clutter on Multiplex culturel by mulshi pattern cinema | मल्टिप्लेक्स कल्चरवर मुळशी पॅटर्नचा ओरखडा 

मल्टिप्लेक्स कल्चरवर मुळशी पॅटर्नचा ओरखडा 

- अविनाश थोरात -
अमिताभ बच्चन- आमीर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदूस्थान’ आला आणि गेला. रजनीकांतचा पिक्चर म्हटल्यावर भले भले हिंदी चित्रपटही धाडस करत नाहीत. तरीही रजनीकांत- अक्षय कुमारच्या २.० थिएटरमध्ये असताना तीन मराठी चित्रपट गर्दी खेचत आहेत. ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ आणि ‘नाळ’ या चित्रपटांचा विशिष्ट प्रेक्षक वर्ग आहे. आजपर्यंत मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट याच प्रेक्षकांनी तारला आहे. पण ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा प्रेक्षक वेगळा आहे. कोण आहेत हे  लोक लोक जे अचानक मल्टिप्लेक्समध्ये यायला लागले आहेत.  आजपर्यंत मराठी चित्रपटांना कधो दिसले नव्हते. कोठून आलेत हे  सगळे. त्यांची प्रतिसादाची पद्धतही वेगळी आहे. जे शब्द लिहिताना फुल्या फुल्या लिहिल्या जातात त्या मोठ्याने ओरडताना त्यांना काही वाटत नाही. कोठून विरोध झाला की भांडायला, मारामारी करायला तयार असतात. गाणे सुरू झाल्यावर समोर जाऊन नाचायलाही त्यांना काही वाटत नाही. मल्टिप्लेक्स कल्चर वर हा ओरखडा उठवला आहे मुळशी पॅटर्न चित्रपटाने..
पुण्यातल्या थिएटरमध्ये पोलीस संपूर्ण पिक्चर संपेपर्यंत थांबून राहायला लागलेत. मध्येच आतमध्ये येऊन गोंधळ करणाऱ्या एक दोघांच्या गळ्यात हात टाकून घेऊन जायची वेळ आलीय. खर तर सैराटच्या झिंग झिंग झिंगाटच्या वेळीही थिएटरमध्ये थोडा फार गोंधळ  व्हायचा. पण तो तेवढ्यापुरताच. हे नाचणारे अगदीच अनोळखी वाटत नव्हते. पण मुळशी पॅटर्नला दिसत असलेले अनेक चेहरे कधी दिसलेच नव्हते. हिंदी पिक्चरला कदाचित आले असतीलही; पण तिथल्या गर्दीत सफादून गेले. पिटातला प्रेक्षक हिंदी चित्रपटाचा एकेकाळी प्राण होता. पिक्चर तोच चालवायचा. काही चित्रपटांच्या डायलॉगवर, गाण्यांवर नाणी फेकली जाण्याचे किस्सेही सांगितले जातात. पण मल्टिप्लेक्सच्या जमान्यात तो हरवून गेला. मराठीला कधी या प्रेक्षकाने जवळ  केले नाही.

सांगत्ये ऐका आर्यन चित्रपटगृहात १२५ आठवडे  चालला होता म्हणतात, पण त्याचा प्रेक्षक कोण होता माहीत होते. त्यानंतरचे तमाशापटही चांगले चालले. पण प्रेक्षक मात्र त्या पिंजऱ्यात फार राहिला नाही. दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी प्रचंड यश मिळवलं. माहेरची साडी तुफान चालला. पण हा सगळा प्रेक्षक ओळखीचा होता. महेश कोठारेच्या धुमधडाकाने मध्यमवर्गीय प्रेक्षकाला मराठी सिनेमाकडे  आणले. महेश, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचा विनोद अगदी अजीर्ण होईपर्यंत प्रेक्षकांनी पचविला. साड्यातले हिरो, लुटीपुटीच्या प्रेमकथा असा आचरटपणा सहन करत मराठी पिक्चर पाहत राहिला पण हळूहळू  हिंदीकडे वळला. 
