लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 08:25 IST2025-09-09T08:21:32+5:302025-09-09T08:25:05+5:30
दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण प्राचीन मार्ग अनुसरला पाहिजे, की आधुनिक विज्ञानाच्या मार्गाने जावे?- खरे तर त्यासाठी दोन्ही आवश्यक आहेत.

लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
- डॉ. एस. एस. मंठा (माजी अध्यक्ष भारतीय तंत्रशिक्षण परिषद)
‘आरोग्यम् परमं भाग्यम स्वास्थ्यस्य जीवनम् सुखं’... असे चरकाने सांगितले आहे. त्याचा अर्थ, चांगले आरोग्य हाच मोठा आशीर्वाद आहे आणि निरोगी माणसाचेच आयुष्य आनंददायी होते. हे ज्याला समजले, त्याने आपले आयुष्य दु:खात घालवू नये. परंतु दु:ख टाळायचे कसे?
आधुनिक वैद्यक आणि विज्ञान आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि सामाजिक नातेसंबंध यावर भर देते. जेथे माणसे सहजरीत्या शंभरी पार करतात अशा प्रदेशांना ‘ब्ल्यू झोन’ म्हणतात, त्याविषयी संशोधकांचे काय म्हणणे आहे?
सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे वनस्पतिजन्य आहार, म्हणजेच भाज्या, धान्ये, हितकारक चरबी यांचे सेवन आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळणे. उष्मांक कमी केले आणि अधूनमधून उपवास केला तर अधिक चांगले. दुसरे म्हणजे चालणे, योगासने, बल वाढवणारे व्यायाम.
तिसरे म्हणजे सततचा ताणतणाव टाळणे, चांगली झोप घेणे आणि सतत अध्ययनशील राहणे. मनातील विचारांवर लक्ष केंद्रित करण्याला, ध्यानधारणेला मनोविज्ञानाने प्राधान्य दिले आहे. अंतिमत: जपानीत ज्याला ‘इकीगाई’ म्हटले जाते ते. म्हणजे आपण एखादी गोष्ट कशासाठी करतो आहोत याचे पक्के भान. तेही महत्त्वाचे. नैराश्य येऊ नये म्हणून सामाजिक नातेसंबंध सांभाळणे गरजेचे ठरते.
आधुनिक विज्ञान हे सांगत असताना हिंदू तत्त्वज्ञानात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. दीर्घायुष्य म्हणजे केवळ शारीरिक अर्थाने जिवंत राहणे नसून, धर्म पालनाला त्यात महत्त्व आहे. पुरुषार्थ ही कालातीत संकल्पना असून, व्यक्ती म्हणून ती अर्थपूर्ण, समतोल जगण्यासाठी प्रेरणा देते.
अहिंसा आणि सात्त्विक अन्न, योग, प्राणायाम, ध्यान आणि अलिप्तता त्याचप्रमाणे सेवा आणि भक्ती ही प्रमुख तत्त्वे होत. अहिंसा आणि सात्त्विक आहारामुळे स्पष्टता येते, दीर्घायुष्य मिळते. योग आणि प्राणायाम यामुळे शरीर बलवान होते.
नाडीशुद्धी होऊन ऊर्जा संचरण वाढते. त्यातून शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीला साहाय्य होते. ध्यान आणि अलिप्तता यातून मनाला शांती मिळते, ताण कमी होतो. अंतरात्म्याशी नाते जोडले जाते. भौतिकतेपासून स्वतःला दूर ठेवले तर मानसिक शांतता, समाधान मिळते. सेवा आणि भक्ती किंवा निष्काम कर्म आणि भक्ती यातून वृद्धत्वात गरजेचा असलेला सहानुभाव वृद्धिंगत होऊन आनंद मिळतो.
धर्म म्हणजे सदाचरण, कर्तव्य, नीतिमूल्ये आणि नैतिक आचरण. अर्थ म्हणजे ऐहिक समृद्धी, यश, प्रगती. त्यातून आर्थिक सुरक्षितता मिळते, भौतिक गरजा पूर्ण होतात. जीवनातील विविध भूमिका पार पाडताना बंधने पडतात.
कर्तव्य पार पाडताना धर्माने सांगितलेली नैतिक तत्त्वे उपयोगी पडतात. अर्थ नैतिक मार्गांनी संपत्ती मिळवा असे सांगतो. काम म्हणजे आपल्या इच्छा, इंद्रियजन्य सुखे. यात भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारची सुखे येतात. मोक्ष म्हणजे मुक्ती,आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि जीवनाचे अंतिम ध्येय.
जगातील सर्व सुखांचा त्याग आणि संसारातून मुक्ती. आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजून घेऊन आत्मजागृती होणे म्हणजे मोक्ष.
दीर्घ आयुष्य म्हणजे केवळ एक जैविक प्रक्रिया नसून भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे. आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक मूल्ये सांभाळून अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक अशी चौकट पुरुषार्थ आपल्याला देतो.
सर्वच आश्रमात धर्माचे स्थान आहे. ब्रह्मचर्य आश्रमात अध्ययन ज्ञान आणि शहाणपण मिळते. अर्थ आणि काम या गृहस्थाश्रमाच्या किल्ल्या असून, वानप्रस्थ आणि संन्यास मोक्षाकडे नेतात.
दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी मग आपण प्राचीन मार्ग अनुसरला पाहिजे की आधुनिक विज्ञानाच्या मार्गाने जावे?- खरे तर त्यासाठी दोन्ही आवश्यक आहेत. प्राचीन संस्कृतीने आपल्याला मौलिक ज्ञान आणि शहाणपण दिले, तर आधुनिक जीवन हे तंत्रज्ञानावर उभे राहिले.
नव्या तंत्रज्ञानाच्या अंगीकाराने आरोग्याची काळजी, वाहतूक आणि संवाद सुकर झाला. कालसंगत अशी कौशल्ये, शिक्षण आणि आधुनिक संधींचा अंगीकार करून आपण वर्तमानाशी जुळते घेतले पाहिजे. प्राचीन संस्कृतीने पुरस्कारलेल्या मूल्यापासून बोध घेतला तर त्यातून आपली व्यक्तिगत वाढ आणि कल्याणच होईल.
मात्र, पारंपरिक ज्ञान वर्तमान संदर्भामध्ये जोडून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यातून आधुनिक समाजाचे फायदे मिळतील, त्याचबरोबर भूतकाळाने घालून दिलेल्या आदर्शांना धक्का लागणार नाही, त्यांचाही आदर होईल.