खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

By सचिन जवळकोटे | Published: March 24, 2019 09:49 AM2019-03-24T09:49:33+5:302019-03-24T09:51:38+5:30

लगाव बत्ती !

The color of Khanjir Khan's mine is different! | खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

googlenewsNext


 - सचिन जवळकोटे

थोरले काका बारामतीकर यांनी पूर्वी कधीतरी म्हणे वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला; मात्र त्यानंतर आयुष्यभर ते या शस्त्राचे मानकरी बनून राहिले. त्या घटनेची आठवण येण्याचं कारण की, त्याच वसंतदादांच्या लाडक्या शिष्यानं अर्थात थोरले दादा अकलूजकर यांनी बारामतीकरांचाही तशाच पद्धतीनं सूड उगवला. काकांची पाठ विजयदादांनी दाखविली. वार रणजितदादांनी केला. त्यानंतर विश्वासघाताची मालिकाच सुरू झाली. माढ्याच्या संजयमामांनीही देवेंद्रपंतांच्या पाठीचा नेम साधला. यात रक्तबंबाळ जाहले सोलापूरचे देशमुख मालक; त्याचवेळी फलटणच्या रणजितदादांनीही ‘मामां’ना दाखविला ‘हात’. माढ्याच्या रणांगणात खंजिरांचा खणखणाटच रंगला; तरीही प्रत्येक नेता म्हणाला, ‘रंग माझा वेगळा !’


खंजीर : मेड इन अकलूज...
सरड्याची धाव कुंपणापर्यंत,’ यानुसार ‘अकलूजकरांची झेप बारामतीपर्यंतच,’ असा एक ठाम समज आजपावेतो थोरल्या काकांचा होता; मात्र रणजितदादांनी मोठी उडी मारली. विजयदादांनीही ‘ममं’ म्हटलं. हे पिता-पुत्र आत्मघातकी बॉम्ब होऊ शकतात, याची जाणीव होताच गेल्या आठवड्यात थोरल्या काकांनी पाटलांच्या जयंतरावांना कामाला लावलं. इस्लामपुरातून तीन दिवसात कैक कॉल गेले. मेसेजेस धडकले. मात्र ‘शिवरत्न’वरून एकही रिप्लाय नाही. (खरंतर, हा अनुभव सर्वसामान्यांनाही बºयाच वेळा आलेला, असं काही जणांचं म्हणणं.).
असो. अकलूजमध्ये कार्यकर्त्यांची बैठक सुरू होण्यापूर्वी ‘भोसेचे राजूबापू’ खास ‘बारामतीकरांचे दूत’ बनून बंगल्यावर धडकलेले; मात्र त्यांनाही तिथं दोन तास बाहेर थांबवून ठेवलेलं. (हेही म्हणे नेहमीप्रमाणंच !).. अखेर आतमध्ये कसाबसा प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी थोरल्या काकांचा पक्षनिष्ठेचा निरोप पोहोचविला. पिता-पुत्रांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ते बैठकीच्या तयारीला लागले. अखेर हिरमुसलेले ‘राजूबापू’ रिकाम्या हातानं परतले...खरंतर रिकामं म्हणता येणार नाही. कारण, त्यांच्या हातात होता रक्ताळलेला खंजीर. अकलूजकरांनी भेट म्हणून दिलेला. खास बारामतीकरांसाठी. जुन्या हल्ल्याची परतफेड तेही व्याजासह... लगाव बत्ती !


दादा-दीदींचा सुंठीवाचून खोकला गेला...
कलूजकर ‘आऊट’ होताच थोरल्या काकांनी संजयमामांना ‘इन’ करण्याची टूम काढली. तातडीनं खलिता निघाला. बारामतीकरांचे सारे शिलेदार पुण्यात पोहोचले. ‘संजयमामां’नाही बैठकीत आणण्याची जबाबदारी ‘बबनदादां’वर सोपविली गेली. ‘मामां’ना थोरल्या काकापर्यंत पोहोचविलं नाही तर आपल्या साम्राज्याचंही काही बरं नाही, याची भीतीही त्यांच्या मनात होतीच. शिवाय ‘दादां’चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘मामां’ना दिल्लीची वाट दाखविली तरच सहा महिन्यांनी ‘मुंबई’चा रस्ता त्यांच्या लाडक्या सुपुत्रासाठी मोकळा होणार होता. त्यामुळं ‘दादाऽऽ मामाऽऽ’ करून ‘दादां’नी ‘मामां’ना थोरल्या ‘काकां’च्या दरबारात हजर केलं. बैठकीत निर्णय घेण्याची वेळ आली.
त्यावेळी काकांनी सर्वप्रथम करमाळ्याच्या ‘रश्मीदीदीं’कडे सहेतूक पाहिलं. ‘दीदीं’नीही लगेच मान डोलावत ‘मामां’च्या ‘दिल्लीस्वारी’ला होकार दर्शविला. कारण त्यात त्यांचाही फायदा होता. त्यांचीही ‘मुंबई वारी’ निर्धोक होणार होती. त्यामुळं फटकन्ऽऽ निर्णय झाला. सर्वांनी ‘मामां’च्या घड्याळाचा घाईघाईनं गजर वाजविला; कारण ‘बबनदादा’ अन् ‘रश्मीदीदी’ या दोघांचाही सुंठीवाचून खोकला गेला. लगाव बत्ती...


‘नूरा’ पहिलवानाची खरी लढत
सोलापुरात मात्र ‘खंजिरांच्या खणखणाटा’पेक्षा आपापल्या ‘रंगांचा लखलखाट’ अधिक लक्षवेधी ठरणार दिसतोय. गौडगावच्या महाराजांचा ‘भगवा’ रंग उजळ ठरू नये, या प्लॅनिंगमध्ये रमलेल्या सुशिलकुमारांना आता ‘अकोले’करांचा ‘प्रकाश’मय ‘निळा’ रंग डिस्टर्ब करू लागलाय. त्यामुळं समोरच्या ‘भगव्या’ रंगावरची नजर हटवून ते आजूबाजूच्या ‘हिरव्या’ रंगावर जास्त लक्ष केंद्रीत करू लागलेत. ‘नूरा कुस्ती’ची सवय लागलेल्या पहिलवानाला कधी-कधी अशा खºया-खुºया लढती त्रासदायक ठरतात, हेही खरंच. .लगाव बत्ती.


दोस्तऽऽ दोस्तऽऽ ना रहा...
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सोलापूरच्या देशमुख मालकांसोबत ‘हम साथऽऽ साथऽऽ है’ म्हणत संजयमामांनी झेडपीच्या बागेत घिरट्या घातल्या. सोबतीला बार्शीचे राजाभाऊ, पंढरपूरचे प्रशांत मालक, म्हसवडचे जयाभाव, फलटणचे रणजितदादा, सांगोल्याचे शहाजीबापू अन् माळशिरसचे उत्तमराव यांच्यासोबत ‘सत्ते पे सत्ता’चा पट मांडला; मात्र अकलूजकरांनी ‘आज ना छोडुंगाऽऽ तुम्हे’ म्हणत बारामतीकरांचा सूड घेतला. तेव्हा मामांनी लगेच ‘सौ साल पहले.. हमें तुमसे प्यार थाऽऽ’ सांगत बारामतीकरांच्या गळ्यात गळे घातले. मात्र त्याचवेळी फलटणच्या रणजितदादांनी ‘क्या हुआ तेरा वादाऽऽ’ असं विचारत थेट ‘मामां’च्या विरोधात दंड थोपटले. बिच्चाऽऽरे मामा. ‘दोस्त दोस्त ना रहा..’ म्हणत महाआघाडीतल्या विश्वासघाताची फळं चाखत बसले. माढ्याच्या राजकारणाचा गुणच असावा तसा. जे पेरलं, तेच उगवलं...लगाव बत्ती.

 - सचिन जवळकोटे
(लेखक ‘सोलापूर लोकमत’चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: The color of Khanjir Khan's mine is different!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.