Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:34 IST2025-12-04T12:30:23+5:302025-12-04T12:34:46+5:30
Dhule Crime: बी. टेक. विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात दरोडा टाकला. पोलिसांनी या हायप्रोफाइल चोरीचा पर्दाफाश केला असून, भावेश नेरकर याला अटक केली आहे.

Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
धुळे : पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्ये उच्च शिक्षणाच्या नावाखाली मौजमजा करणाऱ्या तरुणाईचा ‘सैराट’ अनुभव देणारी धक्कादायक घटना साक्री येथे उघडकीस आली. केवळ चैनीची सवय लागलेल्या बी. टेक. विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात दरोडा टाकला. पोलिसांनी या हायप्रोफाइल चोरीचा पर्दाफाश केला असून, विद्यार्थी भावेश नेरकर (वय २०) याला अटक केली आहे.
पेरेजपूर रोडवरील सुयोग कॉलनी येथे राहणारा भावेश नेरकर याने साक्री पोलिसांत घरफोडीची फिर्याद दिली होती. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:०० ते ७:०० वाजेच्या सुमारास भावेश आणि त्याची आई बाहेर नातेवाइकांकडे गेले असताना चोरट्यांनी घर फोडून १० तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे त्याने तक्रारीत म्हटले होते.
पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा
पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, फिर्यादी भावेशचे वर्तन आणि त्याने दिलेली माहिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या नजरेने भावेशची ‘कुंडली’ बाहेर काढली असता, चक्क फिर्यादीच चोरटा असल्याचे निष्पन्न झाले.
चैनीसाठी पुण्यात रचला कट
बी.टेक.चे शिक्षण घेत असताना भावेशला तेथील झगमगाट आणि मौजमजेच्या जीवनशैलीची सवय जडली. पैशांची चणचण भासू लागल्याने त्याने दोन साथीदारांच्या मदतीने स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा कट रचला.
योजनेनुसार, ठरलेल्या वेळी आईला बाहेर घेऊन गेल्यानंतर त्याने साथीदारांकरवी घर फोडून घेतले. चोरलेले सोने त्यांनी लगेच विकण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी २ तोळे सोने भावेशने एका सराफाला विकले होते.
उरलेले सोने त्याने शेतात पुरून ठेवले होते. पोलिसांनी भावेश आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.