परिघापलीकडे आंबेडकरी विचार नेणारा विचारवंत

By सुधीर महाजन | Published: November 12, 2018 02:51 PM2018-11-12T14:51:19+5:302018-11-12T15:00:37+5:30

डॉ. अविनाश डोळस आंबेडकरी विचारांचे भाष्यकार होते. त्यापेक्षा त्यांनी या विचारांचा परिघ दलितांच्या पलीकडे शोषित, वंचितांपर्यंत विस्तारण्याचे काम केले.

Avinash Dolas who spread Ambedkariate thought all over | परिघापलीकडे आंबेडकरी विचार नेणारा विचारवंत

परिघापलीकडे आंबेडकरी विचार नेणारा विचारवंत

googlenewsNext

- सुधीर महाजन

१९८० च्या सुमारास औरंगाबाद वैचारिक चळवळी आणि आंदोलनाचे केंद्र होते. नामांतराचा लढाही ऐन भरात त्यामुळे विद्यापीठातील वातावरण कायम तापलेले. पोलिसांची छावणी, नामांतरवादी आणि प्रतिवादींची आंदोलने. नेमक्या याच वेळी विद्यापीठात शिकायला होतो. प्रा. प्रकाश सिरसट हा चळवळ्या वर्गमित्र त्यामुळे आजवर विचाराने कोराकरकरीत असलेला मी प्रकाशच्या सहवासाने आंदोलनात ओढला गलो आणि नामांतरवादी झालो. तेव्हा डोळस मास्तरांचा (आम्ही त्यांना  मास्तर म्हणायचो) परिचय झाला. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंतासोबत प्रकाशने त्यावेळी मराठवाड्यातील दलितांवर झालेल्या अत्याचाराचा पाहणी दौरा करून अहवाल केला होता. त्याच्यावरही जोरदार चर्चा झडत होत्या.

डोळस सर नेहमी भेटत, पण त्यांची ओळख पटली ती एका प्रसंगाने. विद्यापीठाच्या स्नेहसंमेलनाच्या बक्षिस समारंभात. मी, प्रकाश, दिलीप खरात, संजय मून, आम्ही बक्षिस स्वीकारायला व्यासपीठावर गेलो आणि तेथे नामांतराच्या घोषणा देत प्रशस्तीपत्रे फाडली. आमच्या घोषणा ऐकून पोलिसांनी धाव घेत आम्हाला पकडले आणि जीपमध्ये कोंबून छावणी पोलीस ठाण्यात आणले. आता पुढे काय हा प्रश्न होताच. संपर्कासाठी साधने नव्हती. कोणीतरी येईल ही खात्री होतीच. अर्ध्या तासात डोळस सर आणि अ‍ॅड. अंकुश भालेकर ठाण्यात पोहोचले. ‘अरे सांगून तरी अशा गोष्टी करत जा,’ असे बोलत पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिरले. अर्धा तास हे दोघे वाद घालत होते. आमच्यावर गुन्हा दाखल करू नका. ही मुले चळवळीतील आहेत. उच्च शिक्षण घेत आहेत. गुन्हा दाखल केला तर त्यांना भविष्यात समस्या निर्माण होतील. हे पटवून देत होते. शिवाय यांनी जो निषेध व्यक्त केला तो काही गंभीर गुन्हा नाही. हे कायदेशीर पटवून देत होते. शेवटी आमची सुटका झाली. येथूनच सर खऱ्या अर्थाने समजायला सुरुवात झाली. घरी गेलो की, पहिला प्रश्न जेवला का रे? या मग मागची काळजी लक्षात येत गेली. आंबेडकरी विचारांचा परिघ भेटी, चर्चेत उलगडत गेला.

डॉ. अविनाश डोळस आंबेडकरी विचारांचे भाष्यकार होते. त्यापेक्षा त्यांनी या विचारांचा परिघ दलितांच्या पलीकडे शोषित, वंचितांपर्यंत विस्तारण्याचे काम केले. डॉ. आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, तर या देशातील शोषित-वंचितांचे नेते होते. हा विचार उलगडून दाखविण्याच्या केवळ प्रयत्न केला नाही, तर भारिप-बहुजन महासंघाद्वारे वेगळ्या राजकीय मांडणीचा प्रयोग केला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाताना प्रा. डोळस, प्रा. माधव मोरे, प्रा. एस. के. जोगदंड, प्रा. प्रकाश सिरसट यांनी दलित युवक आघाडी बरखास्त केली. आणि यातून महाराष्ट्राला भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाची स्थापना झाली. यातूनच किनवट पॅटर्न, नांदेड पॅटर्न, अकोला पॅटर्न पुढे आले. तरुणांना नेतृत्व मिळाले आणि आंबेडकरी विचारांची व्याप्ती झाली. तरुणांना राजकीय सूर सापडला. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, आमदार अशा राजकारणात प्रवेश झाला.

