, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरी बाब, जरांगे - पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हे मराठा समाजातील प्रस्थापित नेतृत्त्वालाही मोठे आव्हान आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या निमित्ताने मराठा समाज रस्त्यावर आल्यानंतरच्या गेल्या सहा वर्षांतील आंदोलनाची आताच्या या उसळीला पृष्ठभूमी आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात अत्यंत शिस्तबद्ध असे तब्बल ५८ मूक मोर्चे निघाले. आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही तरूण - तरूणींनी आत्महत्या केल्या. त्या दबावाखाली राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. आयोगाचे प्रयोग झाले. मराठा आरक्षण जाहीर झाले. ते उच्च न्यायालयात टिकले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. परिणामी, इतके मोठे आंदोलन करून, बलिदान देऊनही प्रत्यक्षात समाजाच्या हाती काहीच लागले नाही. मराठा समाजाचे नेते म्हणविणारे अनेकजण राजकारणाला बळी पडले. काहींनी स्वत:ची पोळी शेकून घेतली. काहींनी पडद्यामागे सरकारशी हातमिळवणी केल्याचा संशय निर्माण झाला. या साऱ्यातून आलेली सामूहिक निराशादेखील मनोज जरांगे या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी लाखोंच्या संख्येने समाज उभे राहण्याचे महत्त्वाचे कारण आहे. कारण, जरांगे यांचे आत एक, बाहेर एक असे काही नाही. उपोषणावेळी भेटायला आलेल्या मंत्र्यांना, तुम्ही हळूहळू बोलू नका, जे काही असेल ते समोरच्या लोकांना ऐकू येईल असे बोला, हे सांगण्याचा सच्चेपणा व धमक त्यांच्यात असल्यामुळे समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या दहा दिवसांत सरकार काय करणार हे पाहावे लागेल.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात बऱ्याच अडचणी आहेत. मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामाच्या राजवटीत आरक्षण असल्यामुळे विदर्भासारखी त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्रे नाहीत. उर्वरित महाराष्ट्रात तर मराठा असणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्यामुळे कुणबी बनण्याच्या वाटेला कोणी गेलेले नाही. त्यातच कुणबी समाजाच्या संघटना तसेच इतरही काही ओबीसी समाज अशी सरसकट प्रमाणपत्रे देऊ नयेत आणि मराठा समाज त्यांच्या आरक्षणामध्ये वाटेकरी होऊ नये, या मुद्द्यांवर आक्रमक आहेत. आरक्षणाच्या निमित्ताने पुढे आलेली जातीजातींमधील गुंतागुंत सगळ्या समाजांना समजून सांगणारे, जाती-धर्माच्या जंजाळातून वर आलेले प्रगल्भ नेतृत्व सध्या राज्यात नाही. शिवाय, आम्हीच मराठ्यांना न्यायालयात टिकणारे आरक्षण देऊ, असे म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षासह सगळे राजकीय पक्ष मराठा समाज व ओबीसी अशा दोन्ही डगरींवर हात ठेवून आहेत. त्यातच आरक्षणाचा हा विषय मराठ्यांपुरता मर्यादित नाही. धनगर समाजाचे आंदोलनही सत्ताधाऱ्यांनी पन्नास दिवसांचे आश्वासन देऊन थांबवले आहे. त्यावरून धनगर विरूद्ध आदिवासी असा संघर्ष उभा राहात आहे.

भरीस भर ही, की ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभाची तपासणी दर दहा वर्षांनी करावी आणि प्रगत जातींना आरक्षणाबाहेर काढावे, अशी मागणी शनिवारच्या सभेत मनोज जरांगे यांनी केली आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या रोहिणी आयोगाने अशाच शिफारसी केल्याचे सांगितले जाते. म्हणजे, तो वादाचा नवा विषय असेल. हे सर्व पाहता अंतरवाली सराटीच्या शिवारात घुमलेल्या मराठ्यांच्या आक्रोशाने सरकारपुढे मोठाच पेच उभा केला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा