नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:30 IST2025-10-11T07:28:26+5:302025-10-11T07:30:05+5:30
तात्या म्हणजे लई बेणं. पंचक्रोशीतल्या शांतता पुरस्काराची त्याला हाव सुटली. मग त्यानं गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’ सुरुवात केली..

नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
-सुमंत अयाचित
उप वृत्तसंपादक, लोकमत, छ. संभाजीनगर
भांडण लावणं-सोडवणं आणि त्याचं श्रेय लाटणं, हा आमच्या तात्याचा नाद खुळाच होऊन बसला आहे. गावातला धनदांडगा माणूस ! पैसाअडका चिक्कार, त्यामुळे गावभरच्या उचापती करण्यात फार रस. गावात कुठे रिकामी जागा दिसली किंवा कोणती जागा वादात असली की, याचा डोळा गेलाच म्हणून समजा. पैसा खर्च करील, बारा भानगडी करील, पण जागेच्या मालकाला धमकावून ती जागा ताब्यात घेणार म्हणजे घेणारच.
मध्यंतरी तात्याचं टक्कुरच सरकलं. गावात नवखा माणूसच येऊ देत नव्हता. म्हणायचा, आधीच आमच्या गावात जागा नाही आणि त्यात तुम्ही येऊन कुठं गर्दी करता? बाहेरगावच्या काही लोकांना तर त्यांना हाकलूनही लावलं. गावातले लोक वैतागले, कारण तात्या दुसऱ्या गावातल्या लोकांना गावात येऊ देत नाही म्हटल्यावर बाहेरच्या गावचे लोक तरी या गावच्या लोकांना त्यांच्या गावात कशाला येऊ देतील?, पण तात्याला एवढी कुठली समज? अखेर त्याच्या गावच्या लोकांना इतर गावांनी बंदी घातली, तेव्हा कुठं तात्याचं डोकं ताळ्यावर आलं.
दुसऱ्यांदा गावाची सत्ता हाती आल्यावर तर तात्या चेकाळलाच. त्याला पंचक्रोशीतल्या सगळ्यात मोठ्या पुरस्काराची हाव सुटली. पंचक्रोशीत चांगलं, शांततेचं काम करणाऱ्या माणसाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जायचा. पण, उपटसुंभ्या तात्याला काहीही करून हा पुरस्कार हवाच होता. त्यासाठी त्यानं लटपटी, खटपटी सुरू केल्या. तो म्हणे, अशांतता असल्याशिवाय, भांडणं, मारामाऱ्या झाल्याशिवाय शांतता निर्माण करण्यात काय मजा आहे? मग त्यासाठी त्याने आधीच कुरबुरी असलेल्या शेजाऱ्यांमध्ये भांडणं लावायला सुरुवात केली. त्यांनी एकमेकांची डोके फोडून झाली की, तात्या तिथे जायचा आणि दोघांची समजूत घालून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून, भांडण मिटवल्याचं परस्पर जाहीरही करून टाकायचा. मग, हॉस्पिटलमध्ये शेजारी-शेजारी उपचार घेत असलेले दोघेजण या भांडणाचं मूळ शोधू लागत, तेव्हा ‘तात्यानंच तेल टाकून आग लावली आणि शांतसुद्धा केली’, हे त्यांच्या लक्षात यायचं. पण, तोवर फार उशीर झालेला असायचा.
तात्यानं गावात चार-पाच भांडणं लावून सोडवल्यावर गावकरीच हुशार झाले. या तात्यानं गावची शांतताच घालवली, त्यालाच गावातून हाकलून दिलं पाहिजे, असाही विचार पुढं आला. पण, पुढच्याच क्षणी सर्वजण शांत झाले. कारण, तात्या म्हणजे लई बेणं होतं. शिवाय गावातला प्रतिष्ठित आणि पैसेवाला माणूस. त्याला गप्प तर करायचं, पण पंचक्रोशीतला शांततेचा पुरस्कारही मिळू द्यायचा नाही, यासाठी काय करता येईल, याचा विचार करू लागले.
मग गावकऱ्यांनीच अफलातून डोकं चालवून आयडियाची भन्नाट कल्पना मांडली. तात्या पुरस्कारासाठी फारच पेटलाय. त्यासाठी आपणच एखाद्या पुरस्काराची घोषणा करू. पंचक्रोशीतल्या मोठ्या पुरस्कारापेक्षाही हा मोठा आहे, महान आहे, असंही जाहीर करू आणि तात्याची पुरस्काराची हौस एकदाची भागवून टाकू. आपल्या गावात महा-नोबेल पुरस्कार जाहीर करू, तात्याला देऊ आणि त्याचं तोंड गप्प करून टाकू... असं ठरलं.
कार्यक्रम ठरला. गाजावाजा केला. मंडप टाकला, स्टेज उभारलं. पंचपक्वान्नाचा बेतही ठरला. तात्या तर जाम खूश होता. नोबेलपेक्षा मोठा पुरस्कार आपल्याला मिळतोय आणि तोही पहिलाच पुरस्कार आपल्याला मिळतोय, या विचारानं त्याला काहीच सुचत नव्हतं. पुरस्कार वितरणाची वेळ जवळ आली. लोक जमले. हार-तुरे आणले आणि तात्या एकदाचा व्यासपीठावर विराजमान झाला. पण, इथंच गडबड झाली.
तात्याच्या सन्मानार्थ (?) बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या एका वक्त्यानं ‘तात्याला हा पुरस्कार का देतोय’, हे खरंखरं सांगून टाकलं आणि तात्या जाम भडकला.
‘माझ्या समाधानासाठी हा कार्यक्रम करतात का? थांबा, मी तो पंचक्रोशीचा पुरस्कार घेऊनच येतो. सन्मानानं दिला नाही, तर धमकावून, हिसकावून, पळवून आणतो’... असं म्हणून तात्या स्टेजवरून उडी मारून खाली उतरला आणि गाडी घेऊन गेलासुद्धा.
इकडं गावाकडचे लोक म्हणाले, मरू दे तात्याला. आपण आपली जेवणं उरकून घेऊ!
- पण तात्याचं नशिबच खोटं. हा त्या गावात जाईपर्यंत तिथल्या लोकांनी खरंखुरं काम करणाऱ्या एका सच्च्या बाईला तो पुरस्कार देऊनही टाकला होता. ते बघून तर तात्या पहिल्यापेक्षा संतापानं ५० टक्के जास्त लालबुंद झाला.
तेवढ्यात त्याच्या गावचे लोक मागून आलेच. त्यांनी तात्याला उचललं आणि गाडीत घालून गावी आणलं आणि गावातला ‘महा-नोबेल’ पुरस्कार तात्याच्या गळ्यात मारला. एवढे दिवस सगळीकडं ऐटीत फिरणाऱ्या तात्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता...