भोंदूगिरी करणाऱ्या खरातकडे दोन हजार कोटी आले कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:49 IST2026-04-02T08:49:42+5:302026-04-02T08:49:42+5:30

चिंचोक्यांचे हिरे, शक्तिवर्धनाचे धंदे आणि लैंगिक अत्याचारांच्या थराथरांचे कांदे सोलत गेले की दिसतो 'मनी लॉण्डिंग' अर्थात काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा!

Beyond Superstition The 2000 Crore Money Laundering Empire of Nashik Fake Ashok Kharat Baba | भोंदूगिरी करणाऱ्या खरातकडे दोन हजार कोटी आले कुठून?

भोंदूगिरी करणाऱ्या खरातकडे दोन हजार कोटी आले कुठून?

अभिजित कुलकर्णी 

नाशिकमध्ये उघडकीस आलेले भोंदू खरात प्रकरण केवळ अंधश्रद्धा, लैंगिक अत्याचार किंवा फसवणूक यापुरते मर्यादित मानून चालणार नाही. या बाबाच्या कथित दोन हजार कोटीच्या आर्थिक साम्राज्याची कहाणी त्याच्या बुवाबाजीहून जास्त चक्रातून टाकणारी आहे. वरवर पाहता चिंचोक्यांचे हिरे, शक्तिवर्धनाचे धंदे आणि अवकृपेच्या भीतीआड खुलेआम लैंगिक अत्याचारांच्या थराथरांचे कांदे सोलत आत गेले की, दिसतो बड्या आसार्मीच्या संगनमताने चाललेला 'मनी लॉण्डिंग' अर्थात काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा!

खरात केवळ भोंदूगिरी करणारा 'बाबा' नव्हता; तर एका सुसूत्र आर्थिक नेटवर्कच्या माध्यमातून तगडे 'नेटवर्थ' उभे करणारा व्यवस्थापक होता. खुल जा सीमसीमच्या धर्तीवर अंधश्रद्धा हा त्याच्या मायावी गुहेचे प्रवेशव्दार खुले करणारा पासवर्ड होता. त्याच्या गुहेत शिरल्यावर प्रॉपर्टी रॅकेटपासून हवालापर्यंतची अनेक दालने काळ्याचे पांढरे करू इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध होती, असे आता तपासात निष्पन्न होऊ लागले आहे. या भोंदूबाबाने नाशिक, पुणे, अहिल्यानगरसह विविध शहरांत उभारलेले 'प्रॉपर्टी रॅकेट' हे या साखळीचे ठळक उदाहरण.

बेनामी व्यवहार, सामायिक नावांवर घेतलेल्या मालमत्ता, ट्रस्टच्या आडून खरेदी या सगळ्यामुळे धनदांडग्यांच्या काळ्या पैशाला सुरक्षित 'पार्किंग स्पेस' मिळत होती. कर चुकवणे, मालकी लपवणे आणि आवश्यक तेव्हा कागदोपत्री व्यवहार स्वच्छ दाखवणे, हे सर्व त्याच्या कार्यपद्धतीचे भाग होते. काही प्रभावशाली राजकारणी, बडे सरकारी अधिकारी तसेच मोजके व्यावसायिक, डॉक्टर वगैरे मंडळींचा वरकड पैसा खरात अनेक मार्गानी वळवायचा हे सुध्दा तपासात उघड होत आहे. बड्या धेंडांच्या माध्यमातून त्याच्याकडे येत असलेला प्रचंड 'कॅश फ्लो' निष्क्रिय नव्हता; तो विविध मार्गानी फिरवला जात असे. सुरुवातीला स्थानिक पतसंस्थेतील गंगाजळी, फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशनच्या माध्यमातून कांद्याची करोडोंची उलाढाल, व्याजाने पैसे देणे, अशी एक एक पायरी सर करत मग सामायिक नावावर मोक्याच्या मालमत्तांचेप्रॉपर्टी रॅकेट ते थेट हवाला मार्गे विदेशातील उलाढालीपर्यंत बरेच उद्योग या बाबाने केल्याचे उघड होते आहे.

