डाॅ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
मायकल सेवेज नावाचे रेडिओ होस्ट, अमेरिकन लेखक एका घृणास्पद विधानामुळे अचानक जगभर चर्चेचा विषय झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर शेअर केलेल्या या विधानात भारत आणि चीनला नरक असे संबोधले होते.
कोण हे मायकल सेवेज?- २००३ साली मायक्रोसॉफ्ट नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या कार्यक्रमात फोन करणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी म्हटले होते ‘तुम्हाला एड्स होईल आणि तुम्ही मरून जाल.’ या घटनेनंतर त्यांचा हा कार्यक्रम ‘एमएसएनबीसी’ने रद्द केला आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकले. बाहेरून आलेल्या लोकांवर या महोदयांचा फार राग असतो. मायकल सेवेज यांचे ताजे विधान हे असे होते; ‘इथे एक मूल लगेच नागरिक होऊन जाते आणि नंतर चीन किंवा भारत किंवा जगातल्या कुठल्याही नरकातून त्याचे अख्खे कुटुंब इथे येते. हे पाहण्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. आता अमेरिकेत इंग्रजी बोलली जात नाही.’
ट्रम्प यांनी हे घृणास्पद विधान समाजमाध्यमांवर का टाकले? उत्तर देणे कठीण आहे. कारण ट्रम्प यांच्या मनात काय चाललेले आहे हे त्यांनाच माहीत असते. परंतु, मायकल सेवेज यांच्यासारख्या व्यक्तीला अमेरिकेच्या अध्यक्षांनी आपल्या समाज माध्यम हँडलवर प्रतिष्ठा देणे शोभादायी नाही, अशी टीका खुद्द अमेरिकेतच होत आहे. अनेक खासदारांनी याला केवळ पदाची अप्रतिष्ठा आणि वंशवादी शेरेबाजी असल्याचे उघडपणे म्हटले आहे. ट्रम्प यांचे पाठीराखेही या प्रसंगाने आश्चर्यचकित झाले. परिस्थिती सावरण्यासाठी दिल्लीमध्ये अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने एका वृत्तसंस्थेला तत्काळ सांगितले की, ‘भारत हा महान देश आहे आणि या देशाच्या शीर्षस्थानी माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे’. अर्थातच या विधानातील ‘मित्र’ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशी विधाने ट्रम्प यांनी यापूर्वीही केली आहेतच; परंतु मायकल सेवेज यांचे विधान समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर ट्रम्प असे काही म्हणाले का?
भारत आणि चीनला नरक संबोधणाऱ्या या विधानावर प्रचंड टीका झाली. ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देऊन भारत सरकार या विधानाचा जळजळीत समाचार का घेत नाही, यावरून भारतात विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. ‘अशी टिप्पणी करणे अनुचित असून, भारत-अमेरिका यांच्यातील वास्तव संबंधांचे ती निदर्शक नाही’ असे उत्तर सरकारने दिले. वास्तविक, भारताने घेतलेला हा संयमित पवित्रा योग्य आहे. दुसऱ्यांना प्रत्युत्तर देताना आपण आपली प्रतिष्ठा का घालवावी? चीननेही असेच केले आहे. भारतातील चिनी वकिलातीच्या प्रवक्त्या यु जीन यांनी ‘एक्स’वर भारत आणि चीनचा ध्वज शेजारीशेजारी ठेवून लिहिले- ‘व्हायरल झालेले शब्द फिके पडतात. वास्तवातील मैत्री फिकी पडत नाही.
