अठरा गावात वाजली शाळेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:38+5:302021-07-18T04:23:38+5:30
(फोटो : अरुण देशमुख १७) भूम : कोविड नियमाचे पालन करत १५ जुलैपासून तालुक्यातील ८ वी ते १२ पर्यंतचे ...

अठरा गावात वाजली शाळेची घंटा
(फोटो : अरुण देशमुख १७)
भूम : कोविड नियमाचे पालन करत १५ जुलैपासून तालुक्यातील ८ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आल्याने १८ गावांतील शाळेची घंटा वाजली. पहिल्याच दिवशी ३९४ विद्यार्थी व ९७ शिक्षकांनी शाळेत उपस्थिती लावली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास बंद असलेल्या शाळा मध्यंतरी काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या. परंतु, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने शाळा बंद करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, रुग्णसंख्यादेखील आटोक्यात आली आहे. शिवाय, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे देखील मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ज्या गावात मागील महिनाभरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही, अशाच गावात पालकांची संमती घेऊन हे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्यानुसार शाळा प्रशासनाने पालकांच्या बैठका घेऊन सर्वसंमतीने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच यासाठी शाळांची साफसफाई, शाळा सॅनिटाईझ करणे, शिक्षकांच्या कोविड चाचण्यादेखील करण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येत आहे.
कोट...........
अरोग्य विभागाच्या कोरोनामुक्त गाव यादीनुसार व ग्रामपंचायत स्तरावर गठित केलेल्या समितीच्या अहवालानंतर ८ वी ते १२ वी पर्यंतच्या १८ गावात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ३९४ विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली. शाळेत कोरोना संसर्ग होऊ नये या दृष्टीने सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
- सुनील गायकवाड, गटशिक्षण अधिकारी, भूम
160721\3424img-20210716-wa0084.jpg
शाळा फोटो