अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:05 IST2026-04-05T15:03:40+5:302026-04-05T15:05:21+5:30
"या प्रकरणाची सीबीआय आणि सीआयडी चौकशी व्हावी."

अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
तुळजापूर : "अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे," अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.
सुनील तटकरे यांनी रविवारी श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, या प्रकरणाची सीबीआय आणि सीआयडी चौकशी व्हावी, ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. प्राथमिक अहवालातील त्रुटींकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या शंका आणि भावनांची दखल घेऊन तपास यंत्रणांनी अधिक सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
अशोक खरात आणि तत्सम प्रकरणांवरही तटकरे यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. "खरात असो किंवा अन्य कोणीही, अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना समाजात थारा मिळता कामा नये. अशा प्रकरणांचा तपास जलदगती न्यायालयात करून दोषींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करावा, असेही त्यांनी सरकारला सुचवले.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन
अजित दादांच्या निधनाचे दुःख व्यक्त करताना तटकरे म्हणाले की, "दादांनी ४० वर्षे महाराष्ट्र घडवण्यासाठी काम केले, ते आज आमच्यात नाहीत याचे मोठे शल्य आहे." बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आवाहन केले की, ही निवडणूक अत्यंत संवेदनशील परिस्थितीत होत असून सुनेत्रा वहिनी यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.