राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 07:52 PM2018-08-16T19:52:12+5:302018-08-16T19:59:12+5:30

सरकारे येतील, जातील, हा देश राहणार आहे, असं अटलजी म्हणायचे

Atal Bihari Vajpayee always stand for nation and nationalism | राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी

राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी

Next

- धर्मराज हल्लाळे

आज राजकारण विचार प्रवाहांच्या पलीकडे गेले आहे. डावी, उजवी अशी कोणतीही बाजू अन् बूज नसलेले सभोवतालचे राजकीय वर्तन मन विषन्न करणारे आहे. मध्यम मार्गाने जाणाऱ्यांनाही लक्ष्य केले जाते. ठोकशाही, झुंडशाहीचा अनेकदा जयजयकार पाहून लोकशाही स्तब्ध होताना दिसते. अशावेळी आपल्या विचारांवर, भूमिकेवर ठाम राहून विरोधी विचारांचाही सन्मान करणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग जीवनकार्य देशाला सदोदित दिशा देईल. किंबहुना राजमार्गांवरून भरकटणाऱ्यांना राजधर्माची शिकवण देत राहील.

अटलजींनी दीर्घ काळ विरोधी पक्षात राहून सत्ताधाऱ्यांवर प्रखर टीका केली. मात्र त्यांच्या वाणी अन् विद्ववतेचा पंडित जवाहरलाल नेहरूंपासून पी.व्ही. नरसिंहरावांपर्यंत सर्वांनीच आदर केला. अटलजींची लोकशाही मूल्यांवर अढळ श्रद्धा होती. आयाराम-गयाराम राजकारणावर त्यांनी कायम आसूड ओढले.

अटलजींच्या महाराष्ट्रात अनेक सभा गाजल्या. लोकसभेचे  तत्कालीन सभापती, काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर लातूर येथून लोकसभा निवडणुकीला उभे होते. अटलजी काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणावर सडकून टीका केली. मात्र चाकूरकर यांच्याविषयी बोलताना अटलजी म्हणाले...चाकूरकर अच्छे इन्सान है...स्वाभाविकच विरोधी पक्षातील उमेदवाराची केलेली स्तुतीच बातमी बनली. 

मतभेद जरी असले तरी या देशातील राजकीय पक्षांच्या नेत्यांत मनभेद नसावा. एकमेकांच्या विचार, धोरणांचे विरोधक असू शत्रू नव्हे, हेच ठासून सांगणारा नेता अटलजींच्या रूपाने देशाने पाहिला.

गुजरातच्या दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलजींनी विद्यमान पंतप्रधानांना त्यावेळी सांगितलेला राजधर्म हा आज इतिहास असला तरी त्यातून सर्वांनीच कायम बोध घेतला पाहिजे. 

अटलजी सांगत त्याप्रमाणे सरकारे येतील, जातील, हा देश राहणार आहे.

विकास, प्रगतीच्या चर्चेत भारतीय समाजाच्या एकसंघतेला धक्के देणारे राजकीय वर्तन जेव्हा जेव्हा घडेल त्यावेळी अटलजींचे बोल लक्षात आणून दिले पाहिजेत. जात,धर्म,भाषेच्या आधारावर भेद नको, अन्  त्याची जाण ठेवून समाजाला भानावर आणणारा अटलजींसारखा नेता हवा. ज्यांच्या वक्तृत्वाची आणि कर्तृत्वाची दखल पंडीत नेहरुंनी घेतली, हा दाखला देत असताना त्यांनी दाखवलेल्या राजमार्गावरून जाणे पुढच्या राजकीय पिढयांचे  कर्तव्य ठरते

 

Web Title: Atal Bihari Vajpayee always stand for nation and nationalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.