कुलूप दुरुस्तीच्या नावाखाली लांबविला ७० हजारांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 08:40 PM2021-07-11T20:40:09+5:302021-07-11T20:40:29+5:30

खोरी गावातील घटना, दोन जणांनी केली हातसफाई

Looted Rs 70,000 under the guise of lock repair | कुलूप दुरुस्तीच्या नावाखाली लांबविला ७० हजारांचा ऐवज

कुलूप दुरुस्तीच्या नावाखाली लांबविला ७० हजारांचा ऐवज

Next

धुळे : कपाटाच्या कुलुपाच्या दुरुस्तीचे नाव करून घरात शिरलेल्या दोघांनी मोठ्या शिताफीने सर्वांची नजर चुकवून रोख रक्कम व दागिने मिळून ७० हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना साक्री तालुक्यातील खोरी गावात ४ जुलै रोजी सकाळी घडली. ही घटना लक्षात आल्यानंतर शनिवारी दुपारी निजामपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

साक्री तालुक्यातील खोरी गावात राहुल हिरामण भामरे (३१) यांचे वास्तव्य असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांच्या घरातील कपाटाचे कुलूप बिघडले होते. ते दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे दोघेजण आले. त्यांनी त्या दोघांना घरात नेले आणि ज्या कपाटाच्या कुलुपाचे काम करायचे होते ते दाखविले. दोघे कुलुपाचे काम करीत असताना त्यांनी घरातील सदस्यांची नजर चुकवून हातसफाई केली. त्या दोघा चोरट्यांनी कपाटात ठेवलेले ८ हजार ११० रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, ४४ हजार ६०० रुपये किमतीची सोन्याची पोत आणि १७ हजार रुपये रोख असा एकूण ६९ हजार ७१० रुपये किमतीचा ऐवज मोठ्या शिताफीने लांबविला. ते घरातून गेल्यानंतर कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम मिळून न आल्यामुळे या दोघांनी ते लांबविले असल्याची शंका भामरे यांना आहे. याप्रकरणी राहुल भामरे यांनी शनिवारी दुपारी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Looted Rs 70,000 under the guise of lock repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे