बॉलिवूडला ऑस्कर जिंकणाऱ्यांचं वावडं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:46 AM2020-07-29T04:46:00+5:302020-07-29T04:47:18+5:30

संगीत क्षेत्रातील नेपोटिझमवरही सोनू निगमसारख्या मातब्बर गायकाने जोरदार हल्ला चढविला. अनेक मोठ्या धेंडांची नावे या मुद्द्यामुळे माध्यमांतून, सोशल मीडियांतून आणखीनच प्रकाशझोतातही आली.

Bollywood's not interested in those actors who wins Oscar? | बॉलिवूडला ऑस्कर जिंकणाऱ्यांचं वावडं ?

बॉलिवूडला ऑस्कर जिंकणाऱ्यांचं वावडं ?

googlenewsNext

- अजय परचुरे । वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, मुंबई
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला. या मुद्द्यानंतर बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींवर नेपोटिझमचे डझनभर आरोपही करण्यात आले. संगीत क्षेत्रातील नेपोटिझमवरही सोनू निगमसारख्या मातब्बर गायकाने जोरदार हल्ला चढविला. अनेक मोठ्या धेंडांची नावे या मुद्द्यामुळे माध्यमांतून, सोशल मीडियांतून आणखीनच प्रकाशझोतातही आली. आता यात भर म्हणून की काय ‘संगीताचा बादशहा’ ए. आर. रेहमाननेही उडी घेतली आहे. ‘बॉलिवूडमध्ये एक टोळी माझ्याविरोधात काम करत आहे,’ असं धक्कादायक विधान रेहमानने केले; आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरमधली काळी बाजू प्रकर्षाने सर्वांसमोर येऊ लागली आणि चर्चांना उधाण आलं; त्यापाठोपाठ आॅस्कर पुरस्कार विजेते साऊंड डिझायनर रसूल पुकुट्टी यांनीदेखील आॅस्कर मिळूनही आपल्याला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. ए. आर. रेहमानसारख्या जगद्विख्यात संगीतकाराचं हे विधान बॉलिवूडमधील कंपूशाहीवर बोट ठेवणारंच आहे.


ए. आर. रेहमान भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगीतकार आहे. ‘आपण भलं आणि आपलं काम भलं’ या स्वभावाने ए. आर. रेहमान कधीही कोणत्याही कंपूशाहीत पडला नाही. जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करणे एवढेच त्याला ठाऊक. केवळ भारतीय चित्रपटसृष्टीच नाही तर हॉलिवूडमध्येही ए. आर. रेहमानने आपल्या संगीताने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. दोन आॅस्करही त्याला मिळाले आहेत. असे असताना त्याने बॉलिवूडमधील कंपूशाहीवर वक्तव्य करून त्यालाही अनुभव आल्याचे म्हटले आहे. त्याने संगीत दिलेला दिवंगत अभिनेता सुशांतसिंगचा शेवटचा चित्रपट दोन दिवसांपूर्वी ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चित्रपटाची गाणी बºयापैकी लोकप्रिय झाली आहेत.

ए. आर. रेहमानने कंपूशाहीवर बोलताना, बॉलिवूडमध्ये एक गट आहे त्याच्याविरोधात काम करत असल्याचे म्हटले. या गटामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळण्यात अडचणी येत आहेत. काही लोक माझ्याबद्दल सिनेसृष्टीत अफवा पसरवत आहेत. त्यामुळे सिनेनिर्माते आणि त्यांच्यात गैरसमज निर्माण होत आहेत. मी चांगल्या चित्रपटांना नकार देत नाही; पण काही टोळ्या आहेत ज्या माझ्याविरुद्ध अफवा पसरवत आहेत आणि त्यामुळे फक्त गैरसमज निर्माण होत आहेत, असेही ए. आर. रेहमानने म्हटले आहे; आणि त्याच्यासारख्या प्रतिथयश संगीतकाराला हे वाटणे म्हणजे बॉलिवूड किती खालच्या स्तराला जाऊन पोहोचला आहे याचं ढळढळीत उदाहरण म्हणावे लागेल. याबाबत ए. आर. रेहमानने मांडलेले मुद्देही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा ‘दिल बेचारा’चे दिग्दर्शक मुकेश छाब्रा माझ्याकडे आले, तेव्हा मी दोन दिवसांत चार गाणी दिली. त्यावेळी मुकेश छाब्रा यांनी, अनेकांनी मला तुमच्याकडे न येण्याबद्दल सांगितले तसेच अनेक किस्सेही सांगितल्याची माहिती दिली. ते मी ऐकलं आणि ‘ठीक आहे’ एवढंच म्हणालो. परंतु आता मला कळले की, हिंदीतील चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नव्हते आणि चित्रपटसृष्टीत मला काम का दिले जात नव्हते ते. येथील फार कमी लोकांना मला काम करताना पाहायचं नाहीे; परंतु दुसरीकडे असेही अनेकजण आहेत ज्यांना माझ्यासोबत काम करायचे आहे. मी डार्क चित्रपट करतो; कारण एक संपूर्ण गट माझ्याविरोधात काम करत आहे. त्यात माझे नुकसान होत आहे, असेही ए. आर. रेहमानला वाटत आहे आणि त्याला हे असं वाटणं खूपच धक्कादायक आहे.

माझ्या नशिबावर माझा विश्वास असून मला वाटतं जे काही असते ते देवाची देणं असते. आपल्याला जे काही मिळते ते परमेश्वराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते, असे मला वाटते. त्यामुळेच मला चित्रपट मिळत आहेत आणि इतर गोष्टींवरही मी काम करतो आहे. माझ्याकडे कोणीही येऊ शकते. तुम्ही चांगल्या चित्रपटांची निर्मिती करत आहात, माझ्याकडे आल्यास मी तुमचे स्वागतच करेन, असे ए. आर. रेहमानने स्पष्ट शब्दांत कंपूशाही करणाºया बॉलिवूडमधल्या गटाला ठणकावून सांगितले आहे. हीच परिस्थिती रसूल पुकुट्टीची असून त्यानेही आपली हीच व्यथा मांडली आहे. मुळात आॅस्कर जिंकणं हे देशासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि त्यात रेहमानने ती किमया दोनदा केली आहे. असं असूनही बॉलिवूडमध्ये कंपूशाही करणारा गट या मातब्बर कलाकारांना बॉलिवूडपासून दूर ठेवत आहे, असे वारंवार आरोप होत आहेत. ही मंडळी आपल्या टॅलेंटच्या जोरावर सहज हॉलिवूडमध्ये जाऊ शकतात. मात्र, तरीही ही मंडळी भारतात राहून इथल्या सिनेइंडस्ट्रीची इमाने इतबारे सेवा करताहेत आणि जी मूठभर मंडळी या प्रतिथयश लोकांचं टॅलेंट सहन करू शकत नाहीत त्यांना यांचं वावडं आहे आणि त्याचमुळे बॉलिवूडपासून ही मंडळी एक ना एक दिवस दुरावतील आणि याचा मोठा फटका भारतीय प्रेक्षकाला बसेल ही चिंता सतावते आहे.

Web Title: Bollywood's not interested in those actors who wins Oscar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.