गेल्या काही वर्षांत खरातने केलेले तब्बल १५० विदेश दौरे हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. विदेशातही बेनामी मालमत्ता उभारल्याचा संशय निर्माण करणारी ही साखळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याचे संकेत त्यातून मिळतात. या सगळ्या माध्यमातून थोडथोडकी नव्हे तर तब्बल २,००० कोटींची कथित माया गोळा करणे चक्रावून टाकणारे आहे. तीन - चार पिढ्या खपून उभे राहणारे उद्योग जिथे एवढी संपत्ती उभी करू शकत नाहीत, तिथे एका तथाकथित 'बाबा'ने जेमतेम दशकभरात एवढी उंची गाठली. त्यातून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो हा पैसा नेमका कुणाचा होता? श्रद्धेच्या नावाखाली काळा पैसा पांढरा करण्याची आणि या गुंतवणुकीवर उत्तम रिटर्न्स मिळण्याची 'सुविधा' असल्याशिवाय हे शक्य नाही. बेहिशेबी पैसा 'दान' म्हणून दाखवण्याची सोय, रोख व्यवहारांना मिळणारे 'पवित्र' कवच, ट्रस्ट व भक्तीच्या नावे आर्थिक फेरफार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुप्तता. गुप्ततेच्या हमीमुळेच खरातच्या मोबाइलमधील अनेक कळीचे कॉन्टॅक्ट पासवर्डने सुरक्षित केल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक गुंतवणूकदाराला सुलभ आणि चांगला परतावा हवा असतो. खरातने ते नेमकेपणाने हेरत काळा पैसा 'दान' म्हणून स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून दिली. नंतर तो विविध मार्गानी पांढरा करून देण्याची हमी देणारी ही व्यवस्था म्हणूनच काही खास मंडळींसाठी 'सेफ इन्व्हेस्टमेंट' बनली असावी. असा पैसा बँकांमध्ये ठेवायला गेल्यास प्रश्न निर्माण होतात, बाजारात जोखीम असते. पण, 'बाबा'कडे त्याला वेगळेच अधिष्ठान होते.

खरात प्रकरणातील लैंगिक अत्याचार, भावनिक शोषण, फसवणूक हे मुद्दे गंभीर आहेतच आणि त्यावर भरपूर चर्चा होत आहे. पण, ते एका मोठ्या आर्थिक खेळाचे 'साइड इफेक्ट' असावेत, असे एकंदर चित्र पाहता जाणवते. म्हणूनच या प्रकरणाने केवळ एका व्यक्तीवर नाही, तर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इथे मुद्दा खरातपर्यंत मर्यादित नाही. त्याच्या माध्यमातून किती पैसा फिरला? त्याचा स्रोत काय होता? कोणाच्या मार्फत तो पांढरा झाला? आणि या साखळीतली मोठी नावे कोणती? या प्रश्नांची तड लागायला हवी. तसे न झाल्यास खरात तुरुंगात जाईल. पण, त्याच्यासारखी व्यवस्था नव्याने उभारणारा नवा बाबा नव्या ठिकाणी उदयाला येईल! 

abhijit.kulkarni@lokmat.com

Web Title : धोखेबाज खरात को दो हजार करोड़ रुपये कहाँ से मिले?

Web Summary : धोखेबाज खरात का दो हजार करोड़ से अधिक का साम्राज्य, धार्मिक आड़ में मनी लॉन्ड्रिंग में शामिल था। संपत्ति रैकेट, बेनामी लेनदेन और विदेश यात्राओं ने घोटाले को बढ़ावा दिया, जिसमें शामिल प्रभावशाली हस्तियों के बारे में सवाल उठते हैं।

Web Title : Where did Kharaat, the fraud, get two thousand crore rupees?

Web Summary : Fraudulent Kharaat's empire, exceeding ₹2,000 crore, involved money laundering through religious guise. Property rackets, benami transactions, and foreign trips facilitated the scam, raising questions about influential figures involved.