त्यानंतर मराठी सिनेमा एकदम आशयघन वगैरे होऊ लागला. आॅस्करमध्येच श्वास अडकल्याने तिकीटबारी विसरूनच गेला. वळू, दुनियादारी, कट्यार काळजात घुसली, मुंबई  पुणे मुंबई, देऊळ, यांनी शहरी नवतरुणांना आकर्षित केले. मकरंद अनासपुरेच्या गावठी विनोदालाही शहरी मद्यमवगीर्यांनीच दाद दिली. नटरंग, सैराटने विक्रम मोडले पण त्यात अजय- अतुलच्या झिंग आणणाऱ्या संगीताची बाजू वरचढ होती. सैराटच्या याच झिंगेत स्वप्नील जोशी, उमेश कामत यांच्यासारखे चॉकलेट हिरो वाहून गेले. भरत जाधवचा तोच तोच विनोदही प्रेक्षकांनी नाकारला.  त्यानंतर मात्र मराठी सिनेमाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी डॉ. काशीनाथ घाणेकर यांनाच अवतरावे लागले. शहरी मध्यमवर्ग हाच आतापर्यंत मराठी सिनेमाचा तारणहार राहिला आहे. यात पहिल्यांदा बदल केलाय तो मुळशी पॅटर्नने. मराठी चित्रपटसृष्टीला एकदम अपरिचित प्रेक्षक मुळशी पॅटर्नला गर्दी करतोय. का? गुन्हेगारी दाखवलीय म्हणून? शेतकऱ्यांचे दु:ख दाखवले यासाठी? शेतकरी आत्महत्येपासून ते शेतीमालाला भाव मिळावा असे मांडणारे अनेक चित्रपट आले. तू फक्त लढ म्हण, बबन यासारखे शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न मांडताना गुन्हेगारी दाखविणारे चित्रपटही येऊन गेले. पण त्यांची एवढी चर्चा झाली नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर १९४३ साली आलेला किस्मत हा पहिला गुन्हेगारीपट. हातात सिगरेट घेऊन पाकिटमारी करणारा नायक लोकांनी डोक्यावर घेतला. पण किस्मतमधला अशोक कुमार, चोºया करणारा आवारामधील राज कपूर, पत्ते लावणारा गॅम्बलर मधील देव आनंद मनाने वाईट नव्हते आणि लॉस्ट अँड फाउंडमध्ये चांगल्या आईबापाचीच मुले वाईट मार्गाला लागलेली मुले होती. दिवार, शक्तीमध्ये स्मगलींगच्या वाटेवर गेलेल्या अमिताभ बच्चनला लोकांनी स्वीकारले पण त्यालाही गोळ्या खाऊन मरावेच लागले. बाजीगरमध्ये अँटीहिरो करताना वडिलांच्या झालेल्या फसवणुकीचे कारण असूनही शाहरुखच्या नशिबी मरणच होते. हिंदी चित्रपटसृष्टीला गुन्हेगारी विश्वाविषयी आकर्षण नेहमीच राहिले आहे. सराईत गुन्हेगारांच्या व्यक्तिरेखा असलेले चित्रपट किंवा या अव्वल गुन्हेगारांच्या आयुष्यावरून प्रेरित झालेले चित्रपट कायमच बनत आलेले आहेत. मुंबई अंडरवर्ल्ड तर अशा कथांचे माहेरघरच.  अशा हिंदी चित्रपटांना उत्तमोत्तम खाद्य पुरवले आहे. मुंबईचा कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध याचे अत्यंत नाट्यमय चित्रण अनेक चित्रपटांमध्ये आले. कधी त्याच्या कंपनीतील छोटा राजन हिरो झाला. त्याच्याशी लढण्याची ताकद असलेला आणि डॉन मध्येही हिंदू मुस्लिम पाहणाऱ्यांना जॉन अब्राहमचा मन्या सुर्वे भावून गेला. तसेच मुंबई गुन्हेगारी विश्व उलगडून दाखविणाऱ्या रस्त्यामधील भिकू म्हात्रेही भाव खाऊन गेला. 
