घड्याळ जिथे, तुतारी नाही तेथे; विलिनीकरणाचे ठाऊक नाही मात्र, निवडणुकीत मनोमिलनाची पुष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:04 IST2026-02-02T12:02:57+5:302026-02-02T12:04:14+5:30
धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी मिळून २८ जागांवर रिंगणात आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत.

घड्याळ जिथे, तुतारी नाही तेथे; विलिनीकरणाचे ठाऊक नाही मात्र, निवडणुकीत मनोमिलनाची पुष्टी
धाराशिव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु होती, ती अंतिम टप्प्यात आली होती, असे दावे केले जाऊ लागले आहेत. या दाव्यांतील तथ्ये ती करणाऱ्यांनाच ठाऊक असली तरी, एक मात्र खरे. निवडणुकीपूर्वीच मनोमिलन झाल्याचे लढतींवरून स्पष्ट होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी मिळून २८ जागांवर रिंगणात आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत. यावरून किमान मनोमिलनाला तरी पुष्टी मिळते.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना शरद पवारांची राष्ट्रवादी यात सहभागी होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात या चर्चेतून ती बाहेर पडली. उद्धवसेनेने पालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चेत फारसे स्वारस्य दाखवले नाही. जागावाटपावरून बिनसल्याच्या चर्चेला आता कोणताही अर्थ राहिला नाही. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा व गटांमध्ये होत असलेल्या लढती पाहिल्यास हे पूर्वनियोजित नव्हते, असे म्हणण्यालाही कोणता अर्थ उरत नाही. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेची राळ अजितदादांच्या निधनानंतर या दोन दिवसांत उठली आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादींनी उमेदवारी दाखल करतानाच समन्वय राखला होता की काय, त्यांच्यात पूर्वीच मनोमिलन घडून आले होते की काय, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ५५ जागांपैकी दोन्ही राष्ट्रवादी २८ जागांवर लढतीत उतरल्या आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत, हे विशेष. यावरून किमान मनोमिलनाची तरी पुष्टी होते.
१२ जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी मैदानात...
जिल्ह्यातील ढोकी, तेर, उपळा, पाडोळी, इटकूर, मंगरुळ, शिराढोण, खामसवाडी, आलूर, मंगरुळ, शहापूर, नंदगाव या १२ गटांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी एकाही ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात नाही.
सोळा गटांमध्ये घड्याळ लढतीत...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बेंबळी, मोहा, पारगाव, पारा, तेरखेडा, ईट, सुकटा, पाथरुड, वालवड, आष्टा, शेळगाव, अनाळा, जवळा, डोंजा, लोणी, बलसूर, सास्तूर या १६ गटांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यांच्याविरोधात तुतारीचा एकही उमेदवार मैदानात नाही.
त्या तेरा गटांवरूनही यावे लक्षात...
परंडा विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे १३ गट आहेत. या सर्व तेरा गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत. विशेष म्हणजे, या सबंध मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकही उमेदवार विरोधात उतरवला नाही.
उद्धवसेनेवर निशाणा?
शरद पवारांची राष्ट्रवादी लढत असलेल्या १२ जागांपैकी ११ जागेवर प्रतिस्पर्धी म्हणून सर्वाधिक उद्धवसेनेचे उमेदवार आहेत. एका जागेवर आघाडीतील काँग्रेस प्रतिस्पर्धी आहे. सोबतच याठिकाणी भाजप व शिंदेसेनाही प्रतिस्पर्धी आहेत.
प्रदेश उपाध्यक्षांची पुष्टी...
जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोन्ही राष्ट्रवादींनी मिळून लढवावी, असा निरोप देण्यासाठी अजितदादांनी मला दोनवेळा फोन केला होता. पहिल्यांदा हा निरोप देऊन शरद पवार साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले. दुसऱ्या पुन्हा फोन करून चर्चा झाली का, अशी विचारणा केली. महायुतीच्या बैठकीत हा विषय आपण मांडलाही होता.
-प्रा. सुरेश बिराजदार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)