गीतेंच्या विरोधात लेखा संघटनेचे गीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:43+5:302021-07-20T04:22:43+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादावादीने आता आंदोलनाचे वळण घेतले आहे. जिल्हा परिषद सदस्य ...

गीतेंच्या विरोधात लेखा संघटनेचे गीत
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादावादीने आता आंदोलनाचे वळण घेतले आहे. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करीत सोमवारी लेखा कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेत निषेध आंदोलन केले. शिवाय, दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले.
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते व मुख्य लेखा, वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्यात १६ जुलै रोजी वादावादी झाली होती. केंद्रे यांच्या दाव्यानुसार गीते यांनी त्यांच्या दालनात जाऊन माझा फोन तुम्ही का उचलत नाही, अशी मोठ्या आवाजात विचारणा केली. सभ्य भाषेत त्यांना उत्तर देत असतानाही गीते यांनी अपमानास्पद पद्धतीने बोलून कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करीत गैरवर्तन केले. यापूर्वीही त्यांनी वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अशा प्रकारे वारंवार अपमानास्पद बोलून अरेरावीची भाषा वापरली आहे. वास्तविक पाहता गीते यांचे कोणतेही देयक किंवा काहीही काम लेखा कार्यालयाकडे प्रलंबित नाही. तरीही त्यांनी कार्यालयात येऊन असे वर्तन का केले, याबाबत काही कळत नाही, असा दावाही केंद्रे यांचा आहे. तर, गीते यांनी यावर त्याच दिवशी स्पष्टीकरण देत आपली बाजू सांगितली आहे. आपण केंद्रे यांना आदरार्थीच वागणूक दिली. त्यांच्याकडूनच अपशब्द वापरले गेल्याचा दावा त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेत लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. शिवाय, सर्व लेखा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. दरम्यान, २६ जुलैपर्यंत गीते यांच्यावर योग्य कार्यवाही न झाल्यास लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व सीईओ राहुल गुप्ता यांच्याकडे सुपुर्द केले.