विशेष लेख: युती म्हणून लढायचे की जानी दुश्मन म्हणून...?
By अतुल कुलकर्णी | Updated: November 16, 2025 11:35 IST2025-11-16T11:33:12+5:302025-11-16T11:35:19+5:30
शिवसेना, राष्ट्रवादीची दोन घरांची चार घरं झाली. मात्र, गावागावात एकाच घराची सहा सहा घरं झाली आहेत...

विशेष लेख: युती म्हणून लढायचे की जानी दुश्मन म्हणून...?
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
लोकसभा निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करायचे म्हणून आम्ही झोकून देऊन काम केले. विधानसभेला फक्त देवाभाऊंसाठी मनाला मुरड घातली. पार्थचे प्रकरण बाहेर येताच आमच्या सौ.ने आम्हाला खूप झापले. तिला भाजपला मतदान करायचे होते. पण भाजपचा उमेदवार नसल्यामुळे तिला दादांच्या उमेदवाराला मतदान करावे लागले होते. त्याचा राग मनात धरून तिने आम्हाला आज चहा पण दिला नाही. सौ. च्या माहेरी दादांना मतदान करायचे होते. मात्र, तिथे त्यांचाही उमेदवार नसल्यामुळे त्यांनी म्हणे नाईलाजाने कमळाचे बटन दाबले... तर पोराच्या सासुरवाडीत शिंदेसेनेच्या उमेदवाराला मतदान करायचे होते, पण तिथे त्यांचा उमेदवार नव्हता म्हणून त्यांनी इच्छा नसताना दुसऱ्याला मतदान केले... आमच्या घरचे सोडून द्या... प्रत्येक घरात अशी उभी फूट पडली आहे.
एकाच घरात भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसचा कार्यकर्ता एका छताखाली राहतो. घराबाहेर पडले की एकमेकांच्या विरोधात घोषणा देतो. शिवसेना, राष्ट्रवादीची दोन घरांची चार घरं झाली. मात्र, गावागावात एकाच घराची सहा सहा घरं झाली आहेत... “कुठे नेऊन ठेवला गाव माझा” असे तुम्हाला विरोधक म्हणतील. मात्र तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. विरोधक नुसते बोलतात. प्रत्यक्षात काहीच करत नाहीत, हे सगळ्या महाराष्ट्राला कळाले आहे. पार्थचे प्रकरण बाहेर आल्यावर विरोधकांनी जोरदार पत्रकार परिषदा घेतल्या. आरोप करून शांत बसले. ते दुसरे काहीही करू शकत नाहीत.
तुम्ही विरोधात असता तर आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गाव पिंजून काढले असते. पार्थ, दादा यांच्या विरोधातले गाडीभर पुरावे लोकांना दाखवले असते... जलसिंचनातल्या ७० हजार कोटीच्या घोटाळ्यातले गाडीभर पुरावे दाखवले होते अगदी तसे... महागाई वाढली म्हणून सिलिंडर डोक्यावर घेऊन आंदोलन केले होते, तसे आंदोलन फक्त तुम्हीच करू जाणे... विद्यमान काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी अशी आंदोलने करणे सोडून दिले आहे. त्या बदल्यात तुम्ही त्यांच्या दोन-चार फायली क्लीअर करून द्या. आता पार्थचेच बघा ना. “तो असे काही करू शकेल असे मला वाटत नाही” अशी पहिली क्लीनचिट सुप्रिया सुळे यांनी दिली. इतका प्रभावी विरोधक असल्यावर तुम्हाला चिंता करायची गरज नाही...
आता निवडणुकीत कार्यकर्ते तुम्हाला आग्रह करतील. लोकसभा, विधानसभेला तुमच्यासाठी कष्ट केल्याच्या कहाण्या सांगतील... तुम्हालाच तिकीट देतो, असे तुम्ही आश्वासन दिल्याची आठवण करून देतील... आम्ही किती वेळा तुमच्या दिवाळीला आकाश दिवे करायचे, असेही विचारतील... असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला लोकसभा, विधानसभेत दिलेल्या गांधीजींच्या फोटोंचा हिशोब मागा... किती फोटो कुठे लावले? उरलेले फोटो कोणत्या कपाटात ठेवले, याचा जाब विचारा... मग बघा, सगळे कसे गप्पगार बसतील. तुम्ही ज्याला तिकीट द्याल त्याचे काम करू, असेही सांगतील... फार फार तर आणखी थोडे गांधीजींचे फोटो मागतील... जास्ती फोटो मागणाऱ्यांना शिंदेसेनेकडे पाठवा... ते दिलदार आहेत...
जे कार्यकर्ते आपल्या निवडणुकांमध्ये सतरंज्या उचलायचे, त्यांना त्यांचे काम करू द्या. ते त्यात तरबेज झाले आहेत. झेडपी, पालिका, महापालिकेच्या निवडणुकीत अन्य पक्षातील हिस्ट्रीशीटर शोधा. महिलांसाठी वॉर्ड आरक्षित असेल तर अन्य पक्षातील नेत्यांची बहीण, बायको उत्सुक असेल तर त्यांना तिकीट द्या. आपल्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते सतरंज्या टाकायला तयारच असतील.. सोलापुरात आपण आपल्याच पक्षातील नेत्याच्या विरोधकांना पक्षात घेऊन टाकले. त्यामुळे तिथे विरोधकच शिल्लक नाही. कोणाला तिकीट द्यावे, यासाठी आपल्याच पक्षात जो “टोकाचा सुसंवाद” सुरू आहे, तोच पॅटर्न सगळीकडे राबवायला हरकत नाही. आपल्याला आपला पक्ष मोठ्ठा करायचा आहे... तेव्हा आजपर्यंतची दोस्ती विसरा. एकमेकांच्या विरोधात जानी दुश्मनासारखे उभे राहा. निवडून आल्यानंतर आपण पुन्हा एकत्र येऊ... सगळेच विरोधक, सगळेच सत्ताधारी या न्यायाने आपण सगळ्यांना सत्तेचा थोडा थोडा लाभ देऊ, एवढाच संदेश महाराष्ट्रभर द्या. मग बघा काय होते ते...
तुमचाच, बाबूराव