रोटरीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:39+5:302021-07-20T04:22:39+5:30

उस्मानाबाद : येथील रोटरी क्लबच्या २०२१-२२ या वर्षासाठी अध्यक्षपदी सुनील गर्जे, तर सचिवपदी कुणाल गांधी यांची निवड करण्यात आली. ...

Rotary's new incumbent takes office | रोटरीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतला पदभार

रोटरीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतला पदभार

उस्मानाबाद : येथील रोटरी क्लबच्या २०२१-२२ या वर्षासाठी अध्यक्षपदी सुनील गर्जे, तर सचिवपदी कुणाल गांधी यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी लातूर येथील धनंजय गायकवाड, उपप्रांतपाल डॉ. लक्ष्मीकांत डिग्गीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. २०२०-२१ मध्ये माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व सचिव इंद्रजित आखाडे यांनी कोरोना काळातील बंधने पाळत आरोग्य, पर्यावरण व महिलांचे आर्थिक सबलीकरण या क्षेत्रामध्ये भरीव कार्य केले. वर्षभरातील शेवटचे कार्य म्हणून गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर भर देण्याचे काम रोटरी क्लबच्यावतीने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. याचे नृत्य सादरीकरण अनुष्का गांधी यांनी केले. माजी अध्यक्ष प्रदीप मुंडे यांनी गतवर्षातील कार्यासाठी माजी अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन करत नूतन अध्यक्ष, सचिवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्रांतपालांच्या हस्ते रोटरी पीन एक्स्चेंज करून चार्टर, बेल व हॅमर देऊन नूतन अध्यक्ष सुनील गर्जे व सचिव कुणाल गांधी यांच्याकडे पदभार देण्यात आला. यावेळी रोटरी परिवारात नव्याने सहभागी झालेल्या अतुल अजमेरा, गिरीश हंबीरे व हेमंत पांडे या तीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. रोटरी सेवा ट्रस्टचा मागील वर्षाचा अहवाल सचिव प्रमोद दंडवते यांनी, तर रोटरी क्लबचा कार्य अहवाल माजी सचिव इंद्रजित आखाडे यांनी मांडला. याच कार्यक्रमात उस्मानाबाद ते रायगड असा ३८० किलोमीटरचा प्रवास केलेल्या १७ सायकलपटूंचा रोटरी क्लबच्यावतीने ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कुणाल गांधी यांनी आभार मानले.

Web Title: Rotary's new incumbent takes office