परंड्यात पशुधनाचे लसीकरण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:43+5:302021-07-17T04:25:43+5:30

परंडा : प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी पशुधनाला लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविली जाते. परंतु, यंदा या विभागातील अधिकारी, ...

Vaccination of livestock in Paranda on extension | परंड्यात पशुधनाचे लसीकरण लांबणीवर

परंड्यात पशुधनाचे लसीकरण लांबणीवर

परंडा : प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी पशुधनाला लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविली जाते. परंतु, यंदा या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे ही मोहीम लांबणीवर पडल्याने पशुपालकांत चिंता व्यक्त होत आहे.

जनावरांसाठी वर्षभर विविध लस टोचण्याचा कार्यक्रम सुरू असतो. त्यात लाळ खुरकत, एच.एस., बी.क्यू., ए.पी.व्ही. या लसींचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर आणि मे या दोन महिन्यांत गाय, म्हैस या मोठ्या जनावरांना लाळ खरकत ही लस दिली जाते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातील लसीकरणालाही प्रशासनाकडून विलंब झाल्याने ही मोहीम जानेवारी महिन्यातही सुरूच होती. शिवाय, आता पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात जनावरांना लस टोचणे गरजेचे होते. यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसींची मागणी शासनाकडे नोंदविल्यानंतर लसदेखील प्राप्त झाली आहे. याशिवाय, घटसर्प आणि फऱ्या आजाराची लसदेखील पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध आहे. मात्र, पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प आहे. लाळ खुरकतच्या लसीसाठी अजून किती वाट पाहावयाची, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.

तालुक्यात एकूण पशुधन

मोठी जनावरे ३९६४१

शेळ्या/मेंढ्या २३०४२

लहान गाय, म्हैस १०३८९

एकूण ७३०७२

चौकट....

कोट....

यंदा गुरांना गोवरची लस पोहोचण्यास उशीर झाला आहे. गोवरची लस तत्काळ देण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने करावे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या समस्येकडे लक्ष देऊन ही लस उपलब्ध करून द्यावी.

- राजेंद्र पाटील, पशुपालक खानापूर

गोवर लसीकरण हे एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी होत असते. पण जुलै महिना अर्धा होऊनदेखील पशूंचे लसीकरण झालेले नाही. पावसाळा सुरू होण्याअगोदर हे लसीकरण पशुवैद्यकीय विभागाने करायला हवे होते. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही, तत्काळ लसीकरण हाती घेण्यात यावे.

- गणेश टकले, पशुपालक, पिंपरखेड

कोट...

तालुक्यातील मोठ्या जनावरांसाठी नोव्हेंबर महिन्यात लाळ खुरकतचे लसीकरण करण्यात आले होते. तसेच लहान जनावरांसाठी वर्षभर लसीकरणाचे विविध कार्यक्रम सुरू असतात. लाळ खुरकत लसीची मागणी केली आहे. लसदेखील प्राप्त झाली आहे. आंदोलनामुळे लसीकरणाचा कार्यक्रम बंद आहे. घटसर्प आणि फऱ्या या लसीदेखील उपलब्ध झाले असून, संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याला लसीचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

- दत्तात्रय इंगोले, प्रभारी पशुधन विकास अधिकारी, विस्तार कार्यालय, परंडा

Web Title: Vaccination of livestock in Paranda on extension