निवडणुकीच्या राजकारणात दलित यशस्वी होणार नाहीत. कारण प्रत्येक मतदारसंघात तेवढे संख्याबळ नाही हे लक्षात घेऊन हा प्रयोग ‘अकोला पॅटर्न’ म्हणून पुढे आला. आज त्याचा विस्तार प्रकाश आंबेडकर एमआयएमशी युती करून करू पाहत आहेत. एमआयएमशी आंबेडकरी विचारांची युती किती संयुक्तीक हा प्रश्न खरे तर सरांना विचारायचे राहूनच गेले. ‘रोल मॉडेलच्या शोधात’ आणि नेतृत्वाचा शोध हे त्यांचे दोन लेख त्यांच्या वैचारिक वेगळेपणाची उदाहरणे म्हणता येईल. सगळीच दलित चळवळ ब्राहण्याविरुद्ध. चातुवर्ण्याधिष्ठित समाजात ब्राह्मण ही जात श्रेष्ठ असल्याने समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे जाणे साहजिक होते. येथपर्यंत डोळसांचे म्हणणे सर्वसामान्यांसारखे पण पुढे ते म्हणतात की, नेतृत्व करणारा ब्राह्मण समाज हा पुढे केवळ आपल्यापुरते बघू लागला. तेव्हा देशाची प्रगती अडखळली. याचीही नोंद ते घेतात. हा काळ टिळक आणि आगरकरांंचा. पुढे पुन्हा याची पुनरावृत्ती मंडळ आयोगानंतर झाली. मंडल शिफारशींचा ब्राह्मणांनी संकुचितपणे विचार केला आणि सामाजिक कार्यातून स्वत:ला आकसून घेतले; पण त्यामुळे देशात एक सामाजिक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली जी इतर समाजांना आतापर्यंत भरून काढता आली नाही. असे परखड निरीक्षण मांडायलासुद्धा आज धाडस लागते.

समाजाला आणि कार्यकर्त्यांना वेळप्रसंगी खडसावायला त्यांनी कमी केले नाही. अलीकडच्या काळात आंबेडकरी चळवळ वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला बांधण्याचे स्वार्थी उद्योग झाले. त्यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप  घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वर्गणी गोळा करून साजरी करणे म्हणजे त्यांचा विचार वाढविण्यास मदत करणे. परंतु गेल्या काही वर्षात जयंती, दलित साहित्य संमेलन असे सगळे उपक्रम प्रायोजित जाले आहेत. बाबासाहेबांच्या विचारांशी संबंध नसणारे पक्ष, आणि नेते आता त्यांच्या नावाच्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व करतात आणि काही दलित मंडळींना यातच स्वारस्य असते. कारण आंबेडकरी विचारांपेक्षा त्यांच्या राजकीय अजेंडा वेगळात असतो. आणि आंबेडकरी विचाराांचा मुलामा देऊन ते अजेंडा वापरतात. अशी रोखठोक भूमिका घेणारे डोळस सरच होते.

कोणत्याही घटनेचा वेगळ्याअर्थाने अन्वयार्थ लावण्याची त्यांची वैचारिक क्षमता थक्क करणारीच होती. १९७२ साली मराठवाडा विकास आंदोलन झाले. मराठवाड्याच्या विकासासाठी तरुणांनी केलेले हे आंदोलन. विजय गव्हाणे, बा. ह. कल्याणकरांसारखी मंडळी यातून पुढे आली. मराठवाड्यातील युवा शक्तीचा एका अर्थाने जागरच होता. परंतु पुढे या युवा शक्तीवर वैचारिक आणि सांसदीय राजकारणाची जोड मिळाली नाही. या आंदोलनातील बहुसंख्य युवक हे राजकारणापेक्षा चळवळीमध्येच रमले. त्यामुळे मराठवाड्यात प्रस्थापित राजकारणात समर्थ पर्याय मिळू शकला नाही. परंतु पुढे ऐंशीच्या दशकात हाच युवक शिवसेनेकडे आकृष्ट झाला. ही युवा शक्ती सेनेला आपसूक घावली आणि त्याचा राजकीय उपयोग करून घेत शिवसेनेने मराठवाड्यात आपले प्रभावक्षेत्र निर्माण केला. असे वेगळे विवेचन करणारे फक्त डोळस सर होते.

गेल्या काही वर्षात चळवळी रोडावल्या आणि जागतिकीकरणानंतरच्या पाव शतकात तर संपल्याच आहेत. राजकारणाने वेगळे वळण घेतले. राजकारण आणि समाजकारण यांचे कॉर्पोरेटिकरण झाले. प्रत्येक गोष्ट स्पान्सर्ड झाली. अशा बदललेल्या काळात पुरोगामी विचारांना वेगळा आयाम देण्याची गरज होती. या सर्व बदलाकडे डोळसपणे पाहत नवा मार्ग दाखविण्याची गरज असतानाच डोळस सर अचानक गेले.
 

Web Title: Avinash Dolas who spread Ambedkariate thought all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.