(फोटो : समीर सुतके ०९)
उमरगा : गावा-गावात दवंडी देऊन मास्क व सॅनिटायझर वापराबाबत आवाहन करा. तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना आ. ज्ञानराज चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात आ. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आ. चौगुले यांनी या दोन्ही तालुक्यातील कोरोना संबंधिची माहिती घेतली. आरोग्य विभागाकडून उपलब्ध औषधें, कोरोना रुग्णांची परिस्थिती, भविष्यातील करावयाच्या उपाययोजना याची माहिती घेतली. यावेळी आ. चौगुले यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपयोजना करतानाच नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आली असून, उमरगा येथील इदगाह कोविड सेंटर, तसेच लोहारा व मुरूम येथील शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आसल्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले.
बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, उमरगा तहसीलदार संजय पवार, लोहाऱ्याचे संतोष रुईकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुहास साळुंके, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, एस. ए. अकेले, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक बडे, डॉ. ए. टी. कटारे, डॉ. सत्यजीत डुकरे, डॉ. रमाकांत जोशी, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, पोनि मुकुंद आघाव आदी उपस्थित होते.