लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर (धुळे): नंदुरबार येथील सराफा व्यावसायिकाला लुटून येणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी निजामपूर पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग केला. दरोडेखोरांना पकडण्यासाठी रस्त्यावर वाहनेही आडवे लावण्यात आले. रस्त्यावरील वाहनधारकांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा थरार अनुभवला. मात्र दरोडेखोर वाहनसोडून फरार होण्यात यशस्वी झाले. वाहनात चोरलेली बॅग व एक पिस्तुल सापडले असून, पोलिसांनी ते जप्त केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील सराफा व्यावसायिक रूपेश सुमनलाल सोनार हे शुक्रवारी आपले दुकान बंद करून घरी जात होते. त्यांच्याजवळ असलेली सोने-चांदीची बॅग चोरट्यांनी हिसकावून चारचाकी वाहनाने त्यांनी पोबारा केला. चोरटे निजामपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छडवेल जवळ पोलिसांनी चोरट्यांच्या वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी जैताणेकडे पळ काढला. तेथून पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटर अंतरापर्यंत चोरट्याच्या वाहनाचा पाठलाग केला. मात्र चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी वाहनासह दागिन्यांची बॅग ताब्यात घेतली आहे.