खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:26+5:302021-07-18T04:23:26+5:30
(फोटो : संतोष मगर १७) तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सागवी (काटी) ते पांगरदरवाडी या तीन किलोमीटर रस्त्यावर ...

खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून नोंदविला निषेध
(फोटो : संतोष मगर १७)
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सागवी (काटी) ते पांगरदरवाडी या तीन किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून, अपघातामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. वारंवार रस्त्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी शनिवारी रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
सांगवी (काटी) ते पांगरदरवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता वीस वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दळणवळणासाठी हा प्रमुख मार्ग असल्यामुळे नागरिकांची नियमित या रस्त्यावर वर्दळ असते. बँक, पोलीस स्टेशन इत्यादी महत्त्वपूर्ण कामासाठी येथील नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत.
या रस्त्याबाबत संबंधित प्रशासनाकडे गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र, रस्ता हा रस्ता मंजूर असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे प्रत्येकवेळी सांगितले जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी करीत शनिवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे युवा नेते सोमनाथ शिंदे, महेश सावंत, बापू साळुंके, शिवाजी कदम, आण्णा मोरे, भैरू टिंगरे, संजय क्षीरसागर, भैरू चव्हाण, सूरज मते, अमीर शेख, इकबाल सय्यद, महादेव गायकवाड आदी गावकरी उपस्थित होते.
चौकट........
विद्यार्थ्यांचीही होतेय गैरसोय
नादुरुस्त रस्त्यामुळे पांगरदरवाडीची बससेवा गेल्या १० वर्षांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचीदेखील मोठी गैरसोय होत आहे. सध्या ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांना रस्त्यावरून जाताना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय, गरोदर महिलांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणाऱ्यांना देखील या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.