'My name is Sattar, I will remain in power, the government of Maha Vikas Aghadi is stable', abdul sattar | 'माझं नाव सत्तार, मी सत्तेतच राहणार, स्थिर आहे महाविकास आघाडीचं सरकार'

'माझं नाव सत्तार, मी सत्तेतच राहणार, स्थिर आहे महाविकास आघाडीचं सरकार'

ठळक मुद्देराज्य सरकार गेल्या 16 महिन्यांपासून आहे तिथेच आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत

धुळे/मुंबई - राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा शेवटून एक नंबर आहे. चंद्रकांत दादांचे गणित कच्चे असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे, असे सांगत ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर असल्याचा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. यावेळी, खासदार रावसाहेब दानवेंनाही सत्तार यांनी टोला लगावला. 

धुळ्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी फेटाळून लावला आहे. तसेच, शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरेंचं भरभरुन कौतुकही केलं. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जुन्या महापालिकेजवळ शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धुळे जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

राज्य सरकार गेल्या 16 महिन्यांपासून आहे तिथेच आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंना लक्ष्य केलं. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, असा टोलाही त्यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

चंद्रकांत दादांचे गणित कच्चे

अब्दुल सत्तार म्हणाले, "राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा शेवटून एक नंबर आहे. चंद्रकांत दादांचे गणित कच्चे असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे. भाजपा खोटी आकडेवारी देणारी पार्टी झाली असून ती जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच, महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर आहे." याशिवाय, आमच्याकडे परिपूर्ण आकडेवारी असून आकडेवारीच्या मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्यांना समोरासमोर येण्याचे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. 

उद्धव ठाकरे दानशूर व्यक्ती

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला. 
 

Web Title: 'My name is Sattar, I will remain in power, the government of Maha Vikas Aghadi is stable', abdul sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.