ढाेकी : महामार्ग पाेलिसांच्या वतीने लातूर- बार्शी मार्गावर मृत्युंजय दूत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला १० एप्रिल राेजी ढाेकी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात एकदिवसीय वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वाहतूक पोलीस महासंचालक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात महामार्गावर मृत्युंजय दूत समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या लातूर-बार्शी या मार्गावरदेखील समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये विक्की शितोळे, आलम सय्यद, समाधान सोनटक्के, प्रकाश कसबे आदींचा समावेश आहे. दरम्यान, या समितीला एक दिवसाचे वैद्यकीय प्रशिक्षण ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीकांत चौधरी यांनी अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना कशा प्रकारे प्राथमिक मदत करावी, याविषयी मार्गदर्शन केले, तर पोलीस जमादार जे.एम. गुंड यांनी महामार्गावरील अपघाताविषयी असलेल्या विविध नियमांची माहिती दिली. यावेळी पोलीस जमादार व्ही.डी. गनापुरे, एस.एस. माळी, जुबेर शेख, अमर शेख आदी उपस्थित हाेते.