'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 10:54 IST2026-05-17T10:54:17+5:302026-05-17T10:54:46+5:30
यशस्वी राजकीय ‘स्टार्टअप’ एखाद्या तीव्र नाराजीतून जन्म घेतो. जिथे नाराजी नव्हती, केवळ ‘ग्लॅमर’ होते, तिथे यश मिळाले नाही. भारतीय राजकारणाचे ‘नवोद्यम केंद्र’ होण्याची वाट अजून लांब आहे; पण ‘राजकीय युनिकॉर्न’ची वाढती संख्या हे सूचित करते की, कदाचित त्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे!

'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
- रवी टाले
कार्यकारी संपादक, अकोला
उद्योगविश्वातील सर्वात झळाळता शब्द आहे ‘युनिकॉर्न’! एखाद्या ‘स्टार्टअप’ने एक अब्ज डॉलरचे मूल्यमापन गाठले, की त्या नवउद्योगाला ‘युनिकॉर्न’ म्हटले जाते. एखादा ‘स्टार्टअप’ जसा बाजारपेठेतील एखादी समस्या ओळखून जन्म घेतो, तसाच राजकीय ‘स्टार्टअप’ही व्यवस्थेतील पोकळीतून उगवतो. राजकीय ‘स्टार्टअप’च्या बाबतीत ‘फंडिंग’ म्हणजे जनसमर्थन, ‘प्रॉडक्ट-मार्केट फिट’ म्हणजे मतदाराशी जुळणारी भूमिका आणि ‘आयपीओ’ म्हणजे पहिली निवडणूक! तामिळ सुपरस्टार विजय जोसेफ यांच्या तमिळग वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाने, स्थापनेनंतर अवघ्या दोनच वर्षांत, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून, द्रविड मुन्नेत्र कळगम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगमसारख्या प्रस्थापित पक्षांचे तब्बल ५९ वर्षांपासूनचे वर्चस्व मोडून काढले! हे राजकीय ‘युनिकॉर्न’ होणे नव्हे तर दुसरे काय?
भ्रष्टाचारविरोधातून उभे राहिलेले ऐतिहासिक स्टार्टअप : जनता दल
बोफोर्स घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी सरकारमधून बाहेर पडलेल्या व्ही. पी. सिंग यांनी १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना करत तेलुगू देसम, द्रमुक, आसाम गण परिषदेला एकत्र आणून राष्ट्रीय आघाडी केली. पुढील लोकसभा निवडणुकीत त्या आघाडीने काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले. सिंग यांची स्वच्छ प्रतिमा ही त्या ‘स्टार्टअप’ची ‘ब्रँड व्हॅल्यू’; पण मंडल आयोग, बाबरी वादांमुळे हे ‘युनिकॉर्न’ ११ महिन्यांतच कोसळले!
निष्कासनातून साकारलेले ‘स्टार्टअप’: राष्ट्रवादी काँग्रेस
जून १९९९ मध्ये सोनिया गांधींना विरोध केल्याने शरद पवार, पी. ए. संगमा व तारिक अन्वर यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आले. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस हे राजकीय ‘स्टार्टअप’ जन्माला आले. त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाने ५८ जागा जिंकून काँग्रेससोबतच आघाडी सरकार स्थापन केले! ‘स्टार्टअप’च्या भाषेत ‘पिव्होट’ म्हणजे दिशा बदल केला, पण ‘मार्केट शेअर’ टिकवला! अजित पवारांच्या २०२३ मधील बंडामुळे हे ‘स्टार्टअप’ दुभंगले!
स्वतंत्र राज्याच्या भांडवलावरील ‘स्टार्टअप’: केसीआरचा ‘बीआरएस’
तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी तेलुगु देसम पक्षातून बाहेर पडत, के. चंद्रशेखर राव यांनी २००१ मध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) हा राजकीय ‘स्टार्टअप’ उभा केला; पण त्याला ‘युनिकॉर्न’चा दर्जा मिळण्यासाठी एक तपाहून अधिक काळ वाट बघावी लागली. दरम्यानच्या काळात त्याचे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) म्हणून ‘री-ब्रँडिंग’ही करण्यात आले.
तेलुगू देसम : पहिले राजकीय ‘युनिकॉर्न’
पहिले राजकीय ‘युनिकॉर्न’ म्हणजे तेलुगु सुपरस्टार एन. टी. रामाराव यांचा तेलुगू देसम पक्ष! पक्षाची स्थापना १९८२ मध्ये झाली आणि एनटीआरच्या अफाट लोकप्रियतेवर स्वार होत, पक्षाने १९८३ मधील आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळवला. उद्योगविश्वाच्या भाषेत, पहिल्याच ‘लॉन्च’मध्ये बाजारपेठेचा सत्तर टक्के हिस्सा काबीज केला! त्यासाठी एनटीआर यांनी ‘चैतन्य रथम’मधून संपूर्ण आंध्र पिंजून काढला होता. उद्योगविश्वाच्या भाषेत ती थेट ग्राहकाशी जोडणारी ‘स्ट्रॅटेजी’ होती!
आंदोलनातून जन्मलेले ‘युनिकॉर्न’: आसाम गण परिषद
तेलुगू देसमपेक्षाही अधिक नाट्यमय आहे आसाम गण परिषदेचा उदय! विद्यार्थी नेता प्रफुल्लकुमार महंत यांनी १९७९ मध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात आंदोलन छेडले. त्याचा शेवट १९८५ मध्ये आसाम कराराने झाला आणि आसाम गण परिषद पक्षाची स्थापना झाली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत, अवघ्या ३३ वर्षांचे महंत मुख्यमंत्री बनले. ते आणि त्यांचे बहुतांश मंत्री हॉस्टेलमधूनच शपथविधीसाठी गेले होते!
सर्वात वेगाने वाढलेले राजकीय ‘स्टार्टअप’: ‘आप’
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून २०१२ मध्ये जन्मलेल्या आम आदमी पक्षाने, डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली विधानसभेत २८ जागा जिंकताना, मुख्यमंत्री शीला दीक्षितांनाही पराभूत केले! त्यानंतर २०१५ मध्ये ७० पैकी ६७ जागा जिंकल्या. पंजाबमध्येही सत्ता मिळवत, ‘आप’ सर्वात वेगाने वाढलेले राजकीय ‘स्टार्टअप' ठरला; पण ‘इमानदार' ही प्रतिमा शीशमहल प्रकरणात गंजली आणि २०२५ मध्ये ‘व्हॅल्युएशन क्रॅश’ होताना, दिल्लीत २२ जागांपर्यंत घसरण झाली.