"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:40 IST2026-01-05T19:37:57+5:302026-01-05T19:40:49+5:30
शिंदेसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपाचे नेते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून निशाणा साधला. विनोद गंगणे यांच्या निवडीवरून तानाजी सावंत भडकले.

"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजले. याच प्रकरणात विनोद गंगणे यांना अटक झाली होती. ते जामिनावर सुटले. भाजपाने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. विनोद गंगणे नगराध्यक्ष म्हणून जिंकून आले. त्यांच्या विजयानंतर आता शिंदेसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपा आणि आमदार राणाजगजित सिंह यांच्यावर हल्ला चढवला. ते आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडीही देतील असे सावंत म्हणाले.
राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचे वेध लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात बोलताना सावंतांनी थेट भाजपालाच लक्ष्य केले.
तुळजाभवानाची प्रसाद म्हणून ड्रग्ज देतील
तानाजी सावंत म्हणाले, "ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केले आहे. त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडीही देतील."
तुळजाभवानी मंदिराच्या गाभारा तोडफोड प्रकरणावरही त्यांनी संताप व्यक्त केला. "तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तिपीठ आहे. त्याचं पावित्र्य आपण राखायला हवं. झक मारायची तर बाहेर हात लावायचा, गाभाऱ्याचं पावित्र्य कशाला भंग करतो", अशी टीका त्यांनी राणाजगजित सिंह पाटील यांच्यावर केली.
दीड हजार मतांनी जिंकतो, ही शोकांतिका
"धाराशिव नगर परिषदेमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार आहे. भूम-परांडा मतदारसंघात आणलेला निधी एकत्र करा आणि मी आणलेल्या निधीपेक्षा इतरांचा निधी जास्त असेल, तर राजीनामा देतो", असे तानाजी सावंत म्हणाले.
"काम करूनही दीड हजार मतांनी निवडून येतो, ही शोकांतिका आहे. आता गद्दारी केली, ठेचून काढणार. दिवसा पक्षाचे नाव घ्यायचं आणि रात्री फितुरी करणाऱ्यांना आम्ही मानत नाही", असे म्हणत त्यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना इशारा दिला.