जे पोटात, तेच ओठात असा दिलदार नेता! गेल्या ४० वर्षांचा सहवास अर्ध्यावर सोडून गेलेल्या मित्राबद्दल काय सांगू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:47 IST2026-01-29T07:46:29+5:302026-01-29T07:47:29+5:30
Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच मन सुन्न झाले. त्या क्षणी काय वाटले, हे शब्दांत सांगणे खरोखरच फार अशक्य आहे. आम्हा दोघांचा गेल्या ३५ ते ४० वर्षांचा सहवास. एवढी कारकीर्द राजकीय आणि सामाजिक जीवनात आम्ही एकत्र काढली. हा सर्व काळ आता नजरेसमोर तरळतो आहे.

जे पोटात, तेच ओठात असा दिलदार नेता! गेल्या ४० वर्षांचा सहवास अर्ध्यावर सोडून गेलेल्या मित्राबद्दल काय सांगू?
- आ. जयंत पाटील
(राष्ट्रवादी (शरद पवार))
अजितदादांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच मन सुन्न झाले. त्या क्षणी काय वाटले, हे शब्दांत सांगणे खरोखरच फार अशक्य आहे. आम्हा दोघांचा गेल्या ३५ ते ४० वर्षांचा सहवास. एवढी कारकीर्द राजकीय आणि सामाजिक जीवनात आम्ही एकत्र काढली. हा सर्व काळ आता नजरेसमोर तरळतो आहे.
काँग्रेसमध्ये आम्ही दोघे एकत्रित काम करत होतो. पुढे वर्ष १९९९ मध्ये शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षातून आम्हा दोघांची पुढची सफर सुरू झाली, तेव्हापासून आम्ही दोघांनीही मागे वळून पाहिले नाही. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न बघत राज्याच्या प्रगतीसाठी अनेक महत्वाचे निर्णय आमच्या साक्षीने, सहभागाने घेतले गेले. शेतकरी, कष्टकरी कामगार, दुष्काळजन्य परिस्थिती अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर आम्ही त्या त्या वेळी स्पष्ट भूमिका मांडत आलो. अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीचा मी अत्यंत निकट साक्षीदार आहे.
अत्यंत स्पष्ट विचाराचा, रोखठोक मते मांडायला अजिबात हयगय न करणारा नेता म्हणून अवघ्या राज्याला दादांची ओळख. ‘पोटात एक आणि ओठात एक’ हे त्यांना कधीही जमले नाही, तो त्यांचा स्वभावच नव्हता. आमच्या वाळवा तालुक्याकडे अजितदादांचे प्रेमदायी लक्ष होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कार्यरत असताना ईश्वरपूर बारामतीसारखेच झाले पाहिजे, अशा वारंवार सूचना देताना दादांनी लगावलेले मार्मिक टोले मी आजही विसरलेलो नाही.
राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक आमचे नेते, शरद पवार आणि अजितदादा यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला, तो काळ आम्हा सगळ्यांसाठीच मोठा क्लेशदायी होता. या दुराव्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विभागले गेले आणि राष्ट्रवादीची परिस्थिती अस्थिर होत असतानाच अजित पवार यांनी महायुतीशी केलेली आघाडी राज्याच्या हिताची ठरत गेली. बदलत्या परिस्थितीची पावले ओळखून अगदी अल्पावधीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्रित येण्याचे संकेत होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काही ठिकाणी ते वास्तवात आलेही. महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्या पुन्हा एकदा एकत्रित येण्याची लक्षणे दिसत असताना, राज्याच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनाला अजितदादांकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असताना दादांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवार कुटुंबीयांच्या दुःखाची तर कल्पनाही करता येणे शक्य नाही. त्या कुटुंबाने एका कर्तबगार मुलगा गमावला आहे.
मी, दिलीप वळसे-पाटील, आर. आर. आबा, अजितदादा असे आम्ही सर्व एकाचवेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आलो आणि त्यामुळेच आम्हाला प्रदीर्घ काळ सोबत काम करता आले. माझ्यासाठी हा सगळाच काळ अत्यंत अविस्मरणीय असा आहे. त्यात अजितदादांचा वाटा अर्थातच मोठा! शेतीतील भाजीपाला विकण्यापासून ते संस्था सांभाळणे, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा साऱ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या या माणसाने राज्याच्या राजकारणातच नव्हे, तर लोकमानसातही आपल्या कर्तबगारीने स्थान मिळवले होते. अजितदादांच्या अकाली निधनाची बातमी राज्यातील कार्यकर्त्यांना सुन्न करून टाकणारी आहे. त्यांची उणीव कधीही भरून येणार नाही.