'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:56 IST2025-09-25T14:56:25+5:302025-09-25T14:56:53+5:30
आम्ही मदतीसाठी आग्रही राहू, नुकसानीच्या तुलनेत मदत तुटपंजी; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
लातूर/धाराशिव: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनीही लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. काटगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत "शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?" असा थेट सवाल केला.
'जमीनच वाहून गेली आहे, नवीन माती आणून टाकण्यासाठी मोठी मदत हवी,' असे सांगत शेतकऱ्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि सरसकट कर्जमाफीची मागणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. कुणीही या आस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका." ते म्हणाले की, सरकारकडून जाहीर झालेली मदत सन २०२३ च्या निकषांनुसार असून, नुकसानीची तीव्रता पाहता ती अत्यंत तुटपंजी आहे.
कर्जमुक्ती आणि मदतीसाठी आग्रही राहू
"मराठवाडा, जो दुष्काळी म्हणून ओळखला जातो, तिथे पहिल्यांदाच पूरपरिस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची हीच खरी वेळ आहे," असे ठाकरे म्हणाले. हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि कर्जमुक्ती या दोन्ही मागण्यांसाठी आपणही आग्रही राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तात्काळ मदत जाहीर करून उर्वरित मागण्यांसाठी सरकारवर दबाव कायम ठेवणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.