विरोधात चाललेली हवा, ‘बूस्टर डोस’साठी भाजपचा महाराष्ट्रावर डोळा; हवे ते मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 07:58 AM2021-06-17T07:58:16+5:302021-06-17T07:59:04+5:30

पश्चिम बंगालमध्ये मार खाल्ल्यानंतर भारतीय जनता पक्ष आता एका दमदार ‘बूस्टर डोस’च्या शोधात आहे. विरोधात चाललेली हवा उलटी फिरवण्यासाठी सरकारने लसीकरण धोरणाबाबत चक्क कोलांट उडी मारली.

BJP's eye on Maharashtra for 'booster dose' in opposite wave after west Bengal election | विरोधात चाललेली हवा, ‘बूस्टर डोस’साठी भाजपचा महाराष्ट्रावर डोळा; हवे ते मिळेल का?

विरोधात चाललेली हवा, ‘बूस्टर डोस’साठी भाजपचा महाराष्ट्रावर डोळा; हवे ते मिळेल का?

Next

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

पश्चिम बंगालमध्ये मार खाल्ल्यानंतर भारतीय जनता पक्ष आता एका दमदार ‘बूस्टर डोस’च्या शोधात आहे. विरोधात चाललेली हवा उलटी फिरवण्यासाठी सरकारने लसीकरण धोरणाबाबत चक्क कोलांट उडी मारली. बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्याची घोषणा खुद्द पंतप्रधानांनी केली. मोफत अन्न योजना दिवाळीपर्यंत चालू ठेवण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले, हाही एक बूस्टर डोसच होता; पण पक्षाला सध्या पाच राज्यांतल्या निवडणुकांपूर्वी एखादा सणसणीत राजकीय बूस्टर डोस हवा आहे. महाराष्ट्र पुन्हा काबीज करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले, ते याचाच भाग म्हणून. पहिली खेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना ते घरी जाऊन भेटले. 

भेट सौहार्दपूर्ण झाली आणि कोणत्याही राजकीय विषयावर बोलणे झाले नाही, असे सांगण्यात आले; पण राजकारणात वेळेला महत्त्व असते. पवार यांच्यावर मार्चमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि पश्चिम बंगालमध्ये फटका खाल्ल्यानंतर फडणवीस त्यांना ३१ मे रोजी भेटले. दोघांत काय बोलणे झाले हे गुलदस्त्यात असले तरी आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार एनडीएमध्ये येण्याचा विचार पवार यांनी पुन्हा करावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी हा प्रयत्न फसला होता. ठाकरे यांनी दिलेला धक्का नंतर उद्भवला. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना त्यांनी आपली चुणूक दाखवली. पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे यांच्यातही खाजगी भेट झाली. उद्धव ठाकरे मोदींच्या घरी जाऊन त्यांना भेटले. भेटीत काय बोलणे झाले हेही बाहेर आले नाही; पण एक नक्की की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आता रमले आहेत आणि काही झाले तरी ते आपली खुर्ची सोडू इच्छित नाहीत. राष्ट्रवादीकडे भाजपबरोबर जाण्याचा पर्याय  असला, तर  शिवसेनेला सोबत ठेवणे संघासाठी महत्त्वाचे असेल. महाराष्ट्रातल्या त्रिपक्षीय अनैसर्गिक आघाडीबाबत अखेरचा शब्द अजून लिहिला जायचाय, हेच खरं!

योगींच्या दिल्ली भेटीत नक्की काय झाले? सरकारची री ओढणाऱ्या खाजगी माध्यमांसाठी ‘गोदी मीडिया’ अशी एक संज्ञा वापरली जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली भेटीबाबत या ‘अशा’ माध्यमांनी ज्या काही बातम्या दिल्या, वास्तव त्याच्या विपरीत होते, अशी चर्चा दिल्लीत सुरू  आहे. योगी आदित्यनाथ नुकतेच दिल्लीत येऊन पंतप्रधानांना भेटले. भाजप श्रेष्ठी आणि योगी यांच्यात सध्या तणाव आहे. विश्वासार्ह संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजपला कडव्या विरोधाला सामोरे जावे लागेल, अशी चिन्हे दिसत असल्याने श्रेष्ठी चिंतेत आहेत. समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यात येत्या विधानसभा निवडणुकीत सरळ लढत होईल आणि काँग्रेस, बसपा, रालोद हे पक्ष कोपऱ्यात ढकलले जातील, असे दिसते. पश्चिम बंगालमध्ये हेच झाले होते. 

- याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी उत्तर प्रदेशच्या त्रिभाजनाची कल्पना मांडली आहे. १० जूनला त्यांनी ही योजना समोर आणली तेव्हा योगी यांना धक्काच बसला. विधानसभा अधिवेशन बोलावून ठराव करून ही सूचना अमलात आणावी, असे त्यांनी त्यावर म्हटले. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर मोठ्या राज्यांच्या त्रिभाजनाची मूळ कल्पना संघ परिवाराची आहे. संघाच्या मते २० टक्के लोक भाजपला अजिबातच मते देत नाहीत. उत्तर प्रदेश राखायचा असेल तर हा मार्ग उपयोगी पडेल, असे संघाला वाटते. 
पुढचे आठ महिने पक्षाचा आपल्या नेतृत्वावर  विश्वास असला पाहिजे, असे म्हणणाऱ्या योगींना मात्र ही कल्पना पसंत नाही. तरीही पक्षाला ती राबवायचीच असेल, तर आपण गोरखपूरच्या मठात परत जायला तयार आहोत, असे योगी यांनी कधी नव्हे ती तब्बल ९० मिनिटे  चाललेल्या दीर्घ बैठकीत श्रेष्ठींना सांगून टाकल्याचे कळते. दुसऱ्या दिवशी योगी मोदींना भेटले तेव्हा हा विषय निघाला नाही. पंतप्रधानांच्या योजना उत्तर प्रदेशात कशा राबवल्या जात आहेत आणि कोविडची साथ राज्याने कशी हाताळली याचे तासाभराचे व्हिडिओ सादरीकरण योगी यांनी केले. ‘विविध सामाजिक गटांचे संबंध जपा आणि पक्षातील सगळ्यांना बरोबर घेऊन चला’ असा सल्ला पंतप्रधानांनी योगी यांना दिल्याचे कळते. या ठिकाणी कोणाच्याही नावांची चर्चा अगर उल्लेख झाला नाही. 

जे.पी. नड्डा यांच्या घरी ११० मिनिटे बैठक झाली, तेथे नावांची यादी घेऊन तपशीलवार चर्चा झाली. श्रेष्ठींनी योगी यांना जीवदान दिले असेल, तर त्या बदल्यात दिल्लीच्या पसंतीच्या नावांना उमेदवारीच्या यादीत जागा करून देण्याचे योगी यांनी मान्य केले असावे. उत्तर प्रदेशने कोविडशी कसा प्रभावी सामना केला, याचे विशेष सादरीकरण माध्यमांसमोर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले, हेही एक विशेषच! 

‘जी २३’ मधील नेत्यांशी राहुल यांचा तह काँग्रेस पक्षात अखेर शांतता प्रस्थापित झाली आहे. ‘जी २३’ या बंडखोर गटातल्या नेत्यांशी तह केल्याने राहुल यांच्या पुनर्वसनाची शक्यता वाढली आहे. कुरबुरी शक्य तेवढ्या लवकर संपल्या पाहिजेत, तरच नजीकच्या काळात राज्यात होणाऱ्या निवडणुकांत भाजपशी सामना करता येईल, असे कार्यकर्त्यांना वाटते. झालेल्या तडजोडीनुसार गुलाम नबी आझाद यांचे पुनर्वसन आधी व्हावे, असे ठरले. आझाद यांच्याशी स्वत: राहुलच बोलले. गांधी कुटुंबीय ‘विसरा आणि क्षमा करा’ या तत्त्वाने जाणार असल्याची खात्री आझाद यांना देण्यात आली. काँग्रेसच्या आशा तरारून येताना दिसतात. पंजाब पुन्हा राखता येईल, उत्तराखंड आणि गोवा पुन्हा जिंकता येतील आणि मणिपूरमध्येही बाहेरून थोडीफार संधी आहे, अशी उमेद काँग्रेसच्या गोटात आहे.

Web Title: BJP's eye on Maharashtra for 'booster dose' in opposite wave after west Bengal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app