"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:45 IST2025-11-05T17:43:30+5:302025-11-05T17:45:57+5:30
शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला.

"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
Uddhav Thackeray: शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही, किती मिळाली याची त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून एक आवाहन केले. 'जूनमध्ये दिली जाणारी कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत नाही, हे बोर्ड लावा. निश्चिय करा आणि सगळीकडे फलक लावा', असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुरुवात झाली. त्यानंतर बीड, धाराशिव जिल्ह्यात त्यांनी शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवरून महायुती सरकारवर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले, ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे
धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईवरून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीये. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत, इतिहासातील सगळ्यात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही?", अशा शब्दात ठाकरेंनी सरकारवर टीकेचे बाण डागले.
"तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही -उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, "नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिका, लोकसभा, विधानसभा... कोणतीही निवडणूक लागली की गावात बोर्ड लावा. कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत नाही. हे जोपर्यंत तुम्ही सरकारला ठणकावून सांगत नाही, तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही", असे आवाहन ठाकरेंनी शेतकऱ्यांना केले.
"पीक विम्यासाठी १२०० रुपये भरावे लागत आहेत आणि नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तीन रुपये भरपाई मिळत आहे. सहा रुपये मिळत आहेत. काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांवर मोर्चा काढला होता. कोणाला तीन रुपये, सहा रुपये अशी तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विमा कंपन्यांनी येत्या महिनाभरात पंधरा दिवसात शेतकऱ्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्यावी. नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसवर येऊन धडकतील. शहरात ऑफिस असेल, तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन येऊ", असा इशारा ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला.