उस्मानाबाद : येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील अध्यापक महाविद्यालयातील प्रा.सुकेशनी गव्हाणे-मातने यांनी डिसेंबर, २०२०च्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून यश प्राप्त केले. त्या अध्यापक विद्यालय व महाविद्यालयात गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. या यशाबद्दल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील व धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील, संस्थेचे सचिव डॉ.उदयसिंह पाटील, प्राचार्य कैलास मोटे, प्राचार्य सतीश मातने यांनी त्यांचे कौतुक केले.
बाजारपेठ खुली करण्याची मागणी
शिराढोण : कोविडचे नियम कडक करा, परंतु बाजारपेठ खुली करण्यास परवानगी द्या, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी तलाठ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवली आहे, परंतु यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, सर्व नियमांचे पालन करीत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. यावर किरण पाटील, कलिम बागवान, दयानंद यादव, शुभम नान्नजकर, सुनील मंदडा, दीपक सहाणे आदींच्या सह्या आहेत.
भूम पोलिसांचे ठिकठिकाणी छापे
उस्मानाबाद : भूम पोलिसांनी ७ एप्रिल रोजी विविध ठिकाणी छापे टाकून अवैध मद्य बाळगल्याप्रकरणी कारवाया केल्या. पाथरूड-ईट रस्त्यावरील दुधोडी फाटा येे पहिल्या छाप्यात श्रीकांत बावकर व रोहन पौळ (रा. पाथरूड) हे दुचाकीवरून एका खोक्यातून देशी दारूची वाहतूक करीत असताना मिळून आले, तर दुसऱ्या छाप्यात दत्तात्रय कराळे व शिवशंकर कराळे (रा.भूम) हे देशी दारूची वाहतूक करीत असताना आढळले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले.
रखवालदारास हाकलून घरला ठोकले टाळे
उस्मानाबाद : रखवालदाराला खुनाची धमकी देत, हकालून देऊन घराला टाळे ठोकल्याची घटना कळंब तालुक्यातील सावरगाव (पु) येथे ३ एप्रिल रोजी घडली. सावरगाव (पु) येथील श्यामसुंदर देशपांडे यांच्या घरास एक रखवालदार आहे. ३ एप्रिल रोजी कळंब येथील विनायक बळीराम माने व अन्य एका पुरुषाने या रखवालदारास खुनाची धमकी देऊन तेथून जाण्यास सांगितले. यानंतर, त्यांनी नमूद घरास व कुंपणास कुलूपबंद केल्याची फिर्याद कळंब पोलीस ठाण्यात दाखल झाली. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अपघात प्रकरणात चालकाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील गंधोरा शिवारात १६ मार्च रोजी घडली. तुळजापूर येथील चैतन्य शिवधन सोनवणे (वय १८) याने तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावरी लगंधोरा शिवारात दुचाकी निष्काळजीपणे चालविल्याने ती घसरली. यात चैतन्य यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला, तसेच पाठीमागे बसलेले मुन्नालाल मोरे जखमी झाले. या प्रकरणी मयताचे भाऊ संतोष यांनी ७ एप्रिल रोजी फिर्याद दिली. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.