द्विपक्षीय संबंध हे शेरेबाजीतून नव्हे तर आपापसातील सन्मानावर टिकतात.’ म्हणजेच भारत आणि चीन यांनी उत्तर देताना प्रतिष्ठा राखणारी भाषा वापरली आहे. पण समजा, मायकल म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेत बाहेरून आलेले कोणीच राहिले नाही तर अमेरिका हा देश कसा असेल? जरा गणित करूया. अमेरिकेची लोकसंख्या जवळपास ३५ कोटींवर पोहोचली आहे. त्यात बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किमान पाच कोटी आहे. याचा अर्थ प्रत्येक सात अमेरिकन माणसांच्या मागे एक माणूस बाहेरून आलेला आहे. यात एक कोटीपेक्षा जास्त लोक मेक्सिकोचे आहेत. जवळपास ५५ लाख भारतीय आहेत. आणि चिनी लोकांची संख्या भारतीय लोकांपेक्षा थोडी कमी असण्याची शक्यता आहे. या बाहेरून आलेल्यांना पूर्णपणे वगळले तर अमेरिकेची लोकसंख्या ३० कोटी राहील. मूळच्या अमेरिकन लोकांचा जन्मदर कमी आहे आणि अमेरिकन काँग्रेसचे अर्थसंकल्पीय कार्यालय सांगते त्याप्रमाणे कमी जन्मदर आणि वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे २०४० मध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की प्रत्येक वर्षी कमी माणसे जन्माला येतील आणि मरणाऱ्यांची संख्या जास्त असेल. एक अंदाज असाही आहे की बाहेरून आलेल्यांना पूर्णपणे वगळले तर प्रती व्यक्ती नक्त देशांतर्गत उत्पन्नात किमान दहा टक्क्यांची घट होईल.
नागरी क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये सुमारे तीन कोटी लोक असून, त्यातील १९ टक्के बाहेरून आलेले आहेत. शेतात काम करणाऱ्यांमध्ये ७० टक्के मजूर बाहेरून आलेले ‘स्थलांतरित’ आहेत. अमेरिकेचा ‘गरिमा’ असलेली सिलिकॉन व्हॅली भारतीयांनी घेतलेले कष्ट आणि क्षमतेमुळेच उभी राहिली आहे. ॲपल ही बलाढ्य अमेरिकन कंपनी सिरीयन स्थलांतरितांचा मुलगा स्टीव्ह जॉब्स यांनी स्थापन केली. अमेरिकेच्या पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये सुमारे ४५ टक्के कंपन्या स्थलांतरित किंवा त्यांच्या मुलांनी उभ्या केल्या आहेत. एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक महसूल देणारे ५५ टक्के स्टार्ट अप्स स्थलांतरितांनी सुरू केले आहेत. मूळचे भारतीय लोक अमेरिकेमध्ये प्रतिवर्षी २५० ते ३०० अब्ज डॉलर्स कर भरत असतात. ही रक्कम अमेरिकेच्या एकूण कर उत्पन्नाच्या पाच ते सहा टक्के आहे.
मायकल सेवेज यांच्यासारखे लोक जेव्हा भारताला नरक म्हणण्याचा निलाजरेपणा दाखवतात तेव्हा हे नक्की, की त्यांचा मेंदू सडला आहे. असे माथेफिरू जगाच्या प्रत्येक भागात सापडतात. त्यांच्या म्हणण्याला महत्त्व देण्यात काहीही अर्थ नसतो. भारतीय विचार ‘वसुधैव कुटुंबकम’वर विश्वास ठेवतो. आपण मायकल सेवेज यांच्यासारख्या वेडपट लोकांची पर्वा करता कामा नये.
Web Summary : An American radio host's derogatory remarks about India and China sparked controversy. The article analyzes the significant contributions of immigrants to the US economy and emphasizes India's philosophy of 'Vasudhaiva Kutumbakam,' urging disregard for hateful rhetoric.
Web Summary : एक अमेरिकी रेडियो होस्ट की भारत और चीन के बारे में अपमानजनक टिप्पणियों ने विवाद खड़ा कर दिया। लेख अमेरिकी अर्थव्यवस्था में आप्रवासियों के महत्वपूर्ण योगदान का विश्लेषण करता है और 'वसुधैव कुटुंबकम' के भारतीय दर्शन पर जोर देता है, साथ ही घृणित बयानबाजी को अनदेखा करने का आग्रह करता है।