भरधाव दुचाकी नाल्यात कोसळली, एकाचा मृत्यू; साक्री तालुक्यातील रोहोड रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 22:52 IST2023-04-14T22:52:04+5:302023-04-14T22:52:26+5:30
पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुरुवारी अपघाताची नोंद करण्यात आली.

भरधाव दुचाकी नाल्यात कोसळली, एकाचा मृत्यू; साक्री तालुक्यातील रोहोड रस्त्यावरील घटना
धुळे : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रोहोड रस्त्यावरील रेट्या नाल्यात जाऊन कोसळली. यात दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून उपचार घेताना एकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुरुवारी अपघाताची नोंद करण्यात आली.
एमएच ३९ टी ३९२३ क्रमांकाची दुचाकीवर चिंतामण राजमल साबळे (रा. जामुनपाडा ता. साक्री) भरत चुनिलाल कामडे (रा. चिंचपाडा) हे दोघे गावातून राहत्या घराकडे भरधाव वेगाने येत होेते. साक्री तालुक्यातील जामुनपाडा ते रोहोड रस्त्यावर असलेल्या रेट्या नाल्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट नाल्यात जाऊन पडली. यात दुचाकीवरील दोघांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर तातडीने दोघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला अधिक मार लागल्याने चिंतामण राजमल साबळे (रा. जामुनपाडा ता. साक्री) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भरत कामडे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्यात उत्तम राजमल साबळे (वय ४३, रा. जामुनपाडा ता. साक्री) यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.