वारी हुकली; भूम आगाराला सात-आठ लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:35+5:302021-07-20T04:22:35+5:30
भूम : सलग दोन वर्षांपासून कोरोनामुळे एसटी महामंडळ तोट्यात असून, प्रत्येक वर्षी आषाढी वारीतून मिळणाऱ्या सात ते आठ लाख ...

वारी हुकली; भूम आगाराला सात-आठ लाखांचा फटका
भूम : सलग दोन वर्षांपासून कोरोनामुळे एसटी महामंडळ तोट्यात असून, प्रत्येक वर्षी आषाढी वारीतून मिळणाऱ्या सात ते आठ लाख रुपयांच्या उत्पन्नावर येथील एसटी आगाराला पाणी सोडावे लागले आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी चोवीस तास धावणाऱ्या एसटीची चाके कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास पाच महिने, तर दुसऱ्या लाटेत दोन ते अडीच महिने रूतली होती. यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. आता दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या घटल्याने ७ जूनपासून एसटी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. परंतु, प्रवाशांची संख्या कमी असल्याने अनेक मार्गांवर अजूनही बसगाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. सध्या भूम आगारातून दैनंदिन साडेसहा हजार प्रवासी घेऊन लालपरी १४ हजार ५०० किमीचा प्रवास करीत आहे. यातून दैनंदिन साडेतीन लाखावर उत्पन्न आगाराला प्राप्त होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आषाढ महिन्यातील पंढरपूर वारीसाठी येथील आगाराकडून दहा जादा बसगाड्या सोडल्या जातात. या माध्यमातून आगाराला प्रत्येक वर्षी सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु, मागील दोन वर्षांपासून हे उत्पन्नदेखील थांबले आहे. कोरोनापूर्वी या आगारातून ६२ गाड्या दररोज २३ हजार किमीचा प्रवास करीत होत्या. मात्र, सध्या या फेऱ्याही निम्म्यावर आल्याने आगाराला मोठा आर्थिक फटका बसत असून, सद्यस्थितीही पन्नास टक्के तोटा सहन करीत सेवा सुरू आहे.