Jaitane Mahervasheen Snehilamon Sakhalaya in Sakri Taluka | साक्री तालुक्यातील जैताणे माहेरवाशीण स्नेहमिलन सोहळा
dhule

जैताणे : माहेरवाशीण या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपने लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या सहकार्याने निजामपूर- जैताणे येथे माहेरवाशीण स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले होते.  मराठमोळ्या पारंपरिक कलात्मक पध्दतीच्या आविष्काराने दिमाखदार वातावरणात आदर्श विद्यामंदिराच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी माहेरवाशीनींनी वाणी समाजाच्या मंगल वास्तुला अकरा हजार आणि आदर्श विद्यामंदिरास अकरा हजाराची देणगी देऊन दातृत्वातून कर्तृत्वही सिद्ध केले. या माहेरवाशीन स्नेहमीलन सोहळ्यात राज्यासह, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून पाचशेहून जास्त माहेरवाशींणी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सटाणा येथील रुपाली कोठावदे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून  डॉ.नेहा शिरोरे (नासिक), संध्या सोंजे (नासिक), अर्चना येवले (पुणे), वर्षा शिरोडे (घाटकोपर), प्रिती येवले (नासिक), स्नेहलता नेरकर (नामपूर), दिपाली येवले (जळगाव), स्मिता शिनकर (नासिक), अपर्णा कोतकर (धुळे), उषा अमृतकर (सटाणा), वैशाली पिंगळे (धुळे), कालिंदी येवले (डोंबिवली) आदी उपस्थित होत्या.
वाणी समाज मंगल कार्यालयापासून शोभायात्रेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मराठमोळ्या वेशभूषा- केशभूषांनी पारंपारिक संस्कृती जोपासत सर्व माहेरवाशीनी सजलेल्या नटलेल्या होत्या. तेवढयाच उत्साहाने सासुरवाशीणींही शोभायात्रेत सहभागी झाल्या.  शोभायात्रेत माहेरवाशीनींनी वाद्याच्या तालावर व मराठी गितांच्या ठेक्यावर नृत्य करुन आनंद लुटला. ठिकठिकाणी पुष्पांचा वर्षाव करीत शोभायात्रेतील माहेरवाशीनींचे स्वागत करण्यात आले. रस्त्याचा दुतर्फा ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. 
याप्रसंगी विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाºया माहेरवाशीनींचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून ज्येष्ठ महिलांच्याहस्ते गौरव करण्यात आला. तसेच पर्यावरणाचा समतोल रहावा, यासाठी लेकींकडून रोपे वाटप करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमातून पारंपारिक लोकनृत्यांसह बालपणाच्या आठवणी जागवत कलागुणांचे दर्शन घडविले. कार्यक्रमाला हर्षा शिरोडे, कल्पना कोठावदे, निशा बदामे, मोनाली बदामे, अर्चना राणे, मिना राणे आदी माहेरवाशीनी व सासुरवाशीनीचे सहकार्य लाभले. वाणी समाज मंडळाचे सतिश राणे, दगडू पाटील, भुषण बदामे, मनोहर राणे, प्रमोद राणे, संदिप चिंचोले, विनोद मुसळे, सचिन कोठावदे, सुनिल राणे, उदय अमृतकर, मनोज राणे, रवींद्र वाणी, निंबा पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संध्या सोंजे, स्मिता शिनकर यांनी केले.


Web Title:  Jaitane Mahervasheen Snehilamon Sakhalaya in Sakri Taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.