मुळशी पॅटर्न ज्याच्या खूप जवळ जातो त्या शुटआऊट अँट लोखंडवाला या चित्रपटात गुन्हेगारी जगतातील टोळीयुद्धाचे अंतरंग दाखवण्यात आले होते. मुंबईतील अनेक टोळ्या आपापसात लढून विखुरल्या जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे  जवळपास १०-१२ वर्षांचा हा काळ मुंबई अंडरवर्ल्डसाठी अत्यंत खळबळजनक असाच होता. अशाच वेळेस मुंबई  पोलिसांमध्ये या टोळ्यांविरुद्ध लढणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट तयार होत होते. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटात मुंबईचा अनभिषिक्त सम्राट डॉन हाजी मस्तान आणि त्याचा त्या वेळेस त्याचा हस्तक आणि उदयोन्मुख डॉन दाऊद इब्राहिम यांच्यातील नातेसंबंध दाखविले होते. या सगळ्या चित्रपटातील हिंसाचार आणि गुन्हेगारी विश्वाचे भडक चित्रण यांवर वेळोवेळी टीकाही करण्यात आलेली आहे. गुन्हेगारांचे असे उदात्तीकरण करून आपण एक प्रकारे तरुण पिढीसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहोत असे अनेक जणांना वाटले.   ज्या गुंडांची नावे मोस्ट वॉन्टेडच्या यादीत आहेत किंवा होती अशा गुन्हेगारांना चित्रपटाद्वारे मात्र हीरो बनवले जाते आणि त्यांच्या कृतीचे एकप्रकारे समर्थनही केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त झाली होती.  पण मुंबई या मायापुरीतील सत्य घटनांशी मराठी प्रेक्षक एकरूप होऊ शकला नाही. याचे कारण म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचे स्वरूप आणि येथील गुन्हेगारांची जातकुळी वेगळी आहे. उर्वरित महाराष्ट्र किंवा देशाचा इतर भाग त्याच्याशी रिलेट होऊ शकत नाही. येथेच मुळशी पॅटर्नचे वेगळेपण आहे. गेल्या 10-15 वर्षात नागरीकरण वाढले आणि त्याच्या अनुषणगाने काही प्रश्न निर्माण झाले. शहरे वाढत गेली तशी भोवतालची गावे आक्रसत गेली. जमिनी गेल्या आणि शेतकरी शहरातील झोपडपट्टीमध्ये आला. त्याची पुढची पिढी येथे वाढली खरी पण त्यांना आपल्या जमिनीवर उठलेल्या मोठमोठ्या इमारती दिसत होत्या. आपण फसवले गेलो, लुटले गेलो ही भावना त्यांच्या मनात संताप निर्माण करत होता. नापिकी किंवा शेतमालाचे भाव पडले तर शेतकरी आपल्या नशिबाला दोष देतो. पण या भागातून कधी पैशाच्या आमिषाने किंवा कधी धाक दपतशा करून बाहेर काढले तर तो राग कायमचा मनात राहतो. तरुणांच्या मनातला हा अंगारच मुळशी पॅटर्नमध्ये लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडेने दाखविला आहे. राहुल्या, पिट्यादादा असो की नन्या ही लांबची कोठली नाही तर आपल्याच चौकातली पोर वाटतात. चित्रपटात एक प्रसंगात राहुल्या म्हणतो की बॉडी नाही मॅटर करायला डेअरींग लागत. प्रत्येकालाच वाटते की आपल्यात डेअरींग आहे. त्यामुळेच पिक्चरमध्ये आपण तोडतो म्हणणाºया राहुल्याच्या डायलॉगला शिट्या वाजतात, टाळ्या पडतात. 
लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे  , गुन्हेगारी किती वाईट आणि त्याचा शेवट कसा होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण तरीही प्रश्न हा आहे  की दोन तासांचे उदात्तीकरण लक्षात राहिलं की १० मिनिटांचा वाईट शेवट? तरुणाईची रग असल्याने पोरांना हे समजणार नाही. पण मध्यमवयीन महिलाही या चित्रपटाला येताना दिसत आहेत. मुळशी पॅटर्न पाहिल्यावर चौकात रात्रीपर्यंत बसलेल्या मुलाला आई हाक मारील. हा पिक्चर पाहिलेले वडील कोटी दोन कोटी आले तरी आता जमीन विकली तरी ते भुरर्कन संपून जातील हे लक्षात ठेवून जमीन विकणार नाहीत. शेतकऱ्याचा माळ कवडीमोल भावाने घेऊन त्यालाच दमदाटी करणारा व्यापारी राहुल्या आपल्या गळ्यात आकडा घुसवून मारायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवील आणि गळ्यात सोन्याचे गोफ घालून स्कॉर्पिओ, फॉरचुनर मध्ये फिरण्याची स्वप्ने पाहत राहुल्या बनू पाहणारे वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आपला जीव दोन्ही इझी मनीच्या नादाने गैर मार्गावर चालल्यास जाऊ शकतो हे लक्षात ठेवतील. एवढ्यासाठी मल्टिप्लेक्सच्या संस्कृतीला थोडासा ओरखडा गेला तरी चालेल. 
...................

Web Title: clutter on Multiplex culturel by mulshi pattern cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.