२४ तासात २८ वेळा बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:26+5:302021-05-18T04:37:26+5:30

रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबावरील वाहिन्या हलत होत्या. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जयशंकर कॉलनीत कचरा ...

28 times in 24 hours | २४ तासात २८ वेळा बत्ती गूल

२४ तासात २८ वेळा बत्ती गूल

Next

रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबावरील वाहिन्या हलत होत्या. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जयशंकर कॉलनीत कचरा संकलन करणारी घंटागाडी आल्यानंतर विजय हौसिंग सोसायटीत राहणारी आशाबाई राजेंद्र येवले ही महिला कचरा टाकण्यासाठी आली असता वाऱ्यामुळे विजेची तार तुटली आणि आशाबाई यांच्या अंगावर पडली. वीजप्रवाहामुळे या महिलेला जोरदार धक्का बसला. त्यातच आशाबाई या फेकल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला. इतर महिलांनी आरडाओरड केली गर्दी जमा झाली होती. आशाबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

आशाबाई येवले यांचे पती राजेंद्र यांचा पाचकंदील भागात फळविक्रीचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्यात येवले परिवाराचा सहभाग असतो. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

वीज वितरण कंपनीने काही महिन्यांपूर्वी जयशंकर कॉलनी भागात वीज खांबावरील धोकादायक तारा बदलून केबल टाकली होती. मात्र येवले यांच्या घरासमोरील खांबावरून वीजवाहिन्या काढलेल्या नव्हत्या. रविवारी झालेल्या वाऱ्यामुळे या वाहिन्या मोठ्या प्रमाणात हलत होत्या. अशातच ही दुर्घटना घडल्याने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरात ठिकठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या असल्याने त्यांच्या जोडणीचे काम सोमवारी सकाळपासून सुरू होते. २४ तासांच्या कालावधीत तब्बल २८ वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा फटका हा सर्वाधिक देवपूर व साक्री रोड भागाला बसला होता.

रविवारी दुपारी अचानक चक्रीवादळामुळे धुळ्यात मोठ्या वादळीवाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वारा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वीजवाहिन्या तुुटल्या, काही ठिकाणी खांब वाकून गेले आहेत. यात अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी काम करीत आहेत. टप्प्याटप्प्याने वीज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न आहेत.

- एल. बी. गांगुर्डे, प्रभारी कार्यकारी अभियंता

Web Title: 28 times in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.