हक्कभंग! शेतकऱ्यांसाठी बोलताना खासदार निंबाळकरांचा फोन पोलीस निरीक्षकांनी बंद केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:00 IST2025-10-08T18:37:11+5:302025-10-08T19:00:43+5:30
४ मिनिटांत ५ वेळा कॉल, तरी उत्तर नाही! पोलीस निरीक्षक कानगुडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा खासदारांचा आरोप

हक्कभंग! शेतकऱ्यांसाठी बोलताना खासदार निंबाळकरांचा फोन पोलीस निरीक्षकांनी बंद केला
- संतोष वीर
भूम (धाराशिव): शेतकऱ्यांवरील गुन्हे आणि कर्जमाफीच्या मागणीवर चर्चा करताना भूम पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोन बंद केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत पोलीस निरीक्षक कानगुडे यांना लेखी पत्र देऊन सविस्तर खुलासा मागितला आहे.
भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सातबारा कोरा करून नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी अष्टवाडी येथील सतीश महाराज कदम उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, विजयसिंह थोरात यांच्यासह ७० ते ८० शेतकऱ्यांनी सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मंगळवारी या दोन माजी नगराध्यक्ष व आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
४ मिनिटांत ५ वेळा संपर्क, तरी प्रतिसाद नाही!
गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शेतकऱ्यांशी चर्चा करत असतानाच त्यांनी पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांना फोन केला. खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहिल्यांदा संपर्क साधला असता कानगुडे यांनी कॉल बंद केला. यानंतर सायंकाळी ४.५७ वाजल्यापासून ५.०४ वाजेपर्यंत त्यांनी वारंवार (४.५७, ५.०२, ५.०३ आणि ५.०४ वाजता) फोन केले. तर एका कॉलवर बोलत असतानाच पोलीस निरीक्षकांनी फोन कट केला. तसेच वारंवार फोन न उचलल्याने खासदारांनी 'Please Recive Call Mp Om Rajenimbalkar' (५.०२ वाजता) आणि नंतर 'Please Call Me Mp Om Rajenimbalkar' (६.०७ वाजता) असे मेसेजही केले. परंतु, कोणत्याही मेसेजला किंवा कॉलला पोलीस निरीक्षकांनी प्रतिसाद दिला नाही.
खासदारांचा थेट 'हक्कभंग'चा आरोप
पोलीस निरीक्षकाच्या या वर्तनावर संताप व्यक्त करत खासदार निंबाळकर यांनी कानगुडे यांना पत्र दिले आहे. पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, "आपण एक जबाबदार अधिकारी असूनही कर्तव्य बजावत असताना लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे. मी धाराशिव लोकसभेचा सदस्य असल्याने त्यांनी (पोलीस निरीक्षकांनी) लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्यामुळे माझ्या अधिकार व हक्कांचा भंग झाल्याची भावना झाली आहे." यामुळे आता श्रीगणेश कानगुडे यावर काय खुलासा देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांवरील गुन्ह्यांपेक्षा आता पोलीस निरीक्षक विरुद्ध खासदार असा हा संघर्ष अधिक चर्चेत आला आहे.